भारनियमनाला कंटाळून युवा शेतकऱ्याची आत्महत्या, भंडारा जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 11:42 AM2022-04-11T11:42:12+5:302022-04-11T11:44:43+5:30
ही हृदयद्रावक घटना लाखनी तालुक्यातील साेमलवाडा (जि. भंडारा) येेथे रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
लाखनी (भंडारा) : भारनियमनामुळे शेतातील भाजीपाला आणि पिकांना फटका बसत आहे, त्याचा धसका घेत युवा शेतकऱ्याने स्वत:च्याच शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना लाखनी तालुक्यातील साेमलवाडा (जि. भंडारा) येेथे रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
कृष्णा शालिकराम अतकरी (२३) असे मृताचे नाव आहे. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी घरची मंडळी झोपून उठली असता कृष्णा आपल्या रूममध्ये नव्हता. कदाचित शेतावर गेला असावा असा घरच्या मंडळींनी अंदाज लावला व शेतात लावलेली भेंडी तोडण्यासाठी गेले. दरम्यान, त्यांना कृष्णा हा गळफास लावलेल्या स्थितीत आढळला.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने भारनियमन सुरू आहे. शेतातील पिकांना केवळ एक ते दीड तास विद्युतपुरवठा होत आहे. शेतातील लावलेला भाजीपाला पीक पाण्याअभावी सुकत असल्यामुळे लावलेला खर्च निघत नसल्याने घरखर्च भागवायचे कसे या विवंचनेत राहून त्याचा मनावर परिणाम होऊन त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी माहिती वडील शालिकराम अतकरी यांनी दिली. पोलीस निरीक्षक मनोज वाडीवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दिलीपकुमार घरडे तपास करीत आहेत.