जि.प. सभापतीपदासाठी चढाओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 11:27 PM2018-01-25T23:27:38+5:302018-01-25T23:27:50+5:30
१५ जानेवारीला जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक आटोपल्यानंतर आता २८ जानेवारीला विषय समितीच्या चार पदासाठी निवडणूक होत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी असल्यामुळे ऊर्वरीत प्रत्येकी दोन पदे या दोन्ही पक्षांना मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : १५ जानेवारीला जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक आटोपल्यानंतर आता २८ जानेवारीला विषय समितीच्या चार पदासाठी निवडणूक होत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी असल्यामुळे ऊर्वरीत प्रत्येकी दोन पदे या दोन्ही पक्षांना मिळणार आहे. या पदासाठी अनेकांची आपआपल्या नेत्यांकडे मोर्चेबांधणी सुरू आहे.
अडीच वर्षांपूर्वी बांधकाम आणि समाजकल्याण विभाग काँग्रेसकडे तर शिक्षण व बालकल्याण हे विभाग राष्ट्रवादीकडे होते. आताही हेच समिकरण राहण्याची शक्यता आहे. परंतु काँग्रेसमध्ये दोन गट असल्यामुळे आणि तालुकानिहाय पदे वाटप करताना कोणते बदल होऊ शकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले होते. अखेरच्या दिवसापर्यंत युती होणार की आघाडी होणार हे निश्चित झाले नव्हते. त्यानंतर सर्वकाही सुरळीत पार पडले. आता विषय समितीची निवडणूक जशी दोन दिवसांवर आली आहे. तसे घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसमधून चित्रा सावरबांधे, रेखा वासनिक, होमराज कापगते, ज्ञानेश्वर रहांगडाले यांची नावे तर राष्ट्रवादीतून धनेंद्र तुरकर, ज्योती खवास यांची नावे चर्चेत आहेत.
मागील अडीच वर्षांच्या कार्यकाळात या ना त्या पदाधिकाºयांविरूद्ध सदस्यांमध्ये असंतोष दिसून आला असला तरी बांधकाम सभापती विनायक बुरडे यांच्या कार्यकाळात त्यांनी कुणालाही दुखावले नाही. जिल्हा परिषदेत काँग्रेसची भूमिका त्यांनी प्रभावीपणे मांडली होती. त्यामुळे विविध निर्णयात ते काँग्रेससाठी तारणहार ठरले होते. आता त्यांना पुन्हा पद मिळते का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
सभापतीपदाच्या निवडणुकीत दोन्ही गटाच्या नेत्यांनी गटबाजी न करता एकत्र येऊन योग्य निर्णय घेतला पाहिजे. सभापतीपदासाठी आपण दावेदार नसून पद मिळाले नाही म्हणून पक्ष सोडून जाणार नाही. जनतेने ज्यासाठी निवडून दिले आहे, त्यांचा सन्मान करण्यासाठी राजीमामा देणार नाही. पक्षश्रेष्ठीने सन्मान दिला तर त्यांचा अपमान होऊ देणार नाही. जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे संघटन बळकट व्हावे, हीच आपली ईच्छा आहे.
- विनायक बुरडे, बांधकाम सभापती जि.प. भंडारा.