सत्तेच्या सारीपाटात जि. प. अध्यक्षांना ‘चेकमेट’!

By admin | Published: January 7, 2017 12:31 AM2017-01-07T00:31:35+5:302017-01-07T00:31:35+5:30

बुध्दीबळाच्या खेळात राजा आणि वजीर यांच्यासारखे महत्त्वाचे स्थान जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असते.

Zilla in the alliance of power Par. Chakmets 'checkmate'! | सत्तेच्या सारीपाटात जि. प. अध्यक्षांना ‘चेकमेट’!

सत्तेच्या सारीपाटात जि. प. अध्यक्षांना ‘चेकमेट’!

Next

प्रकरण लघु पाटबंधारे विभागाचे : अधीक्षक अभियंत्यांच्या मार्गदर्शनापूर्वीच आॅर्डर
प्रशांत देसाई भंडारा
बुध्दीबळाच्या खेळात राजा आणि वजीर यांच्यासारखे महत्त्वाचे स्थान जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असते. मात्र, येथील पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत ‘लॉबिंग’ सुरू आहे. लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंतापदाचा प्रभार देण्याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सीईओ यांनी वेगवेगळी नावे समोर केली. यात अध्यक्षांनी सुचविलेले नाव कापून अधिकाऱ्यांनी त्यांना ‘चेकमेट’ केले.
बुध्दीबळात राजा एक घर, वजीर तिरपा व सरळ, उंट तिरपा, हत्ती सरळ, घोडा अडीच घर तर प्यादी एक घर चाल चालते. सध्या येथील जिल्हा परिषदमध्ये पदाधिकारी व अधिकारी यांच्यातही काहीसा बुध्दीबळासारखाच खेळ सुरू आहे. यात जिल्ह्याच्या विकासाला खिळ बसल्याची जाणिव होेऊ लागली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून भाग्यश्री गिलोरकर तर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एस. एल. अहिरे कार्यरत आहेत. सत्तेत कधीही राजकारणी हे ‘राजा’च्या भूमिकेत राहतात. तर प्रशासकीय अधिकारी हे ‘वजीर’ची भूमिका निभावतात. राजा हा नेहमी जिंकतो, असाच काहीसा प्रसंग प्रत्येक ठिकाणी बघायला मिळते. मात्र, जिल्हा परिषदमध्ये अधिकाऱ्यांनी येथील अध्यक्षांनाच कोंडीत पकडून त्यांना ‘चेकमेट’ दिला आहे.
प्रकरण आहे, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे. येथील कार्यकारी अधिकारी पी. एस. पराते हे २६ डिसेंबरपासून वैद्यकीय रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यापदाचा प्रभार मिळविण्यासाठी येथील काही अधिकाऱ्यांनी ‘गॉडफादर’च्या माध्यमातून ‘सेटिंग’ लावली होती. अशातच जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी आर. एच. गुप्ता यांचे तर मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. अहिरे यांनी रामदास भगत यांचे नाव पुढे केले होते. त्यामुळे या दोनपैकी एकाकडे प्रभार येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, भगत यांची विभागीय चौकशी सुरू असल्याने त्यांना प्रभार देणे सीईओंना अडचणीत टाकणारे ठरले होते. तरीही उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके यांच्या माध्यमातून भगत यांनी प्रयत्न केले होते.
इकडे भाग्यश्री गिलोरकर यांनी गुप्ता यांना प्रभार देण्याचा आग्रह सोडला नव्हता. अशास्थितीत लघु पाटबंधारे विभागाचा कार्यभार १० दिवसांपासून कार्यकारी अभियंता यांच्याखेरीज सुरू होता. त्यामुळे कामांचा पूर्णपणे खोळंबा झालेला आहे. याबाबत सीईओंनी अधिक्षक अभियंता यांना भगत आणि गुप्ता यांच्यापैकी कोणाकडे प्रभार सोपवायचे याबाबत मार्गदर्शन मागितले होते.
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या माध्यमातून गुप्ता यांच्याकडे पदभार जाईल, अशी शक्यता वाढल्याने अधिकाऱ्यांची ‘लॉबी’ एकत्र आली व त्यांनी यातून एक सुवर्णमध्य काढत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एन. शेळके यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला.
दरम्यान याबाबत, सीईओ अहिरे यांनी ४ जानेवारीला पत्र काढून शेळके यांनी पराते यांच्या पदाचा कार्यभार २७ डिसेंबरपासून पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात आला. विशेष म्हणजे, मार्गदर्शन मागितल्यानंतर ते आले की, नाही याबाबत कुणाला काही माहित नाही. मार्गदर्शनापूर्वीच शेळके यांच्याकडे प्रभार सोपविण्याची अधिकाऱ्यांनी केलेली घाई संशयास्पद आहे. यात अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या माध्यमातून गुप्ता यांच्याकडे प्रभार देऊन त्यांना विजयी होऊ द्यायचे नव्हते. भगत यांच्याऐवजी दुसऱ्यांना प्रभार देऊन अधिकाऱ्यांनाही स्वत:चा पराभव करायचा नव्हता, अशी परिस्थिती या प्रभारीपदाबाबत चाललेल्या कलगीतुऱ्यावरून दिसून येते.

अधिक्षक अभियंता यांचे मार्गदर्शन मागितले होते. ते येण्यापूर्वीच सीईओंनी शेळके यांच्याकडे प्रभार देण्यासाठी केलेली घाई अनाकलनीय आहे. अधिकाऱ्यांची मुजोरी यापुढे आता खपवून घेतली जाणार नाही. सिंचन विभागाच्या तांत्रिक बाबी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना समजेल का? याची साशंकता आहे. याबाबत १३ जानेवारीला होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत अधिकाऱ्यांना विचारण्यात येईल.
- भाग्यश्री गिलोरकर, अध्यक्ष, जिल्हा परिषद, भंडारा.

Web Title: Zilla in the alliance of power Par. Chakmets 'checkmate'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.