जि.प. शिक्षकांच्या बदल्यात घोळ

By Admin | Published: May 30, 2016 12:52 AM2016-05-30T00:52:54+5:302016-05-30T00:52:54+5:30

भंडारा जिल्हा परिषदेत कार्यरत शिक्षकांच्या बदल्या शासन निर्णयाला डावलून नियमबाह्यपणे करण्यात आल्याची माहिती आहे.

Zip Trouble in exchange for teachers | जि.प. शिक्षकांच्या बदल्यात घोळ

जि.प. शिक्षकांच्या बदल्यात घोळ

googlenewsNext

शासन निर्णयाला डावलून झाल्या बदल्या : ग्रामविकास मंत्रालयाने दिले विभागीय चौकशीचे आदेश
भंडारा/तुमसर : भंडारा जिल्हा परिषदेत कार्यरत शिक्षकांच्या बदल्या शासन निर्णयाला डावलून नियमबाह्यपणे करण्यात आल्याची माहिती आहे. या बदल्यांच्या स्थगितीकरिता वरिष्ठ स्तरावरुन हालचाली सुरु झाल्या आहेत. ग्रामविकास मंत्रालयाने बदल्या संदर्भात विभागीय आयुक्तांमार्फत तात्काळ चौकशी अहवाल मागितल्याचे विश्वसनिय माहिती आहे. भंडारा जिल्हा परिषदेतही संबंधित अधिकाऱ्यांविरोधात अविश्वास ठराव घेण्याकरिता हालचालींना वेग आल्याचे समजते.
दि. ११, १२ व १३ मे ला भंडारा येथे शासन निर्णयानुसार बदल्यांची कार्यशाळा घेण्याकरिता प्राथमिक शिक्षकांना बोलाविले होते. या कार्यशाळेत शासन निर्णयाला डावलून नियमबाह्य बदल्या करण्यात आल्या. भंडारा जिल्ह्यात साकोली, लाखांदूर व लाखनी तालुके नक्षलग्रस्त आहेत. जिल्हास्तरीय प्रशासकीय बदल्यात येथे त्याच तालुक्यात करण्यात आल्या. ६९७ शिक्षकांना कार्यशाळेत बोलविण्यात आले होते. नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांची जिल्हास्तरीय प्रशासकीय बदली नक्षलग्रस्त तालुक्यात शासन निर्णयानुसार होत नाही. नक्षलग्रस्त भागातून जेवढे शिक्षक विनंतीने बाहेर गेले तेवढेच शिक्षक प्रशासकीय बदलीने नक्षलग्रस्त भागात पाठवावे लागतात. तसे येथे झाले नाही.
पती-पत्नी एकत्रीकरणाअंतर्गत बदली करतांना शासन निर्णयातील ३० किमी अंतरापर्यंत बदली करावी या नियमाला डावलून पदे रिक्त असूनही १२० ते १५० कि.मी. अंतरावर बदल्या केलेल्या आहेत.
गुणवंत तथा नैपूण्यवान विद्यार्थी प्रकल्प राबविणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णयातील प्रकरण ५(१) (अ) (२) नुसार प्रशासकीय बदलीतून सुट न देता हेतुपुरस्पर १३० किमी अंतरावर बदली करण्यात आली. या प्रकल्पातून ९३ विद्यार्थ्यांची राज्याच्या क्रीडा प्रबोधीनीत निवड झाली तर चार विद्यार्थ्यांची साई (दिल्ली) व दोन विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प बंद करावा लागणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचलेले आकाश शेंडे, सशिकला आगाशे सारखे जिल्हापरिषद शाळांचे विद्यार्थी भविष्यात घडणे कठीण आहे.
एका शाळेत एकच रिक्त पद असताना संबंधित २-२ शिक्षकांना पदस्थापना देऊन नंतर दोन ते तीन दिवसानंतर त्या शिक्षकांना जवळच्या शाळेत पदस्थापना देण्यात आली. अशाप्रकारे सुमारे ४० शिक्षकांचे आदेश बदल करण्यात आले. अपंग कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्राची दखल न घेता त्यांना बदलीतून सुट दिली नाही. काही शिक्षकांना कार्यशाळेत देण्यात आलेल्या पदस्थापनेची शाळा १ ते २ दिवसानंतर बदलविण्यात आली. प्रशासकीय बदलीसपात्र शिक्षकांना विनंती बदलीचा लाभ देण्यात आला. हे नियम बाह्य विनंती बदलीचे अर्ज कार्यालयात उपलब्ध नाही. १२ मेच्या कार्यशाळेत दिलेली पदस्थापनेची शाळा २३ मेच्या कार्यशाळेत तालुका बदल करुन जवळची शाळा देण्यात आली. यात शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार बोलविण्यात आले नाही.
तुमसर तालुक्यातील पदवीधर ७१, मुख्याध्यापक ८, सहायक शिक्षक २६ अशाप्रकारे येथे शिक्षकांचया १०५ जागा रिक्त आहेत. तुमसर पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जेवढ्या जागा रिक्त आहेत तेवढे शिक्षक देण्याची मागणी केली आहे. येथे पदस्थापना झाल्याशिवाय बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करु नये असा ठराव घेतल्याची माहिती आहे.
पवनी तालुक्यात ४९ शिक्षकाचंी पदे रिक्त आहेत. समायोजनेचा नावाखाली शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे कारण येथे पुढे केले जात आहे. प्रशासकीय बदल्यात ज्या तालुक्याचे शिक्षक त्याच तालुक्यात बदल्या करण्यात आल्या. येथे शासन नियमानुसार तालुका बदल करण्याची गरज होती.
या प्रकरणाची दखल राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने घेतली असून संपूर्ण बदल्या संदर्भात विभागीय आयुक्तांना चौकशी करण्याचे निर्देश दिले अशी माहिती आहे. येत्या आठवड्याभरात बदल्या संदर्भात काय निर्णय शासन घेते याकडे शिक्षकांचे लक्ष आहे. बदल्यासंदर्भात कार्यशाळेचे जि.प. अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, उपाध्यक्ष राजेश डोंगरे, जि. प. सभापती नरेश डहारे, विनायक बुरडे, शुभांगी रहांगडाले यांनीही आक्षेप नोंदविला आहे, हे विशेष.
अन्यायाला चिरडून न्याय मिळविण्यासाठी ओळखले जाणारे जिल्ह्यातील आमदार चरण वाघमारे हे शिक्षकांवर झालेल्या अन्याय खपवून घेतील काय? अशी शिक्षक वर्तुळात जिल्हाभर चर्चा आहे. (शहर/तालुका प्रतिनिधी)

Web Title: Zip Trouble in exchange for teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.