तुमसरातील गांधीसागर तलाव कात टाकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:26 PM2018-06-26T22:26:20+5:302018-06-26T22:27:24+5:30
भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. तुमसर शहराच्या मध्यभागी जुना मोठा गांधीसागर तलाव सौंदर्यीकरणाकरिता तुमसर नगरपरिषदेने २१ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. नगराध्यक्ष प्रदीप पडोळे त्याचा पाठपुरावा सध्या मंत्रालयात करीत आहेत. नागपूर येथील गांधी सागर तलावाच्या धर्तीवर तुमसरातील गांधीसागर तलाव कात टाकणार आहे. सध्या या तलावाची दुरवस्था झाली आहे.
मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. तुमसर शहराच्या मध्यभागी जुना मोठा गांधीसागर तलाव सौंदर्यीकरणाकरिता तुमसर नगरपरिषदेने २१ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. नगराध्यक्ष प्रदीप पडोळे त्याचा पाठपुरावा सध्या मंत्रालयात करीत आहेत. नागपूर येथील गांधी सागर तलावाच्या धर्तीवर तुमसरातील गांधीसागर तलाव कात टाकणार आहे. सध्या या तलावाची दुरवस्था झाली आहे.
शहराच्या मध्यभागी नगरपरिषदेच्या मालकीचा एकमेव जूना गांधीसागर तलाव आहे. सध्या तलावाची दुरवस्था झाली आहे. यापूर्वी तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात आले. यात तलावाची एका बाजूला संरक्षण भिंत, तलाव खोलीकरण यावर सुमारे ३ ते ३.५० कोटी रूपयाचा निधी खर्च करण्यात आला. परंतू इतक्या कमी निधीत विस्तीर्ण पसरलेल्या तलावाचा कायापालट होऊ शकत नाही. पुन्हा नव्या दमाने गांधी सागर तलावाचे सौंदर्यीकरणाकरिता नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी पुढाकार घेतला आहे.
नागपूर येथील गांधीसागर तलावाच्या धर्तीवर देखणा तलाव तयार करण्याकरिता नगरपरिषदेने प्रस्ताव तयार केला. सुमारे २१ कोटींचा हा तलाव सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव आहे. यात तलाव खोलीकरण, उद्याणाचे नुतनीकरण, उर्वरित तलावाची संरक्षण भिंत, बोटींग, तलावाच्या मध्यभागी लहान उद्याणासारखे स्थळ, तलाव परिसरात देखणी वृक्ष लागवड, फुलांचे उद्यान इत्यादींचा त्यात समावेश आहे. सध्या प्रस्ताव मंत्रालयात असून नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी मंगळवारी मंत्रालयात सदर प्रस्तावाचा पाठपुरावा घेतला. सौंदर्यीकरणामुळे शहराचे नावलौकीक वाढणार आहे. येथे शासनाच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे.
गांधी सागर तलाव सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून किमान १० ते १२ कोटी शासनाने मंजूर केले तरी उच्च दर्जाचे तलाव सौंदर्यीकरणाची कामे केली जातील. एक देखणा तलाव येथे तयार होईल. सध्या पाठपुरावा घेतला जात आहे.
-प्रदीप पडोळे, नगराध्यक्ष तुमसर.