युवा दिनी तरूण करणार सदभावना जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:29 AM2021-01-02T04:29:23+5:302021-01-02T04:29:23+5:30
भंडारा : आदर्श राष्ट्रवादाची प्रेरणा देणारे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून काही युवक सद्भावना जागर करणार आहेत. यात ...
भंडारा : आदर्श राष्ट्रवादाची प्रेरणा देणारे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून काही युवक सद्भावना जागर करणार आहेत. यात जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेऊन प्रमुख तीन समस्यांचे निवेदनही ते देणार आहेत. यासंदर्भात शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्था खराशीने पुढाकार घेतला आहे. संस्थापक डमदेव कहालकर यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविला जाणार आहे.
भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दिघोरी (मोठी) ते भंडारा हे ५०किलोमीटर अंतर दिनांक १२ जानेवारी रोजी पायी चालून तरुण सद्भावना जागर करणार आहेत. यात सद्भावना ज्योत घेऊन ते भंडारा येथील त्रिमूर्ती चौकापर्यंत प्रवास करणार आहेत. आदर्श राष्ट्र निर्माणाचा संदेश देत युवक भंडारा येथे पोहोचल्यानंतर ते विविध नागरिकांनाही याबाबतीत मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्तेही त्यांचे स्वागत करतील. यासंदर्भात शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्थेचे संस्थापक डमदेव कहालकर यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत या विषयावर चर्चा केली. तसेच आतापर्यंत संस्थेने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. व्यसनमुक्ती, स्वच्छता, योग व प्राणायाम व मानव कल्याण या बाबतचा वृत्तांतही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितला. जिल्हाधिकाऱ्यांनीही याबाबतीत त्यांचे म्हणणे ऐकून घेत केलेल्या उपक्रमाला दाद दिली. भंडाऱ्यात तरुण दाखल झाल्यावर सदर तरुण जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करणार आहेत. यात प्रत्येक खेडेगावात नागपूर शहराच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान किंवा बगिचा निर्माण करावा, शहरांप्रमाणे झोनवाईज किंवा गावांप्रमाणे त्याच गावात आधुनिक व्यायामाची साधने किंवा व्यायामशाळा निर्माण करावीत, सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी पडतील अशी पुस्तके उपलब्ध असणारे ग्रंथालय निर्माण करावे, अशा आदर्श मागण्यांचा समावेश यामध्ये राहणार आहे. स्वामी विवेकानंद यांची जयंती व राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांच्या जयंतीनिमित्त सदर कार्यक्रम पार पडणार आहे, हे येथे उल्लेखनीय.
बॉक्स
जिल्हाधिकाऱ्यांची अशीही सहृदयता
संस्थेचे संस्थापक डमदेव कहालकर या संदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांची भेट घेतली तसेच विविध उपक्रम राबवण्यात संदर्भात विश्रामगृह येथे राहण्याची परवानगी त्यांनी संबंधित विभागाकडे मागितली होती. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीचे कारण सांगून संबंधित विभागाने त्यांना विश्रामगृहात राहण्यास मनाई केली. यासंदर्भात कहालकर यांनी जिल्हाधिकारी यांना ही बाब सांगितली. यावर जिल्हाधिकारी कदम यांनी तात्काळ कहालकर यांची राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेला निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या सहृदयतेबद्दल आदर्श शिक्षक कहालकर यांनी त्यांचे आभार मानले.