बिघाड दुरूस्ती करणे जीवावर बेतले; रोहित्रावर चढलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2022 01:35 PM2022-09-03T13:35:09+5:302022-09-03T13:37:59+5:30

चिचोली शिवारातील घटना

young man who climbed on electric pole to fix for failure died due to electric shock | बिघाड दुरूस्ती करणे जीवावर बेतले; रोहित्रावर चढलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

बिघाड दुरूस्ती करणे जीवावर बेतले; रोहित्रावर चढलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

googlenewsNext

लाखांदूर (भंडारा) : बिघाड दुरूस्त करण्यासाठी वीज रोहित्रावर चढलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील चिचोली-भागडी शिवारात शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. सिंचन खोळंबल्याने बिघाड दुरूस्तीसाठी रोहित्रावर चढणे या तरुणाच्या जीवावर बेतले.

शरद यादो धोटे (३२, रा. भागडी) असे मृताचे नाव आहे. त्याचे चिचोली - भागडी शिवारात दोन एकर शेत आहे. शेत सिंचनासाठी कृषी वीजपंप आहे. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शरद पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेला. मोटारपंप सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र पंप सुरू न झाल्याने वीज पुरवठ्यात बिघाड झाला असावा, असे त्याला वाटले. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तो शेतातील रोहित्राजवळ पोहोचला. यावेळी शरदने रोहित्राचा वीजपुरवठा बंद केला आणि वर चढला. मात्र, काही कळायच्या आत त्याला विजेचा जोरदार धक्का बसला.

रोहित्रावर लटकलेल्या अवस्थेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती त्याच्या कुटुंबियांना, महावितरण कंपनीसह पोलिसांना देण्यात आली. लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक युवराज उईके, पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमार जगणे, पोलीस नायक दिलीप भोयर, सुभाष शहारे, अंमलदार अनिल राठोड, संदीप रोकडे यांच्यासह महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठविला. या घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: young man who climbed on electric pole to fix for failure died due to electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.