गुणवत्ता वाढीसाठी जि.प. शाळेत ‘एजीआर’ उपक्रम
By Admin | Published: December 22, 2014 10:40 PM2014-12-22T22:40:35+5:302014-12-22T22:40:35+5:30
सर्वांगिण शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचे प्रयत्न शासनस्तरावर होत आहे. विविध उपक्रमही राबविण्यात येत आहे. तरी जिल्हा परिषदांच्या शाळा यात मागे पडत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक बालकांना दर्जेदार
साधन व्यक्तींचा समावेश: पुढील सत्रापासून शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम
राजू बांते - भंडारा
सर्वांगिण शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचे प्रयत्न शासनस्तरावर होत आहे. विविध उपक्रमही राबविण्यात येत आहे. तरी जिल्हा परिषदांच्या शाळा यात मागे पडत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक बालकांना दर्जेदार शिक्षण व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी पुढाकार घेतला आहे. आता २०१४-१५ या वर्षात भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये ए (अॅडव्हांस), जी (जनरल), आर (रिमेडियल) हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.
गुणवत्ता वाढीसाठी साधन व्यक्तीची मदत
शैक्षणिक गुणवत्तेचे वाढ करण्यासाठी जिल्हास्तरावर उच्चस्तर सुकाणू समिती, जिल्हा कार्यकारी समिती तसेच तालुका कार्यकारिणी समिती, जिल्हा शिक्षण मंडळ यांची निर्मिती करण्यात आली आहे. यात ४१ विषय साधनव्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे.
मोहाडी तालुक्यात सर्वांगिण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमासंबंधी केंद्रप्रमुख यांच्याशी गटशिक्षणाधिकारी एस.बी. राठोड यांनी उपक्रमासंबंधी चर्चा केली. केंद्रप्रमुखांनी सर्व शाळांना एजीआर उपक्रमाची माहिती मुख्याध्यापकांना दिले आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीला मोहाडी तालुक्यात सुरुवात झाली आहे.
भंडारा जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमातंर्गत एजीआर योजनेची अंमलबजावणी करून जिल्हा परिषद व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, इंग्रजी व विज्ञान विषयातील किमान अध्ययन पातळी व सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाच्या अनुषंगाने अ,ब,क श्रेणीतील विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येणार आहे. दुसरी व आठवीमधील शैक्षणिकदृष्ट्या प्रगत व अप्रगत विद्यार्थ्यांचा शोध घेणे, उपचारात्मक अध्ययन, अध्यापन साहित्य विकसीत करणे, शैक्षणिक चाचण्या, विकसित करणे, तिमाही नियोजन करणे, श्रेणीनुसार अध्ययन साहित्य विकसित करणे, विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करणे, विद्याथ्योचे सर्वांगिण गुणवत्ता विकास व संवर्धन करणे हे एजीआर योजनेचे उद्दीष्ट आहेत. या बाबी वास्तवात येण्यासाठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची ११ व १२ जानेवारी रोजी भाषा, गणित, इंग्रजी व विज्ञान विषयांची पूर्व संपादणूक चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणीतील मूल्यमापनावरुन अ,ब,क श्रेणीतील विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येणार आहे. संपादणूक विकसनाची जबाबदारी कार्यकारी समितीने जिल्हा शिक्षण मंडळाकडे सोपविली आहे. या शिक्षण मंडळात डायट अधिनिस्थ व कार्यरत साधनव्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. पूर्व चाचणीच्या अंमलबजावणीची जबाबदारी तालुका कार्यकारी समितीकडे देण्यात आली आहे. पूर्व संपादणूक चाचणीसाठी केंद्रांतर्गत शिक्षकांची अदलाबदल होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
प्रगत अध्ययन साहित्य विकसित करणे
‘अ’ श्रेणीतील विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिकतेचा विकास होण्यासाठी प्रगत अध्ययन साहित्य विकसित करणे, त्यांच्या बुद्धिमत्तेला पटेल, रुचेल असे अध्ययनाबाबत मार्गदर्शन व पूरक साहित्य विकसित करून शाळांना वितरित केले जाणार आहे. विज्ञान गणित व इंग्रजी विषयांची तयारी करून घेणे व स्वयंअध्ययन करण्यासाठी उपक्रमाची अंमलबजावणी करणे.
अध्यापनात आधुनिकतेची जोड
‘ब’ ब श्रेणी मध्ये विद्यार्थ्यांचा शोध घेऊन यांचेसाठी अप्पर श्रेणी सुधारण्यासाठी अभ्यासक्रमाच्या एनसीएफ, एससीएफच्या मार्गदर्शक तत्वानुसार ज्ञान रचनावादाच्या प्रभावी वापर करून अभ्यासक्रमाचे नियोजन करणे. सामान्य विद्यार्थ्यांच्या बुद्धांकाचा विचार करून पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची जोड देवून अध्ययन, अध्यापन करणे व श्रेणी सुधारासाठी शिक्षकांना प्रोत्साहन करण्यात येणार आहे.
शिक्षकांचे वाढविणार प्रोत्साहन
‘क’ श्रेणीसाठी शिक्षणाचा अधिकार कायद्यामध्ये सुचविल्याप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील शाळांमध्ये क श्रेणीतील विद्यार्थ्यांचा शोध घेवून बालस्नेही शिक्षण पद्धतीने व आनंददायी वातावरणामध्ये क श्रेणीतील विद्यार्थ्यांचा उर्ध्वगामी स्तर उंचावण्यासाठी अतिरिक्त पुरक मार्गदर्शन, उपचारात्मक अध्ययन अध्यापन व निदानात्मक चाचण्या वापरण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.