मधमाशांच्या हल्ल्यातून बचावासाठी कालव्यात उडी घेणे जीवावर बेतले; तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2022 05:43 PM2022-03-12T17:43:14+5:302022-03-12T17:50:33+5:30
त्याने बचावासाठी गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात उडी घेतली. मात्र, खोल पाण्याचा अंदाज आला नाही. त्यात बुडायला लागला.
पवनी (भंडारा) : मधमाशांनी हल्ला केल्याने बचावासाठी कालव्यात उडी घेणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात बुडून तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास येथील मंगळवारी परिसरातील कालव्यात घडली.
महेश रघू रेवतकर (२५) , रा. आष्टा जि. वर्धा असे मृत तरुणाचे नाव असून तो शनिवारी वार्डातील जावई भुषण कुंडलिक वैद्य यांच्याकडे राहत होता. शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमार तो दरम्यान उजव्या कालव्याचे पाळीवरून शेतावर जात होता. त्यावेळी अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. त्यामुळे घाबरलेल्या महेशने पळ काढला पण मधमाशा पाठलाग करीत होत्या.
अखेर त्याने बचावासाठी गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात उडी घेतली. मात्र, खोल पाण्याचा अंदाज आला नाही. त्यात बुडायला लागला. हा प्रकार सिरसाळा कन्हाळगाव मार्गावरून जाणाऱ्या काही व्यक्तीच्या लक्षात आला. त्याला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यश आले नाही. त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काही वेळा नंतर मासेमारी बांधवांच्या मदतीने त्याचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आला. आपल्या बहिणीकडे राहणाऱ्या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पवनी शहरात हळहळ व्यक्त होत आहे. पवनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. ठाणेदार जगदीश गायकवाड यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.