गरजु रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी सरसावले तरुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:33 AM2021-05-24T04:33:56+5:302021-05-24T04:33:56+5:30
पवनी : आजच्या कोविड-१९ आजाराच्या प्रादुर्भाव, तसेच सामान्य परिस्थितीत अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. या अनुषंगाने विविध समाजसेवी ...
पवनी : आजच्या कोविड-१९ आजाराच्या प्रादुर्भाव, तसेच सामान्य परिस्थितीत अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. या अनुषंगाने विविध समाजसेवी संघटना तसेच काही खाजगी संघटना रक्तदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात; परंतु आपत्कालीन परिस्थितीत जर रुग्णांना रक्ताची गरज भासली तर त्यांच्या नातेवाइकांना भटकत फिरावे लागते. या संधीचा फायदा घेत खाजगी रक्तपेढ्या फक्त परिचित व्यक्तींनाच मदत करतात हे ही सध्या पाहावयास मिळत आहे. काही रक्तदाते खाजगी ब्लड बँकेकडून भेट स्वरूपात देण्यात येणाऱ्या भेट वस्तूंसाठी रक्तदान करतात. यामधून खाजगी रक्तपेढ्या रक्त साठ्याचा काळाबाजार करतात व गरीब गरजूंना रक्त लागत असल्यास त्या वेळी त्यांना एका रक्त पिशवीसाठी दोन ते तीन हजार रुपये मोजावे लागतात.
एकंदरीत या सर्व बाबी लक्षात घेऊन ‘गिव्ह ब्लड - शेअर लाइफ’ या व्हाॅट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून गरजूंना वेळेवर रक्ताचा पुरवठा व्हावा व रक्ताचा काळाबाजार थांबावा याकरिता ही मोहीम राबविण्यात येत आहे. या ग्रुपचा उद्देश असा की, रक्तदात्यांनी खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्तदान न करता त्यांनी शासकीय रक्त पेढ्यांकडे रक्तदान करण्याकरिता वळविणे. ग्रुपच्या माध्यमातून असे आवाहन करण्यात आले की, गरजू व गरीब व्यक्तींना वेळेवर रक्ताची पूर्तता व्हावी यासाठी रक्तदात्यांनी स्वतः शासकीय रक्तपेढ्यांमध्ये जाऊन रक्तदान करावे.