जिल्हा परिषद विश्रामगृह झाले इतिहासजमा
By admin | Published: August 2, 2015 12:48 AM2015-08-02T00:48:54+5:302015-08-02T00:48:54+5:30
स्थानिक गांधी चौकात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे विश्रामगृह अत्यंत दयनिय स्थितीत उभे आहे.
शोभेची ब्रिटिशकालीन वास्तू : गतकालीन वैभव प्राप्त होण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज, नव्याने बांधणी करणे गरजेचे
अशोक पारधी पवनी
स्थानिक गांधी चौकात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे विश्रामगृह अत्यंत दयनिय स्थितीत उभे आहे. इमारत विश्राम गृहाची असली तरी ते विश्रामगृह सद्यस्थितीत इतिहासजमा झालेले आहे. पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय कार्यालय तेथे स्थानांतरीत करण्यात आलेले आहे.
गेल्या ३५ वर्षांपूर्वी पवनी तालुक्याचे ठिकाण नव्हते त्यावेळी जिल्हा परिषद विश्रामगृह 'सराम' या नावाने प्रसिद्ध होते. त्यावेळी लोकांची गाऱ्हाणी ऐकूण घेण्यासाठी जिल्हास्तरावरून अधिकारी महिन्याकाठी 'सराय'मध्ये येवून बसत होते. ग्रामीण जनतेच्या समस्या ऐकल्या जात होत्या. विश्रामभवनाच्या वऱ्हांड्यात त्यावेळी लोकांची वर्दळ असायची. काळात बदल झाला. अधिकारी सभांमध्ये व्यस्त झाले. पवनी तालुक्याचे ठिकाण झाले. लोकांना फारस्या समस्या उरल्या नाहीत. त्यामुळे सरायची गरज संपली. त्याचे विश्रामगृहात रूपांतर झाले. अलिकडे विश्रामगृहाची सुद्धा गरज ठरली नसावी. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. विश्रामगृह डागडुजी करून वापरण्यायोग्य राहीले नाही. त्याची नव्याने बांधणी करणे गरजेचे आहे. चार-पाच वर्षापुर्वी विश्रामगृह निर्लेखित करून नव्याने बांधकाम करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने पारित केल्याचे ऐकिवात आहे. परंतु अंमलबजावणी झालेली नाही.
विश्रामगृहाची पुन:बांधणी करायची म्हणजे बांधकामाचे मंजूरीपासून सर्व सोपस्कार करावे लागणार आहेत. पवनी शहरातील ऐतिहासिक गेटपासून ३०० मीटरपर्यंत बांधकामासाठी पुरातत्व विभाग परवानगी देत नाही. विश्रामगृह अवघ्या ५० मीटरच्या आंत आहे म्हणजे शासकीय बांधकामांनासुद्धा पुरातत्व विभागाची परवानगी मिळणार नाही आणि जिल्हा परिषदेने तरतुद जरी केली तरी सहजरित्या बांधकाम करता येणार नाही. त्यामुळे दोन सुट असलेले ब्रिटीशकालीन विश्रामगृह अखेर इतिहासजमा झाले, असे मानल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
विश्रामगृहाचे भवितव्य राजकारणातील सक्तींच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. ठोस पावले उचलली तर विश्रामगृहाला गतकालीन वैभव प्राप्त होण्यास विलंब लागणार नाही हे मात्र खरे आहे.