धान वाचविण्यासाठी जि.प. पदाधिकारी सरसावले
By admin | Published: August 21, 2016 12:34 AM2016-08-21T00:34:40+5:302016-08-21T00:34:40+5:30
पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी असलेले धानपिक करपण्याच्या मार्गावर आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन : सिंचन प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी
भंडारा : पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी असलेले धानपिक करपण्याच्या मार्गावर आहे. अनेक ठिकाणी रोवणी खोळंबली असून पाण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे टेकेपार व करचखेडा उपसा सिंचन योजनेतील पाणी सोडून धानपिक वाचवावे, अशी आर्त जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याना निवेदन दिले आहे.
भंडारा जिल्हा तसेच करचखेडा व टेकेपार उपसा सिंचन योजनेतील लाभ क्षेत्रातील मागील काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. निसर्गराजा कोपल्याने शेतकऱ्यांचे शेतातील धानपिके हातून जाण्याच्या मार्गावर आहे. या पिकांना पाण्याची गरज आहे. पाण्याअभावी शेतातील उभी पिके करपू लागली असून अनेक ठिकाणची रोवणी अडकलेली आहे. पावसाअभावी धान लागवड यावर्षी शक्य वाटत नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा कर्जाच्या बोझ्याखाली दबण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुष्काळामुळे शेतकरी नैराश्येत जावून विपरीत कृती करण्याची भिती व्यक्त होत आहे. करीता जिल्ह्यातील बंद असलेल्या टेकेपार व करचखेडा उपसा सिंचन योजना तात्काळ सुरू करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदनातून केली आहे. यावेळी सुनिल पडोळे उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य उत्तम कळपाते, ज्योती खवास, ईश्वर कळंबे, नरेश येवले, मनिषा वाघमारे, नाना बडगे, ताराचंद भुरे, सखाराम कारेमोरे, गजानन कळंबे, संजय अहिरकर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)