गणपतीचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या तरुणावर काळाचा घाला; अपघातात दुर्दैवी मृत्यू
By ज्ञानेश्वर मुंदे | Updated: September 7, 2022 14:02 IST2022-09-07T13:56:04+5:302022-09-07T14:02:00+5:30
लाखांदूर तालुक्यातील घटना, मित्र गंभीर जखमी

गणपतीचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या तरुणावर काळाचा घाला; अपघातात दुर्दैवी मृत्यू
भंडारा : गणपतीचे दर्शन घेऊन दुचाकीने गावी परतताना भरधाव बोलेरो वाहनाने धडक दिल्याने एक तरुण ठार तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. हा अपघात लाखांदूर तालुक्यातील चप्राड पहाडीजवळ मंगळवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
विक्की अरुण ठाकरे (२५, रा. आसोला) असे मृताचे नाव आहे. तर जयघोष अशोक मिसार (२५, रा. आसोला) असे गंभीर जखमीचे नाव आहे. आसोला येथील विक्की आणि अशोक मंगळवारी दुचाकीने (एम.एच. ४०, बीएन ३५६१) चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे गणपती दर्शनासाठी गेले होते. गणपतीचे दर्शन घेऊन रात्री दोघेही एकाच दुचाकीने आसोला येथे येत होते. त्यावेळी तालुक्यातील चप्राड पहाडी परिसरातील राज्य महामार्गावर लाखांदूर येथून वडसाकडे जाणाऱ्या बोलेरो वाहनाने (एम.एच. ४०, एसी १३६८) दुचाकीला धडक दिली.
धडक एवढी जबर होती की दुचाकी चालक विक्की ठाकरे व जयघोष मिसार गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती होताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जखमींना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासताच विक्कीला मृत घोषित केले. गंभीर जखमी अशोकला उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले. तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत.