आजाराला कंटाळून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:39 AM2019-03-01T00:39:51+5:302019-03-01T00:40:51+5:30
आजाराने त्रस्त झालेल्या एका तरुणाने वैनगंगा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सदर तरुण आयटीआय प्रशिक्षित असून एका फटाका दुकानात काम करीत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आजाराने त्रस्त झालेल्या एका तरुणाने वैनगंगा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सदर तरुण आयटीआय प्रशिक्षित असून एका फटाका दुकानात काम करीत होता.
उमाकांत उर्फ गोलू राजकुमार निर्वाण (२३) रा. चांदणी चौक भंडारा असे मृताचे नाव आहे. २५ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजता तो घरुन निघून गेला. घरी परत आला नाही म्हणून शोधाशोध करण्यात आली. परंतु थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे भंडारा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली.
दरम्यान मंगळवारी वैनगंगा नदीच्या मोठा पुलावर त्याचा चष्मा आणि चप्पल आढळून आली. उमाकांतने नदीत उडी तर घेतली नसावी ना म्हणून शोध सुरु झाली. बोटीच्या सहाय्याने मंगळवार व बुधवार दोन दिवस शोध घेवूनही थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान गुरुवारी सकाळी ७.३० वाजता नातेवाईक पुन्हा या परिसरात शोधण्यासाठी गेले, तेव्हा वैनगंगेच्या पुलाजवळ उमाकांतचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती कारधा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. उमाकांत हा गत काही दिवसांपासून डोके दुखत असल्याचे सांगत होता. त्यामुळे येथील एका तज्ज्ञ डॉक्टरांकडे त्याच्यावर उपचारही करण्यात आले. मात्र डोकेदुखीतून सुटका होत नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. त्याच्यामागे आई-वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.