दुचाकी अपघातात तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 09:53 PM2018-11-27T21:53:46+5:302018-11-27T21:54:03+5:30
दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात तुमसर-देव्हाडी मार्गावर फादर अॅग्नेल शाळेसमोर मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडला. सुरेश देशमुख (२४) रा.तुडका (देव्हाडी) असे मृताचे नाव आहे. गंभीर जखमीचे नाव रवीशंकर एंचिलवार (२५) असे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात तुमसर-देव्हाडी मार्गावर फादर अॅग्नेल शाळेसमोर मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडला. सुरेश देशमुख (२४) रा.तुडका (देव्हाडी) असे मृताचे नाव आहे. गंभीर जखमीचे नाव रवीशंकर एंचिलवार (२५) असे आहे.
सुरेश देशमुख सकाळी ९ च्या सुमारास खासगी कामानिमित्त तुमसर येथे नव्या कोऱ्या दुचाकीने जात होते. विरुद्ध दिशेने रवी एंचिलवार दुचाकी क्रमांक एम.एच. ३६ डब्लू००६९ देव्हाडीकडे येत होता. फादर अग्नेल शाळेसमोर समोरासमोर दुचाकींची धडक झाली. यात सुरेश देशमुख यांची दुचाकी सुमारे २० ते २२ फुट फरफटत गेली. डोक्याला गंभीर इजा होऊन मोठा रक्तस्त्राव झाला. पायाचे हाड मोडले. रक्ताच्या थारोळ्यात सुरेश यांना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
रवी एंचिलवार हा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून त्याच्यावर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
सुरेश देशमुख व त्याच्या भावाने देव्हाडी येथे दुचाकी दुरुस्ती केंद्र सुरू केले होते. एक नामवंत मेकॅनिक म्हणून त्याची ओळख होती. या घटनेने देव्हाडी व तुडका गावावर शोककळा पसरली.
घटनास्थळी रस्ता खड्डेमय आहे. डाव्या बाजूचा रस्ता खड्डेमय असल्याने दुचाकी येथे उसळते.
खड्ड्यात दुचाकी उसळल्याने ती अनियंत्रित झाली अशी चर्चा अपघातस्थळी होती. यापूर्वीही सदर रस्त्यावर अपघात घडले आहेत. ठिकठिकाणी या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खड्यांमुळे अपघात घडून जीव जात असताना बांधकाम विभागही याकडे लक्ष द्यायला तयार नाही.
रस्त्यावरील खड्ड्यांची येथे डागडुजी करण्याची गरज आहे. घटनास्थळी अपघातानंतर मोठी गर्दी झाली होती. सुरेशच्या मृत्यूमुळे देव्हाडी व तुडका येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.