दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृण खून, मारेकऱ्यांचा थांगपत्ता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 06:35 PM2021-12-23T18:35:17+5:302021-12-23T18:40:46+5:30
रोशन बुधवारी सायंकाळी ४ वाजता घरुन निघाला मात्र, परतला नाही. त्यामुळे घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता गुरुवारी दुपारी २ वाजता त्याचा मृतदेह कांद्रीपासून तीन किलोमीटर अंतरावर बोंद्री ते पांजरा रस्त्यावर नाल्यात आढळून आला.
भंडारा : दगडाने ठेचून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना मोहाडी तालुक्यातील कांद्री शिवारातील एका नाल्यात गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. बुधवारी सायंकाळी ४ वाजतापासून तो बेपत्ता होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अद्याप मारेकऱ्यांचा मात्र थांगपत्ता लागला नव्हता.
रोशन रामू खोडके (२८) रा.कांद्री असे मृत तरुणाचे नाव आहे. तो बुधवारी सायंकाळी ४ वाजता घरुन निघाला मात्र, रात्री घरी परतला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु तो कुठेही आढळून आला नाही. दरम्यान गुरुवारी दुपारी २ वाजता त्याचा मृतदेह कांद्रीपासून तीन किलोमीटर अंतरावर बोंद्री ते पांजरा रस्त्यावर नाल्यात आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्याच्या डोक्यावर दगडाने प्रहार करुन त्याचा खून केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. तसेच शरीरही छिन्नविछिन्न झाले आहे.
खुनाची माहिती गावात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आंधळगाव पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. ठाणेदार सुरेश मट्टामी घटनास्थळी दाखल झाले. नाल्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. या खुनाची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोषसिंग बिसेन यांनी घटनास्थळाला भेट दिली. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.
खून करुन नाल्यात फेकला मृतदेह
रोशन खोडके याचा बुधवारी रात्रीच खून केला असावा असा कयास आहे. घटनास्थळावरुन २५ ते ३० मीटर अंतरावर त्याला मारण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह ओढत आणून नाल्यात फेकण्यात आला असावा असे सांगण्यात येत आहे. मृतदेह रात्रभर नाल्याच्या पाण्यात राहिल्याने किड्यांनी चेहरा पूर्णत: विद्रूप केला होता. नेमका कुणी आणि कशासाठी खून केला याचा शोध पोलीस घेत आहेत.