जि.प. शाळांमधील किलबिलाट ६ मे पासून होणार बंद
By admin | Published: April 9, 2017 12:26 AM2017-04-09T00:26:43+5:302017-04-09T00:26:43+5:30
उन्हाची तिव्रता प्रचंड असल्याने त्याची झळ विद्यार्थी व शिक्षकांना सोसावी लागत आहे.
उन्हाळी सुट्या : शिक्षण समितीने घेतला सर्वानुमते ठराव
भंडारा : उन्हाची तिव्रता प्रचंड असल्याने त्याची झळ विद्यार्थी व शिक्षकांना सोसावी लागत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सर्व शाळांना ६ मे पासून उन्हाळी सुट्या देण्याचा ठराव घेण्यात आला. शुक्रवारी शिक्षण समितीच्या झालेल्या सभेत हा ठराव सर्वानुमते पारित केला.
उष्णतेचे वाढते प्रमाण लक्षात घेता १० मार्चला शिक्षण समितीच्या सभेत जिल्ह्यातील सर्व शाळा १५ मार्चपासून सकाळपाळीत घेण्याचा ठराव पारित करण्यात आला होता. आता महिन्याभरानंतर झालेल्या शुक्रवारच्या सभेत या सर्व शाळांना ६ मे पासून उन्हाळी सुट्या देण्याचा ठराव घेण्यात आला आहे. मागील वर्षी १४ मे पासून शाळांना उन्हाळी सुट्या दिल्यागेल्या होत्या. यावर्षी आठ दिवसांपुर्वी या सुट्या लागत आहे.
अटल बिहारी वाजपेयी सभागृहात पार पडलेल्या शिक्षण समितीची सभा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथ.) रविकांत देशपांडे, समिती सदस्य अशोक कापगते, हेमंत कोरे, प्रणाली ठाकरे, राणी ढेंगे, वर्षा रामटेके, संगिता मुंगुसमारे, प्रेरणा तुरकर, धनेंद्र तुरकर, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगणजूडे आदींसह शिक्षण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उन्हाळा सुरू झाला असल्याने तापमानात वाढ होत असून प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना याची झळ सोसावी लागत असल्याचा मुद्दा मुबारक सय्यद यांनी उपस्थित केला.
अनेक विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावावरून शाळेत येत असतात. सकाळपासूनच उन्हाचे चटके बसत असल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. दुरवरच्या शाळेत जाताना मार्गात सोयीसुविधा नसल्याने वेळप्रसंगी विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यास मदत मिळत नाही. त्यामुळे ६ मे पासून शाळांना उन्हाळी सुट्या द्याव्या असा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर त्यावर समितीने ठराव घेतला.
यासोबतच खेळोत्तेजक मंडळाला नवसंजीवनी देऊन पुढील वर्षीच्या सत्रात शालेय क्रीडा स्पर्धा घेण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. या स्पर्धांसाठी लागणाऱ्या खर्चाचा विनियोग जिल्हा परिषद फंडातून करण्यात यावा व याकरिता एका समितीचे गठण करुन स्पर्धा पार पाडाव्या असा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
या मंडळाच्या भविष्यात निवडणूका होणार नसल्याचाही ठराव घेण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेची मदत घेण्याचाही मुद्दा यावेळी उपस्थीत करण्यात आला. जिल्ह्यातील शाळा डिजीटल करण्यासाठी जिल्हा परिषदेने निधी द्यावा, अशी मागणी या सभेत लावून धरण्यात आली. (शहर प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना प्रवास खर्चाची तरतूद
शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगीरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, स्तरावरील स्पर्धेसाठी निवड केली जाते. अशा विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनेकदा पैशाची अडचण भासते त्यामुळे अशा होतकरु व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने त्याचा खर्च उचलावा, असा मुद्या मुबारक सय्यद यांनी लावून धरला. त्यावर सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला.
मागण्यांना समितीचा पाठिंबा
जिल्हा परिषद शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. याबाबत अनेक दिवसांपासून शिक्षक संघटना जिल्हा परिषद प्रशासनाविरुध्द लढा देत आहेत. हक्क असतानाही त्यांच्या मागण्यांना केवळ आश्वासन दिले जात आहे. या मागण्या न्याय असून शिक्षक कृती समितीच्या माध्यमातून यानंतर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शिक्षकांच्या मागण्यांना शिक्षण समितीचा पूर्ण पांिठंबा असल्याचेही या सभेत उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांनी सांगितली.