१०७९ उमेदवारांच्या भाग्याचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 10:25 AM2022-01-19T10:25:18+5:302022-01-19T10:32:12+5:30
भंडारा जिल्हा परिषद, सात पंचायत समिती आणि तीन नगरपंचायतींची निवडणूक दोन टप्प्यांत पार पडली. जिल्हा परिषदेच्या ५२ जागांसाठी ३१२ उमेदवार रिंगणात होते.
भंडारा : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणूक रिंगणात असलेल्या १०७९ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आज १९ जानेवारी रोजी होणार आहे. तालुका मुख्यालयी मतमोजणी होणार असून नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोण विजयी होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
भंडारा जिल्हा परिषद, सात पंचायत समिती आणि तीन नगरपंचायतींची निवडणूक दोन टप्प्यांत पार पडली. जिल्हा परिषदेच्या ५२ जागांसाठी ३१२ उमेदवार रिंगणात होते. त्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या ३९ गटांतील निवडणुकीत २४५ तर दुसऱ्या टप्प्यात झालेल्या १३ गटांमध्ये ६७ उमेदवार रिंगणात होते. पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी ५४८ उमेदवारांनी आपले भाग्य अजमावले. पहिल्या टप्प्यात झालेल्या ७९ जागांसाठी ४१७ तर दुसऱ्या टप्प्यात झालेल्या २५ जागांसाठी १३१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
लाखनी, लाखांदूर आणि माेहाडी या तीन नगरपंचायतींची निवडणूकही दोन टप्प्यांत घेण्यात आली. ५१ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात होते. पहिल्या टप्प्यात ३९ जागांसाठी १६८ तर दुसऱ्या टप्प्यात १२ जागांसाठी ५१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या सर्वांच्या भाग्याचा फैसला मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीने होणार आहे. कोण निवडूण येणार याची प्रचंड उत्सुकता उमेदवारांसोबतच जिल्ह्याला लागली आहे.
२८ दिवसांची दीर्घ प्रतीक्षा आज संपणार
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीतील उमेदवारांना निकालासाठी तब्बल २८ दिवसांची प्रतीक्षा करावी लागली. ओबीसी आरक्षण स्थगित झाल्याने निवडणूक दोन टप्प्यांत घेण्यात आली. पहिल्या टप्प्यातील निवडणूक २१ डिसेंबर रोजी पार पडली. मात्र मतमोजणी दुसऱ्या टप्प्यानंतरच एकत्रितच होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसह नगरपंचायतीच्या उमेदवारांना निकालासाठी प्रतीक्षा करावी लागली. या काळात दावे-प्रतिदावे करण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांना मात्र प्रतीक्षा करावी लागली नाही. मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी मतमोजणी होत आहे.
मतमोजणीसाठी ११४ टेबल, ७८१ कर्मचारी
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन टप्प्यांतील एकत्रित मतमोजणी बुधवारी सकाळी १० वाजतापासून तालुका मुख्यालयी होत आहे. सात तालुक्यांत ११४ टेबलवर मतमोजणी होणार असून, त्यासाठी ७८१ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. भंडारा तालुक्यातील मतमोजणीसाठी २० टेबलची व्यवस्था करण्यात आली असून, एक टेबल टपाली मतदानासाठी राहणार आहे. एकूण १८ फेऱ्या होणार असून, १३७ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पवनी येथे १४ टेबल राहणार असून, २१ फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे. यासाठी ७० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तुमसर येथे २० टेबलवर मतमोजणी होणार असून, १७ फेऱ्या होणार आहेत. त्यासाठी १५८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मोहाडी, साकाेली, लाखनी आणि लाखांदूर येथे प्रत्येकी १५ टेबल मतमोजणीसाठी राहणार आहेत. मोहाडी येथे २१ फेऱ्या होणार असून, त्यासाठी ९२ कर्मचारी तर साकोली येथे १५ फेऱ्या होणार असून, ११५ कर्मचारी तसेच लाखनी येथे १९ फेऱ्यांसाठी ९७ कर्मचारी आणि लाखांदूर येथे १२ फेऱ्यांसाठी ११२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त राहणार असून, कोरोना नियमांचे पालनही करावे लागणार आहे.
विजयी मिरवणूक काढण्यास मनाई
कोरोना संसर्गाची तिसरी लाट सुरू असल्याने निवडणूक निकालानंतर कोणत्याही प्रकारची विजयी मिरवणूक काढण्यास राज्य निवडणूक आयोजकाने मनाई केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान कोरोना साथीच्या आजाराबाबत सुरक्षात्मक उपाययोजना संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यात उमेदावाराच्या विजयानंतर काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीला मनाई करण्यात आली आहे. यामुळे अनेक उमेदवारांचा हिरमोड होणार आहे.