जिल्हा परिषदेत रंगले प्रभारी पदाचे नाट्य!

By admin | Published: June 16, 2016 12:43 AM2016-06-16T00:43:55+5:302016-06-16T00:43:55+5:30

लघु पाटबंधारे विभागातील कारभाराचे दररोज नवनवे किस्से बाहेर येत आहेत. या प्रकरणांमुळे धास्तावलेले कार्यकारी अभियंता पी. एस. पराते मंगळवारला रात्री रजेवर गेले.

Zilla Parishad plays in charge drama! | जिल्हा परिषदेत रंगले प्रभारी पदाचे नाट्य!

जिल्हा परिषदेत रंगले प्रभारी पदाचे नाट्य!

Next

प्रकरण लघु पाटबंधारे विभागाचे : कनिष्ठाला दिली जबाबदारी, धास्तावलेले कार्यकारी अभियंता रजेवर,
प्रशांत देसाई भंडारा
लघु पाटबंधारे विभागातील कारभाराचे दररोज नवनवे किस्से बाहेर येत आहेत. या प्रकरणांमुळे धास्तावलेले कार्यकारी अभियंता पी. एस. पराते मंगळवारला रात्री रजेवर गेले. एक दिवसापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना रजेची परवानगी नाकारली होती. त्यामुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी पराते यांची रजा व प्रभार देण्याची ‘फाईल’ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे नेऊन त्यांना रजेवर पाठविण्यासाठी प्रयत्न केले. पदाचा प्रभार कनिष्ठ कर्मचाऱ्याला देऊन ते रजेवर गेले.
एक चूक लपविण्यासाठी शंभरावर चुका होतात; ही म्हण प्रचलित आहे. सध्या ही म्हण लघु पाटबंधारे विभागातील कारभाराला तंतोतंत लागू पडत आहे. लघु पाटबंधारे विभागातील कामांच्या निविदांसह विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याने ‘लोकमत’ने हे प्रकरण उघडकीस आणले आहे.
हे प्रकरण चव्हाट्यावर आल्याने प्रशासनात खळबळ उडाली व निविदाच रद्द करण्यात आली. त्यानंतर अतिरिक्त कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी कंत्राटदारांना धारेवर धरताना, मजुरांचा विमा न काढल्यास देयक मिळणार नाही; अशी तंबी दिली होती. त्यामुळे काही कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता यांना काम बंद करीत असल्याचे पत्र दिले आहे.
बुधवारला जिल्हा परिषदेत स्थायी समितीची बैठक होती. शुक्रवारला सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकमत’ने प्रकरण उघडकीस आणल्याने या दोन्ही सभेत जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य हा मुद्दा उपस्थित करून धारेवर धरतील या धास्तीने पराते यांनी सोमवारला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना रजा मंजूर करावी, अशी विनंती केली होती.
मात्र, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जलयुक्त शिवार योजनेची अपूर्णावस्थेतीतल कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याचा ‘अल्टीमेटम’ दिल्याने पराते यांची रजा नामंजूर केली. मात्र, मंगळवारला रात्री ७.३० वाजताच्या सुमारास नाट्यमयरित्या पराते यांची रजा मंजूर करून उपविभागीय अभियंता भगत यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आला.
एक दिवसापूर्वी रजा नामंजूर करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पराते यांची रजा मंजूर झाल्याने हा विषय चर्चेचा झाला आहे.

फाईलबाबत बाळगली गोपनीयता
शासकीय कार्यालयातील पत्रव्यवहार, शासकीय कामकाज किंवा महत्वाच्या फाईल हाताळण्याच्या जबाबदारीसाठी एक पद निर्माण केले आहे. त्या नियमानुसार, कार्यकारी अभियंता यांची रजा किंवा त्यांच्या प्रभाराची फाईल ही रितसर मार्गाने जाणे गरजेचे होते. परंतु सदर फाईलवर रजा व प्रभार पदाची नोट ही स्वत: पराते यांनी अधिनस्थ कर्मचाऱ्याकडून लिहीली. त्यानंतर ती फाईल स्वत: पराते यांनी भोर यांच्याकडे व भोर यांनी निंबाळकर यांच्याकडे नेली.

कार्यकारी अभियंता पराते यांनी रजेचा अर्ज सोमवारला दिला होता. परंतु रखडलेली कामे मार्गी लावण्याची तरतुद अगोदर करावी, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार पराते यांची बुधवारपासून रजा मंजूर केली. मी स्वत: फाईल नेली नाही, ती अगोदरच त्यांच्याकडे होती. त्यावर साहेबांनी कधी स्वाक्षरी केली मला माहित नाही. साहेबांनी मंगळवारला रात्री बोलविल्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो होतो. कार्यालयीन चौकशी सुरू असताना प्रभार देता येतो. त्यासाठी पदाधिकाऱ्यांना विचारण्याची कायद्यात तरतूद नाही.
- जगन्नाथ भोर
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा.

Web Title: Zilla Parishad plays in charge drama!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.