कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 11:00 PM2018-04-13T23:00:18+5:302018-04-13T23:00:18+5:30

Young farmer suicides due to loan defaulting | कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Next
ठळक मुद्देपवनी तालुक्यातील वाही येथील घटना : मृतदेह साडेपाच तास तहसील कार्यालयात, आमदारांविरूद्ध ग्रामस्थांत रोष

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : शेतीसाठी कर्ज घेऊन ते फेडू न शकल्यामुळे त्या विवंचनेत एका तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पवनी तालुक्यातील वाही येथे गुरूवारच्या रात्री उघडकीस आली. दरम्यान, शुक्रवारला उत्तरीय तपासणीनंतर तातडीची मदत मिळावी यासाठी मृतदेह सकाळी ९.३० वाजता पवनी तहसील कार्यालयात नेण्यात आला. मदत घोषित होईपर्यंत मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका संतप्त लोकांनी घेतल्यामुळे पवनीत काही काळ तणावाचे वातावरण होते. साडेपाच तास मृतदेह तहसील कार्यालयात होता. परंतु स्थानिक आमदार रामचंद्र अवसरे हे गावात असूनही घटनास्थळी न आल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र रोष व्यक्त केला.
सोमेश्वर लक्ष्मण कोकुड्डे (३७) रा.वाही असे मृत शेतकºयाचे नाव आहे. वाही येथे तीन भावांचा संयुक्त कुटुंब असून सोमेश्वरला पत्नी जयश्री, मुलगी प्रांजली (५) मुलगा अखिल (२), दोन अविवाहित भाऊ आहेत. लहाणपणी आईवडील वारल्यामुळे दोन्ही भावांचा सांभाळ सोमेश्वरने केला होता. कोकुड्डे यांनी सहा एकर जमिनीवर राष्ट्रीयकृत बँकेकडून दीड लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. ते कर्ज थकीत होते. याचवेळी कृषी पंपाचे ३९ हजार रूपयांचे बील आले. आधीच कर्ज असल्यामुळे पुन्हा कर्ज मिळणार नाही, बिल न भरल्यास कृषी पंपाची जोडणी कापल्या जाईल अशातच २५ एप्रिलला होणाºया लहान भावाच्या लग्नाचा खर्च कसा करावा या विवंचनेत या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची चर्चा सुरू होती.
दरम्यान, या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, यासाठी संतप्त ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात मृतदेह आणला. तिथे माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, बसपाचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश नंदूरकर, आझाद शेतकरी संघटनेचे किशोर पंचभाई, प्रकाश पचारे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकर तेलमासरे, माजी सभापती विकास राऊत, माजी सभापती हंसा खोब्रागडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ.अनिल धकाते, शिवा फंदी, किशोर गोटाफोडे यांनी उपविभागीय अधिकारी सुजाता गंधे यांच्याशी तातडीची मदत मिळावी यासाठी चर्चा केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर टिक्कस, तहसीलदार गजानन कोकुड्डे उपस्थित होते. त्यानंतर माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मदत मिळेपर्यंत मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्याशी संपर्क साधून तातडीची मदत, शासकीय अनुदान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी लवकरात लवकर देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले पवनीत येत असल्याची माहिती होताच पुन्हा अर्धा तास मृतदेह तिथेच ठेवण्यात आला. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. परिस्थितीचा सामना करावा. खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या लोकांना धडा शिकवून त्यांनी आत्महत्या केली पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण करा, असे आवाहन पटोले यांनी केले. त्यानंतर दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयातून मृतदेह वाही येथे हलविण्यात आले.

Web Title: Young farmer suicides due to loan defaulting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.