उसर्रा पुलाने घेतला आणखी एक बळी; नागपूर जिल्ह्यातील तरुण अपघातात ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 01:22 PM2022-05-05T13:22:11+5:302022-05-05T14:28:55+5:30
स्वागत समारंभाचा कार्यक्रम आटोपून हे तिघेही एका दुचाकीने नयाकुंड येथे रात्री जात होते.
उसर्रा (भंडारा) : तुमसर - रामटेक मार्गावरील उसर्रा पुलाजवळ काम खोळंबल्याने अनेक अपघात होत असून, बुधवारी रात्री पुन्हा एका तरुणाचा बळी गेला. लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून गावी जाताना दुचकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात नागपूर जिल्ह्यातील एक तरुण ठार, तर दोनजण जखमी झाले.
हा अपघात उसर्रा पुलाजवळ बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास घडला. प्रज्वल जालंधर गायकवाड (२५, रा. नयाकुंड, ता. पारशिवणी, जि. नागपूर) असे मृताचे नाव आहे, तर अरविंद अमरदीप गजभिये (२६) आणि श्रावण पुरुषोत्तम गजभिये (१५, दाघे रा. नयाकुंड) अशी जखमींचे नावे आहेत. उसर्रा येथील राहुल बोरकर यांचा विवाह पारसिवणी येथे मंगळवारी पार पडला. बुधवारी रात्री नयाकुंड येथील पाहुणे स्वागत समारंभासाठी आले होते. त्यात प्रज्वल गायकवाड, अरविंद गजभिये, श्रावण गजभिये यांचा समावेश होता. स्वागत समारंभ आटोपून हे तिघेही एका दुचाकीने नयाकुंड येथे रात्री जात होते.
तुमसर ते रामटेक मार्गावरील उसर्रा येथील पुलाजवळ एकेरी सिमेंट रस्त्याने जात असताना समोरून आलेल्या वाहनाचा प्रखर प्रकाश दुचाकी चालक प्रज्वलच्या डोळ्यावर पडला. त्यामुळे त्याला पुढचे काहीच दिसले नाही. त्यामुळे दुचाकी एकेरी रस्त्याच्या खाली उतरली. पुन्हा रस्त्यावर येताना दुचाकी स्लीप होऊन तिघेही खाली कोसळले. प्रज्वलला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला, तर अरविंद व श्रावण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच आंधळगाव पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
आणखी किती बळी जाणार?
तुमसर ते रामटेक राज्य मार्गावर उसर्रा पुलाजवळ गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याचे काम खोळंबले आहे. हा रस्ता एकेरी असून, रात्री वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. या रस्त्यावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, काहींचा यात बळी गेला आहे. या रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करावे, यासाठी गावकऱ्यांनी आंदोलनही केले होते. मात्र, रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे किती बळी गेल्यानंतर रस्ता दुरूस्त होणार असा प्रश्न गावकरी करीत आहेत.