जिल्हा परिषदेचा ‘मार्च एंडिंग’ संपेना!

By admin | Published: July 13, 2017 12:24 AM2017-07-13T00:24:01+5:302017-07-13T00:24:01+5:30

शीर्षक वाचून आश्चर्य वाटते ना! होय, हे सत्य आहे. एव्हाना कामासाठी चालढकल करणारे कर्मचारी आता पूर्णत: ‘लेटलतीफ’ असल्याचे दिसून येत आहे.

Zilla Parishad's 'March Ending' ends! | जिल्हा परिषदेचा ‘मार्च एंडिंग’ संपेना!

जिल्हा परिषदेचा ‘मार्च एंडिंग’ संपेना!

Next

कामे पूर्ण होण्यापूर्वीच धनादेशाचे वितरण : कोट्यवधींच्या निधीची गोळाबेरीज सुरू
प्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शीर्षक वाचून आश्चर्य वाटते ना! होय, हे सत्य आहे. एव्हाना कामासाठी चालढकल करणारे कर्मचारी आता पूर्णत: ‘लेटलतीफ’ असल्याचे दिसून येत आहे. आर्थिक वर्ष संपून आता तीन महिन्यांचा कालावधी लोटत असतानाही जिल्हा परिषदेत आताही मार्च एंडिंगचा लेखाजोखा जुळविण्यावर भर देण्यात येत आहे.
राज्य शासनाकडून दरवर्षी जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या विविध विभागाच्या योजनांसाठी कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीतून जिल्ह्यातील ग्रामीण भागात पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती तसेच सभापती यांनी सुचविलेले विकासाची कामे तसेच लाभार्थ्यांना अनुदान स्वरूपात विविध साहित्य वाटप केले जाते. यावर कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. यासाठी मात्र शासनाने खर्च व योजनांची अंमलबजावणी याकरिता वेळापत्रक ठरवून दिला आहे. ही सर्व कामे आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत होणे अपेक्षित आहे. यासाठी ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असतो. त्यामुळे या कालावधीत निधी खर्च होणे क्रमप्राप्त ठरते. असे असताना शासनाच्या धोरणानुसार आर्थिक वर्षातील खर्चाचा लेखाजोखा मार्च एंडिंगपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये बांधकाम, समाज कल्याण, महिला व बालकल्याण, कृषी व पशुसंवर्धन, शिक्षण, पाणीपुरवठा, सिंचन, आरोग्य अशा सर्वच विभागांना राज्य शासन, जिल्हा नियोजन समिती व जिल्हा निधीमधून योजनांसाठी उपलब्ध होणाऱ्या कोट्यवधी रूपयांतून ही सर्व कामे केली जातात. मात्र दरवर्षीप्रमाणे चालू आर्थिक वर्षातील कामे तर केली जातात. याशिवाय मागील वर्षातील जुनी कामेसुद्धा याच धामधुमीत उरकवून घेण्याचा प्रकार जिल्हा परिषदेत नित्याचा झाला आहे.
यावर्षी सन २०१६-१७ मधील आर्थिक वर्षातील जिल्हा परिषदेत आर्थिक व्यवहार शासकीय आर्थिक वर्ष ३१ मार्च हा संपवून तीन महिन्यांचा अवधी लोटूनही जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना व विकासकामांची मार्च एंडिंगची प्रशासकीय कारवाई जिल्हा परिषदेत अद्यापही सुरू आहे. सध्या झेडपीचा मार्च एडींग संपता संपेना, अशी प्रचिती येऊ लागली आहे. तर अधिकारी वित्तीय वर्षाच्या हिशोबाचा शेवट झाल्याचे सांगत आहे. मात्र, या वर्षात खर्च केलेला निधी प्रत्यक्ष कामांवर झाला का? हा संशोधनाचा विषय आहे.

‘लघु’ पाटबंधारेचे अडले घोडे
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सिंचनाची जबाबदारी असलेल्या लघु पाटबंधारे विभागातील कामे ३० जूनपर्यंत करावयाचे होते. मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार योजनेवर भर दिल्याने यावरील निधी पूर्ण खर्च करण्याचे प्रशासकीय यंत्रणेचे निर्देश आहे. त्यामुळे या योजनेच्या निधीच्या खर्चाच्या हिशोबाचा ताळमेळ सर्वात शेवटी करण्यात येत आहे. यातील अनेक कामे अपूर्ण असताना त्यावरील दाखविलेल्या खर्चाचे धनादेश देण्यात आले आहे. तर अनेक कामे केवळ कागदोपत्री असतानाही धनादेश काढल्याची चर्चा आता होत आहे.
नवीन विकासकामांना वेळ
जिल्हा परिषदेत अद्यापही मार्च एंडींगची प्रशासकीय कारवाई सुरू आहे. त्यामुळे जुनीच कामे सुरू आहेत. परिणामी सन २०१६-१७ या नवीन आर्थिक वर्षातील विकासकामे, योजनांबाबत नव्याने प्रशासकीय कारवाई करण्याची तसदी जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेली नाही. उलट जुनेच कामे आटोपण्याचा एकमेव कार्यक्रम सध्या जिल्हा परिषदेत सुरू आहे. त्यामुळे नवीन कामे केव्हा सुरू होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मार्च एंडिंगची कामे पूर्णपणे झालेली असून आठवडा भरापूर्वीच हिशोब झाला असून आता दिलेल्या धनादेशाच्या रक्कमेचा ताळमेळ सुरू आहे.
- अशोक मातकर,
मुख्य वित्तअधिकारी, जि.प.

Web Title: Zilla Parishad's 'March Ending' ends!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.