जि.प. चा ८.७१ कोटींचा शिलकीचा अंदाजपत्रक
By admin | Published: March 19, 2017 12:18 AM2017-03-19T00:18:35+5:302017-03-19T00:18:35+5:30
स्वराजस्वाचे जमा व खर्चाचे सन २०१६-१७ चे ८ कोटी ७१ लाख ४२ हजार ६०० रूपयांचे जिल्हा परिषदेचे अंतिम सुधारित अंदाजपत्रक असून ....
व्यापारी संकुल बांधणार : व्याजातून होणार क्षेत्र विकास
भंडारा : स्वराजस्वाचे जमा व खर्चाचे सन २०१६-१७ चे ८ कोटी ७१ लाख ४२ हजार ६०० रूपयांचे जिल्हा परिषदेचे अंतिम सुधारित अंदाजपत्रक असून यात प्रत्यक्ष १ कोटी २१ लाख ८,५०० रूपयांच्या शिलकीचे अंदाजपत्रक आहे. तर अंतिम सुधारित व सन २०१७-१८ चे ६ कोटी ७१ लाख १७ हजार ५०० रूपयांचे प्रस्तावित अंदाजपत्रक सादर करण्यात आले. जिल्हा परिषद ‘बजेट’ची सर्वसाधारण सभा शुक्रवारला पार पडली. या सभेत अर्थ सभापती राजेश डोंगरे यांनी हे अंदाजपत्रक सभागृहात मांडले.
जिल्हा परिषदच्या उत्पन्नासाठी वाढीसाठी २२ विभागातून महसूल प्राप्त होत असतो. यातून मिळणारे महसुली जमा व महसूल प्रारंंभिक शिलकेसह सादर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर या होत्या. यावेळी उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती राजेश डोंगरे यांनी शिलकीचा अंदाजपत्रक सादर केला. या अर्थसंकल्पीय सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातकर, सभापती नरेश डहारे, सभापती विनायक बुरडे, सभापती शुभांगी रहांगडाले, सभापती नीळकंठ टेकाम यांच्यासह सर्व सदस्य व सातही पंचायत समितीचे सभापती व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
शिलकीचा अंदाजपत्रक सादर करताना अर्थ सभापती राजेश डोंगरे यांनी, जिल्हा परिषदला प्राप्त होणाऱ्या निधीचा माहिती दिली.
यात जिल्हा परिषदेच्या विविध प्रकारच्या २२ विभागातून जिल्हा परिषदला मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती दिली. शिलकीच्या अंदाजपत्रकात सन २०१६-१७ चे अंतिम सुधारित अंदाजपत्रक योजनेत्तराचे ८ कोटी ७१ लाख ४२ हजार ६०० रूपयांचा सादर केला. तर २०१७-१८ चे प्रस्तावित अंदाजपत्रक योजनेत्तरात ६ कोटी ७१ लाख १७ हजार ५०० रूपयांचे सादर करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)
दोन लाखांचा क्षेत्र विकास निधी
जिल्हा परिषद क्षेत्राच्या विकासाकरिता प्रत्येक सदस्यांना दोन लाखांचा विशेष निधी देण्यात येणार आहे. याबाबत अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर व बांधकाम सभापती विनायक बुरडे यांनी ही आग्रही भूमिका मांडली. याला सर्वानुमती संमती देऊन ठराव पारित करण्यात आला. यासाठी जिल्हा निधीची हस्तांतरण, अभिकरण निधी जी वैनगंगा कृष्णा कोंकण ग्रामीण बँकेत जिल्हा परिषदने ८ कोटी २ लाख १२ हजार ११६ रूपये सुरक्षित ठेवली आहे. या रक्कमेच्या व्याजाचा वापर विकास निधीसाठी करण्यात येईल. बँकेकडे ७.७५ टक्के व्याजदराने ही रक्कम सुरक्षित ठेवली आहे.
बीओटी तत्वावर होणार व्यापारी संकुल
जिल्हा परिषदचे उत्पादन वाढविण्यासाठी व शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद आता बीओटी तत्वावर तीन ठिकाणी शॉपिंग कॉम्पलेक्सचे बांधकाम करणार असल्याचा ठराव या सभेत पारित करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षांचे निवासस्थान परिसर, लालबहादूर शास्त्री विद्यालय आणि पवनी येथील मोडकळीस आलेले विश्रामगृह, या ठिकाणी बीओटी तत्वावर हे दुकान गाळे बांधण्यात येणार आहे. यामुळे उत्पादन वाढून स्थायी रोजगार मिळेल.
सदस्यांना प्रवास बॅग तर कर्मचाऱ्यांवर गडांतर
पाच वर्षातून एकदा जिल्हा परिषद सदस्यांना किमान तीन हजार रूपये किंमतीची प्रवास बॅग भेट द्यायची या सबबीखाली ५२ सदस्य व सात पंचायत समितीचे सभापतींना प्रवास बॅग भेट देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुद्रणालयात कार्यरत दोन कर्मचाऱ्यांना मुद्रणालयाचे काम होत नाहीत. काही छापून आणायचे असल्यास बाहेरून आणावे लागते. त्यामुळे या दोन्ही कर्मचाऱ्यांना शासनाने अन्यत्र सामावून घ्यावे, असा ठराव पारित करण्यात आला.
जिल्ह्याच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून हे अंदाजपत्रक सादर केले. ग्रामीण विकासाची घडी बसविण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद प्रशासन करणार आहे. सोबतच उत्पादन वाढ व क्षेत्राच्या विकासासाठी सदस्यांना निधी प्राप्त होणार आहे.
- भाग्यश्री गिलोरकर,
अध्यक्ष, जि.प. भंडारा.
ग्रामीण भागाची नाळ जिल्हा परिषदेशी जुळलेली आहे. जिल्हास्थळावरून कामकाज होत असले तरी, ग्रामीणांच्या विकासाला प्राधान्य द्यावे लागते. सर्वसमावेशक बाजू लक्षात घेता हे शिलकीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.
- राजेश डोंगरे,
उपाध्यक्ष, जि.प. भंडारा.