जि.प.च्या २३८ शाळा धोकादायक स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:26 AM2017-07-19T00:26:43+5:302017-07-19T00:26:43+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांचे भवितव्य जोपासणाऱ्या जिल्हा परिषद शाळांची अवस्था दयनीय आहे.
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात : मोहाडी तालुक्यात सर्वाधिक ५४ जीर्ण ईमारती
प्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांचे भवितव्य जोपासणाऱ्या जिल्हा परिषद शाळांची अवस्था दयनीय आहे. जिल्ह्यातील २३८ शाळा इमारती धोकादायक स्थितीत असून या जीवघेण्या ईमारतीत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत असल्याचे वास्तव आहे.
भंडारा जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यात ७६९ जिल्हा परिषद शाळा आहेत. या शाळामध्ये भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे अशी संकल्पना राज्य शिक्षण विभागाने आखली आहे. राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या माध्यमातून शाळा प्रगतीपथावर नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
एकीकडे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, डिजीटल शाळा, यु डायसच्या माध्यमातून शाळांची इत्यंभूत माहिती व विद्यार्थ्यांची प्रगती यासह विविधांगी प्रयोगाची अंमलबजावणी प्रत्येक शाळेत करण्यात येत आहे. मात्र भंडारा जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये भौतिक सुविधांच्या नावावर कागदोपत्री चित्र रंगविण्यात येत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
भंडारा, लाखनी, पवनी, तुमसर, मोहाडी, साकोली व लाखांदूर अशा सात तालुक्यांमधून जिल्ह्यातील सुमारे ६० हजार विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधून विद्यार्जनाचे धडे गिरवित आहेत. मात्र यातील अर्ध्याधिक विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात असल्याची विदारक परिस्थिती समोर आली आहे.
भंडारा जिल्ह्यातील २३८ शाळा अत्यंत धोकादायक स्थितीत असतानाही पर्यायी व्यवस्था न केल्याने तिथेच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. सर्वाधिक धोकादायक किंवा मोडकळीस आलेल्या शाळा इमारतींमध्ये मोहाडी तालुक्याचा अग्रक्रम लागतो. मोहाडी तालुक्यात ५४ शाळांच्या इमारती धोकादायक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानंतर तुमसर तालुक्याचा क्रमांक लागतो. तिथे ४५ शाळा इमारती मोडकळीस आल्या आहेत. भंडारा पंचायत समितीमध्ये ३५, पवनी ३०, लाखांदूर व लाखनी येथे प्रत्येकी २७ तर साकोली येथे २० शाळा अशा एकुण २३८ शाळा धोकादायक स्थितीत आहेत.
यावर्षी एकही वर्गखोली नाही
सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांसह विद्यार्थ्यांच्या देखभालीची जबाबदारी सर्वशिक्षा अभियानावर आहे. यावर्षी नवीन एकही वर्गखोली मंजूर करण्यात आलेली नाही. २०१४-१५ मध्ये जिल्ह्यात ८० वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यानंतर १५-१६ या वर्षात २ तर यावर्षी ० असा क्रम सर्व शिक्षा अभियानाचा लागला आहे.
शाळांची अद्ययावत माहिती यु-डायसवर
शाळांची भौगोलिक स्थिती व अन्य माहितीबाबत राज्य शासनाने यु डायसवर शाळेच्या मुख्याध्यापकांना माहिती नोंदविण्याचे फर्मान दिले आहे. त्यानुसार सर्व शाळांनी त्यांच्या शाळांच्या स्थितीबाबत यु डायसवर नोंदणी केलेली आहे. असे असतानाही राज्य शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळा मोडकळीस आलेल्या असतानाही या गंभीर बाबीकडे सध्यातरी दुर्लक्ष केल्याची बाब दिसून येत आहे.
२१ प्रस्ताव मंजूर
जानेवारी ते आजतागायत जिल्हा परिषद शाळांकडून ५७ प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यातील २१ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. उर्वरीत ३६ प्रस्ताव अद्यापही मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. यातील अनेक शाळा निर्लेखन करण्याचे ठराव घेण्यात आल्यानंतरही अशा धोकादायक इमारतीतच विद्यार्थ्यांना बसविण्यात येत आहे.
धोकादायक इमारतींचे काही प्रस्ताव पाठविले असून त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर या इमारतींच्या बांधकाम करण्यात येईल.
- मोहन चोले,
शिक्षणाधिकारी (प्राथ) भंडारा