तुमसरवासीयांना मिळणार "आरओ"चे शुद्ध पाणी
By admin | Published: April 10, 2017 12:33 AM2017-04-10T00:33:13+5:302017-04-10T00:33:13+5:30
येत्या एक दीड महिन्यात चार आरो प्लान्ट उभारुन तुमसरकरांना थंड व शुध्द पाणी पिण्यास देणार असल्याचा मानस
प्रदिप पडोळे यांची माहिती : तुमसरात चार ‘आरओ प्लान्ट’ उभारले जाणार
तुमसर : येत्या एक दीड महिन्यात चार आरो प्लान्ट उभारुन तुमसरकरांना थंड व शुध्द पाणी पिण्यास देणार असल्याचा मानस नगराध्यक्ष प्रदिप पडोळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
तुमसर शहराला कोष्टी व माडगी घाटातून पाणी वितरित होते. मात्र त्या पाईप लाईनमध्ये अनेक लिकेजस आहेत. तसेच फिल्टर प्लान्ट बंद असल्यामुळे नागरिकांना पाण्याचा होणारा त्रास पाहता. शहरात न.प.द्वारे चार आरओ फिल्टर प्लान्ट उभारुन प्रत्येक नागरिकास ५० पैसात १ लिटर थंड आरओचा पाणी तसेच ज्यांना थंड पाणी नको असेल त्यांना ५ रुपयात २० लिटर आरओचे शुध्द पाणी देण्याची तयार त्या दिशेने सुरु केली असून येत्या एक दीड महिन्यात ही सुविधा तुमसरकरांना मिळणार आहे. त्यामुळे शहरातील पाण्याचा भिषण प्रश्नावर मात केल्या जावू शकते,असेही प्रदिप पडोळे यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील जीवनदायिनी नदी म्हणून ओळखली जाणारी वैनगंगा नदी आटली आहे. जी स्थिती मे किंवा जुन महिन्यामध्ये असायला हवी ती मार्च मध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची समस्या ही भिषण रुप धारण करणार यात शंका नाही.
त्यामुळ तातडीच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत टंचाईग्रस्त विविध प्रयोगात विंधन विहिरी तयार करण्याकरिता प्रस्ताव सादर केले. त्याचबरोबर शहरातील टिल्लू पंप धारकांना वठणीवर आणण्याकरिता व शहरात सुरळीत पाणी पुरवठा होण्याकरिता पाणीपुरवठा करतेवेळी शहरातील विद्युत पुरवठा बंद ठेवण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र सादर करण्यात आले.
इतकेच नव्हे तर नदीपात्रात मुबलक पाणी उपलब्ध नसल्याने बावनथडी प्रकल्पातून पाणी उपलब्ध करुन देण्याचे सन २००६ पासूनचे थकीत असलेले १८ लक्ष रुपये संबंधित विभागास देण्यात आले आहे. त्यामुळे कितीही संकटे आली तरी तुमसरकरांना मुबलक व शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी कटीबध्द असून त्या दिशेने पावले उचलले आहेत. त्यामुळे चिंतेचे कारण नाही असे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी विरोधी पक्षाच्या नगरसेवकासह सर्व पक्ष नगरसेवक, उपाध्यक्षा कांचन कोडवानी, मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने व कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)