तलाव पुनरूज्जीवनासाठी प्रशासन उपाययोजना शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:00 AM2020-02-21T06:00:00+5:302020-02-21T06:00:38+5:30
भंडारा जिल्ह्यात १३०० च्या वर तलाव आहेत. माजी मालगुजारी तलावांची सध्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. परंतु निधीअभावी या तलावांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक गावात एक तलाव हमखास आहे. या तलावातील पाण्याचा उपयोग सिंचनासोबत भूगर्भातील जलस्तर वाढण्यात होतो. मात्र अलिकडे या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारातील गावागावांतील तलावांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रशासनाच्या उपाययोजना शून्य दिसत आहेत. संभाव्य पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात जिल्ह्यातील तब्बल ६१७ गावांचा समावेश आहे. वेळीच या तलावांचे पुनरूज्जीवन केल्यास कृती आराखड्यातील लाखो रुपयांचा निधी वाचू शकतो. परंतु दरवर्षी कृती आराखडा तयार करणारे प्रशासन तलावांच्या पुनरूज्जीवनाकडे मात्र लक्ष देत नसल्याचे वास्तव आहे.
भंडारा जिल्ह्यात १३०० च्या वर तलाव आहेत. माजी मालगुजारी तलावांची सध्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. परंतु निधीअभावी या तलावांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक गावात एक तलाव हमखास आहे. या तलावातील पाण्याचा उपयोग सिंचनासोबत भूगर्भातील जलस्तर वाढण्यात होतो. मात्र अलिकडे या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पावसाळ्यात तुडूंब दिसणारे तलाव उन्हाळा आला की कोरडे पडायला लागतात. जिल्ह्यातील या तलावातील गाळ काढण्यासाठी तीन वर्षापूर्वी विशेष उपाययोजना करण्यात आली. परंतु ती प्रभावीपणे राबविण्यात आली नाही.
आता उन्हाळ्याची चाहूल लागली असून जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा बसणार आहेत. एकीकडे शासनाने भंडारा जिल्हा टँकरमुक्त म्हणून घोषीत केला आहे. परंतु जिल्ह्यातील तब्बल ६१७ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होणार असल्याचे खुद्द पाणीटंचाईच्या कृती आराखड्यातच दिसत आहे. प्रशासनाने १२ लाख ९० हजार रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. त्यात विहिर खोलीकरण, गाळ काढणे, विहिरींचे अधिग्रहण, नळयोजनांची दुरुस्ती, विंधन विहिरींची दुरुस्ती, नवीन विंधन विहिर, नवीन कूपनलीका आदींचा समावेश आहे.
मात्र मालगुजारी काळापासून गावाजवळ असलेल्या तलावांकडे दुर्लक्ष होत आहे. पूर्वी अथांग दिसणारे तलाव आता डबक्यासारखे दिसत आहे.
शासनाकडे निधीची मागणी करूनही पुरेसा निधी मिळत नाही. अनेक तलावांवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. २५ ते ३० हेक्टरचे असणारे तलाव आता २ ते ३ एकरात सामावले आहेत. या तलावांच्या पुनरूज्जीवनासाठी विशेष प्रयत्न केले तर भंडारा जिल्ह्यातील पाणीटंचाई संपुष्टात येईल आणि सिंचनासाठीही मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.
३०० वर्षापूर्वीचे मामा तलाव
भंडारा परिसरावर ३०० वर्षापूर्वी गोंड राजाचे साम्राज्य होते. आजही त्याच्या पाऊलखुणा दिसून येतात. साधारणत: ३०० वर्षापूर्वी या तलावांची निर्मिती करण्यात आली. पूर्वी सर्वाधिक तलाव भंडारा जिल्ह्यात होते. आता जिल्ह्याचे विभाजन झाल्याने साधारणत: १३०० तलाव आजही जिल्ह्यात आहेत. या सर्व तलावांना माजी मालगुजारी अर्थात मामा तलाव म्हणून ओळखले जाते.