जि.प. ईमारतीत रंगते ‘ओलीपार्टी’
By admin | Published: January 3, 2017 12:25 AM2017-01-03T00:25:50+5:302017-01-03T00:25:50+5:30
ग्रामीण विकासाचा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत अध्यक्षांच्या कक्षालगत असलेल्या मुत्रीघरात मद्याच्या रिकाम्या शिशा आढळून आल्या आहेत.
अध्यक्षांच्या कक्षालगतचा प्रकार : मुत्रीघरात आढळल्या दारुच्या रिकाम्या शिशा
प्रशांत देसाई भंडारा
ग्रामीण विकासाचा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत अध्यक्षांच्या कक्षालगत असलेल्या मुत्रीघरात मद्याच्या रिकाम्या शिशा आढळून आल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी ओल्या पार्ट्या रंगत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षालगत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र मुत्रीघर आहेत. या मुत्रीघराच्या खिडकीत कुणीतरी मद्यप्राशन करुन मद्याच्या रिकाम्या शिशा ठेवल्या आहेत. दरम्यान ही बाब आज सोमवारला समोर आली.
या दारूच्या शिशांमध्ये एक ‘देशी दारु’ची तर दुसरी ‘विदेशी दारु’ची शिशी आहे. उच्च व हलक्या दर्जाच्या मद्याच्या रिकाम्या शिशा मुत्रीघरात आढळून आल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाचे काम हलक्या व दर्जेदार स्वरूपाचे होत असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यातील नागरिक जिल्हा परिषदमध्ये विविध कामांसबंधात येत असतात. अनेकांच्या महत्त्वपूर्ण फाईल्स कर्मचारी मुद्दामपणे रेंगाळत असल्याचा आरोप नागरिकांकडून होतो. रखडलेली कामे ‘अर्थपूर्ण’ व्यवहाराशिवाय पुर्ण होत नाही. त्यामुळे अशाच कामाच्या निमित्ताने कुण्यातरी कर्मचाऱ्याने काम काढून घेण्यासाठी येथे ‘ओलीपार्टी’ केली असावी व मद्याच्या रिकाम्या शिशा मुत्रीघराच्या खिडकीत ठेवले असावे, असा कयास लावण्यात येत आहे.
मुत्रीघरात मद्याच्या रिकाम्या शिशा आढळून आल्यामुळे असा प्रकार नेहमीच घडत असावा, अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. या रिकाम्या शिशा आढळल्याने येथील कर्मचाऱ्यांवर अधिकारी तथा पदाधिकाऱ्यांचा वचक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन ठोस पाऊले उचलतील का? अशी अपेक्षा आता सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत.