दुचाकी अपघातात तरुण अभियंता ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:26 PM2018-09-24T22:26:09+5:302018-09-24T22:26:34+5:30
दुचाकीच्या समोर अचानक रानडुक्कर आल्याने झालेल्या अपघातात एका तरुण अभियंत्याला आपला प्राण गमवावा लागला. भंडारा वरठी मार्गावर झालेल्या अपघातातील या अभियंत्याने २२ दिवस मृत्यूशी झुंज दिली. मात्र अखेर त्यांचा नागपूर येथे उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दुचाकीच्या समोर अचानक रानडुक्कर आल्याने झालेल्या अपघातात एका तरुण अभियंत्याला आपला प्राण गमवावा लागला. भंडारा वरठी मार्गावर झालेल्या अपघातातील या अभियंत्याने २२ दिवस मृत्यूशी झुंज दिली. मात्र अखेर त्यांचा नागपूर येथे उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी मृत्यू झाला.
निखिल मनोहर ठाकरे (३७) रा. मुखर्जी वॉर्ड, गांधी चौक परिसर भंडारा असे मृत अभियंत्याचे नाव आहे. ते वरठी येथील सनफलॅग कंपनीमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होते. १ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास ते ड्यूटीवर आपल्या दुचाकीने जात होते. भंडारा ते वरठी मार्गावर त्यांच्या दुचाकीसमोर अचानक रानडुकर आले. त्यात ते खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. विशेष म्हणजे ते हेल्मेट घालून होते पंरतु हेल्मेटचा बेल्ट लावला नसल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. ही बाब रस्त्यावरुन जाणाºया नागरिकांच्या लक्षात आली. तात्काळ भंडारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने नागपूरच्या खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. तब्बल २२ दिवस मृत्यूशी झुंज दिली. रविवारी सायंकाळी ५.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची माहिती भंडारात येताच प्रत्येकजण हळहळत होता.
सोमवारी दुपारी वैनगंगा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी स्नेहा, मुलगा शिव, आई-वडील, भाऊ व बहिण आहे.
साडेतीन वर्षाच्या शिवने दिला पित्याच्या चितेला भडाग्नी
वैनगंगा घाटावर निखिल ठाकरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांचा साडेतीन वर्षाचा मुलगा शिव याने चितेला भडाग्नी दिली. त्यावेळी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तरुण वयात निखिलचा मृत्यू झाल्याने भंडारा शहरात प्रत्येक जण हळहळत होता.