जिल्हा परिषद प्रशासनाला २२ दिवसांचा अल्टिमेटम
By admin | Published: April 8, 2017 12:24 AM2017-04-08T00:24:40+5:302017-04-08T00:24:40+5:30
ग्रामपंचायतीने दिव्यांग (अपंग) बांधवांवर तीन टक्के निधी खर्च करण्याचे शासन अध्यादेश आहे. मात्र, जिल्ह्यातील अपंगांना या निधीचा लाख दिला नसल्याने लाखोंचा निधी अखर्चित आहे.
दिव्यांगांचे आक्रोश आंदोलन : बच्चू कडूंचा इशारा, सीईओ-समाजकल्याण अधिकाऱ्यांची कानउघाडणी
भंडारा : ग्रामपंचायतीने दिव्यांग (अपंग) बांधवांवर तीन टक्के निधी खर्च करण्याचे शासन अध्यादेश आहे. मात्र, जिल्ह्यातील अपंगांना या निधीचा लाख दिला नसल्याने लाखोंचा निधी अखर्चित आहे. हा निधी जिल्हा परिषद प्रशासनाने अपंग बांधवांवर खर्च करावा, अशा सुचना आमदार बच्चू कडू यांनी दिल्या. दरम्यान त्यांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण अधिकारी व अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून शुक्रवारला अपंग बांधवांचा जिल्हा परिषदेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आलेल्या आमदार बच्चू कडूंच्या ‘फैसला आॅन दी स्पॉट’ कार्यक्रमात त्यांनी अधिकाऱ्यांना सुचना वजा इशारा दिला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांच्यासह समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून अपंग बांधवांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील शेकडो अपंग बांधव सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व आमदार बच्चू कडू यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
अपंग बांधवांना मिळणार न्याय
भंडारा : अपंग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी हनुमंत झोटींग, गजू कुबडे, विजय पाखमोडे, रवि मने, धनराज घुमे, रमेश खेडकर, उमेश राऊत, प्रशांत शिवणकर, योगेश घाटबांधे, विनायक पुडके यांच्यासह शेकडो बांधव उपस्थित होते. मार्चा जिल्हा परिषदमध्ये दाखल झाल्यावर सभागृहात त्यावर चर्चा झाली.
यात आमदार बच्चू कडू यांनी, मुख्य कार्यकारी अधिकारी व समाजकल्याण अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी अपंग बांधवांनी त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याची कैफियत अनेकांनी मांडली. यावर आमदार कडू उद्वीग्द झाले. त्यांनी जिल्ह्यातील सर्व अपंग बांधवांची नोंदणी करण्याच्यादृष्टिने पंधरवाडा राबवा व त्याचा आढावा दर महिन्याला घेण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या.
यासाठी जनजागृती करण्याच्या सुचनाही यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, भंडाराचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (शहर प्रतिनिधी)
अनेक समस्या निकाली काढल्या
अपंगांच्या अनेक समस्या आवासून आहेत. यात घरकुल हा प्रमुख मुद्दा होता. तर अनेकांना विवाहानंतरही त्यांचा शासकीय निधी मिळाला नसल्याची बाब समोर आली. अपंग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी अ, ब, क, ड या प्रक्रियेनुसार वर्गवारी करून सर्वांना शासकीय योजनांचा लाभ देण्याच्य सुचना यावेळी आमदार कडू यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. एका अधिकाऱ्याने तर अपंग बांधवांना योजनांचा लाभ दिल्याचे सांगितले. यावर त्यांना लाभार्थ्यांची यादी मागितली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. तर एका अधिकाऱ्याने तर शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा करण्यात येत असतानाही निधी मिळाला नाही, असे सांगून वेळमारून नेण्याचा प्रयत्न केला. यावर आमदार कडू यांनी संबंधीत अधिकाऱ्यांनी शासनाकडे केलेल्या पाठपूराव्याचे कागदपत्राची मागणी केली असता, त्यांनीही ते देण्याचे टाळले. एकंदरितच आमदार बच्चू कडू यांच्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.
-तर ग्रामसेवकांवर कारवाई
ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीपैकी किंवा उत्पन्नापैकी तीन टक्के निधी अपंग बांधवांवर खर्च करावयाचा आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये याचा लाभ अद्याप कुणालाही मिळाला नसल्याची गंभीर बाब समोर आली. यामुळे आमदार कडू यांनी ३० एप्रिलपर्यंत प्रत्येक ग्रामसेवकाने हा निधी खर्च करावा, अन्यथा त्याच्यात हयगय करणाऱ्या ग्रामसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. अपंगांची हेळसांड किंवा त्यांना शिविगाळ केल्यास अॅक्ट्रासिटीअंतर्गत गुन्हा नोंदविण्याची दरतूद असल्याचेही कडू यांनी सांगितले. सर्व अधिकाऱ्यांनी योजनांचा लाभ देण्यासाठी यादी अद्यावत करण्याच्या सुचनाही दिल्या.
समाजकल्याण अधिकाऱ्यांची पळापळी
जिल्ह्यातील अपंगबांधवांना लघू उद्योगासाठी निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती यावेळी समाजकल्याण अधिकारी यांनी सभागृहात सांगितली. यावेळी उपस्थित बांधवांनी आक्रोश करून निधी मिळालाच नसल्याची तक्रार लावून धरली. यावर आमदार कडू यांनी समाजकल्याण अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तर ग्रामपंचायत तीन टक्के निधी अपंगांवर खर्च करण्यात नसल्याची बाब समोर आल्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांनाही चांगलेच खडेबोल सुनावले. ही निधी ३० एप्रिलपर्यंत खर्च करण्याच्या सुचना देण्यात आल्या. अपंगांच्या प्रलंबीत समस्यांना घेऊन आमदार कडू यांनी समाजकल्याण अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने अपंग बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले तर अधिकाऱ्यांची चांगलीच पळापळी झाली.