जि.प. अध्यक्ष बनल्या ‘पेपर टायगर’
By admin | Published: January 5, 2017 12:35 AM2017-01-05T00:35:32+5:302017-01-05T00:35:32+5:30
जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एस. पराते हे रजेवर गेले आहे.
अधिकारी जुमानेनात : लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गेले रजेवर
भंडारा : जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एस. पराते हे रजेवर गेले आहे. त्यांचा प्रभार अद्यापही कुणाला देण्यात आला नसल्याने लघु पाटबंधारे विभागाला सध्या ‘शोधा’ असा प्रकार जिल्हा परिषदेत सुरू आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांचे अधिकारी एैकत नसल्यामुळे त्या केवळ ‘पेपर टायगर’ बनल्या आहेत.
जिल्ह्यात सिंचन सुविधा वाढविण्याची जबाबदारी लघु पाटबंधारे विभागाकडे आहे. जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावासह अन्य तलावांची देखभाल दुरूस्ती व सिंचन सुविधा करण्याची जबाबदारी या विभागाकडे आहे. या विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एस. पराते हे २६ डिसेंबरपासून रजेवर गेले आहेत. सद्यस्थितीत १० दिवसांचा कालावधी लोटला असतानाही या विभागाला कार्यकारी अभियंता मिळाला नसल्यामुळे लघु पाटबंधारे विभागाची गती मंदावली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्यासह काही पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्यांनी कार्यकारी अभियंतापदाचा प्रभार उपविभागीय अभियंता आर.एच. गुप्ता यांना देण्याच्या सुचना मुख्य कार्यपालन अधिकारी एस.एल. अहिरे यांना केल्या आहेत. मात्र येथील दुसऱ्या एका अधिकाऱ्याने यावर ‘जादूची कांडी’ फिरविल्यामुळे अधिकारी व पदाधिकारी यांच्यात मागील १० दिवसांपासून प्रभार देण्यासंदर्भात अंतर्गत कलह सुरु झाला आहे. अधिकारी हे उपकार्यकारी अभियंता रामदास भगत यांना प्रभार देण्यासाठी समर्थन करीत आहेत. तर जिल्हा परिषद अध्यक्षांनी आर. एच. गुप्ता यांच्या नावाला पसंती दिली आहे. दरम्यान रामदास भगत यांच्यावर गडचिरोली, अमरावती येथील प्रकरणांची विभागीय चौकशी सुरू असल्यामुळे ते या पदासाठी योग्य नसल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. सोबतच पवनी येथे प्रभारी पद सांभाळत असलेल्या भगत यांनी समाधानकारक कामे केले नसल्याचा आरोप आहे. सिंचन विहिरीचा अनुशेष भरुन काढण्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. मात्र त्यात ते कमी पडले. सोबतच त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त असल्याने त्यांच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी भगत यांना प्रभार देण्यासाठी विरोध दर्शविला आहे. मात्र अधिकारी त्यांच्या आदेशाला न जुमानता नागपूर येथील अधीक्षक अभियंत्यांना पत्र पाठवून मार्गदर्शन मागविले आहे. (शहर प्रतिनिधी)