भररस्त्यावर थरार! शेतीच्या वादात कुऱ्हाडीचे घाव घालून लहान भावाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2022 02:37 PM2022-12-08T14:37:59+5:302022-12-08T15:02:02+5:30
कोलाराची घटना : मोठ्या भावाला अटक
पालांदूर (भंडारा) : वडिलोपार्जित शेतजमिनीचा वाद विकोपाला जाऊन मोठ्या भावाने भररस्त्यावर कुऱ्हाडीचे गळ्यावर सपासप घाव घालत लहान भावाचा खून केल्याची घटना लाखनी तालुक्यातील कोलारा ते झरप रस्त्यावर बुधवारी सकाळी ८.३० वाजता घडली. याप्रकरणी मोठ्या भावाला पालांदूर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने लाखनी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
प्रभाकर उदाराम भोयर (वय ५२, रा. कोलारा) असे मृताचे नाव आहे. तर सुरेश उदाराम भोयर (५५, रा. कोलारा) असे आरोपी भावाचे नाव आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित आठ एकर सामूहिक शेती आहे. शेती नावाने करण्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. दोन महिन्यांपूर्वीसुद्धा यावरून शाब्दिक बाचाबाची झाली होती. बुधवारी सकाळी प्रभाकर आपल्या शेतात तुरीवर कीटकनाशक फवारण्यासाठी शेतात जात होता. सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास आरोपी सुरेशसुद्धा सायकलला कुऱ्हाड लटकून शेताकडे गेला. झरप ते कोलारा रस्त्यावर त्यांची भेट झाली. तेथे वाद सुरू झाला.
या वादात सुरेशने आपल्याजवळील कुऱ्हाडीने लहान भावाच्या गळ्यावर कुऱ्हाडीचे घाव घातले आणि तेथून पसार झाला. प्रभाकर रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. प्रथमदर्शी अपघात झाल्याचे वाटल्याने त्याच्या घरी अपघाताची माहिती दिली. घरची मंडळी घटनास्थळी आली असता गळ्यावर कुऱ्हाडीचे घाव दिसले. तो मृत झाला होता. तोपर्यंत घटनास्थळी एकच गर्दी झाली.
या घटनेची माहिती होताच पालांदूरचे ठाणेदार वीरसेन चहांदे, ओमप्रकाश केवट, नावेद पठाण, मंगेश खुळसाम घटनास्थळी दाखल झाले. पोलिस पाटील सुनील लुटे (रा. घोडेझरी) यांनी याबाबत माहिती दिली. पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय डोळस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. काही वेळातच पोलिसांनी आरोपी सुरेश भोयर याला अटक केली.
श्वानपथकाने काढला आरोपीचा माग
लहान भावावर कुऱ्हाडीने सपासप वार करून कुऱ्हाड एका झुडपात फेकून आरोपी पसार झाला होता. पोलिसांनी तत्काळ श्वानपथकाला पाचारण केले. कुऱ्हाडीचा गंध दिल्यानंतर श्वान थेट आरोपीच्या घरी पोहोचला. त्यावेळी सुरेश घरातच होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता भावाचा खून केल्याची कबुली दिली. या तपासात अड्याळचे ठाणेदार सुधीर बोरकुटे, दिघोरीचे ठाणेदार पवार यांनी सहकार्य केले.