रेल्वेतून तरुणाची उडी
By admin | Published: May 30, 2015 12:54 AM2015-05-30T00:54:54+5:302015-05-30T00:54:54+5:30
सुपरफास्ट रेल्वेत बसलेल्या एका प्रवाशाला ही गाडी तुमसर रेल्वेस्थानकावर थांबणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्या प्रवाशाने धावत्या रेल्वेतून उडी मारली.
तुमसर : सुपरफास्ट रेल्वेत बसलेल्या एका प्रवाशाला ही गाडी तुमसर रेल्वेस्थानकावर थांबणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्या प्रवाशाने धावत्या रेल्वेतून उडी मारली. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तुमसररोड (देव्हाडी) रेल्वे स्थानकावर शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता घडली.
वसीम वहाब शेख (३२) रा.सिहोरा असे मृतक प्रवाशाचे नाव आहे. शेख वसीम वहाब याला भुसावळ येथील आयुध निर्माण कारखान्यात नोकरी लागली होती. तिथे रूजू होऊन तो सिहोरा येथे मूळ गावी भुसावळ-नागपूरपर्यंत लोकमान्य टिळक-गुवाहाटी या सुपरफास्ट गाडीची तिकीट त्याने घेतली होती. ही रेल्वे नागपूरला पोहचल्यानंतर थांबा नसल्यामुळे भंडारा येथे थांबली नाही. त्यानंतर १५ मिनिटांनी तुमसर रोड रेल्वे स्थानक आले.
या रेल्वेस्थानकावरून ही गाडी धडधड करीत पुढे जात होती. त्यामुळे वसीमने क्षणाचाही विचार न करता त्याने धावत्या रेल्वेतून उडी घेतली. रेल्वेचा वेग अधिक असल्यामुळे गाडीखाली येवून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेचा तपास तुमसर रोड रेल्वे पोलीस आणि तुमसर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
आनंदाचा क्षण दु:खात बदलला
मुलाला नोकरी लागल्याच्या आनंदात शेख कुटुंबीय होते. त्यातच मुलगा नोकरीत रुजू होऊन परतल्यावर आनंद साजरा करण्याचा बेत शेख कुटुंबीयांनी आखला होता. परंतु, नियतीच्या मनात काय होते कुणास ठाऊक नोकरीवर रूजू होऊन परतताना रेल्वेतून पडून त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे शेख कुटुंबीयांवर दु:खाचे संकट कोसळले आहे.