धुळवडीनंतर वैनगंगेत पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 12:40 PM2022-03-19T12:40:31+5:302022-03-19T12:43:29+5:30
धूलिवंदनाचा आनंद घेतल्यांनंतर आपल्या मित्रांसोबत माडगी वैनगंगा नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या तरुणाचा नदी पात्रातील पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू झाला.
तुमसर (भंडारा) : धुळवडीच्या दिवशी मित्रासोबत माडगी येथील वैनगंगा नदीवर पोहायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी(दि. १८) दुपारी १२ च्या सुमारास घडली.
चाहूल हरीश इलमे(१८) रा. बजाज नगर तुमसर असे मृत तरुणाचे नाव आहे. आपल्या चार ते पाच मित्रासोबत तो माडगी येथील वैनगंगा नदीपात्रात पोहायला गेला होता. तिसऱ्या रेल्वे ट्रॅकच्या मोठ्या कॉलमजवळ खोल पाणी आहे. नदीपात्रात उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चाहूल गटांगळ्या खाऊ लागला. दरम्यान, त्याचे मित्र मदतीकरिता धावले.. त्यांनी आरडाओरड केली. परंतु, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
मित्रांनी चाहूलच्या काकाच्या मुलाला मोबाईलवर ही माहिती दिली. कुणाल ईलमे तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर माडगी येथील कोळी बांधवांना बोलावून चाहूलला पाण्यातून काढण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. सदर घटनेची नोंद करडी पोलिसांनी घेतली असून पुढील तपास करडी पोलीस करीत आहेत.