इश्वराची गोडी हेच शाश्वत सूख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 02:14 PM2018-09-07T14:14:03+5:302018-09-07T14:15:23+5:30
ये शुध्दीवरी आता तरी, तू भजरे भज गोपाळा अनेक जन्माचा खडतर प्रवास संपवून जीवाला हा मानव जन्म मिळाला बहूत जन्माअंती। जोडी लागली हे हाती। बहू केलाफेरा। येथे सापडला थारा।।
हा मानव जन्म गेल्यावर पुन्हा प्राप्तीची शाश्वती नाही. शिवाय हा देह क्षणभंगुर आहे. जीव आला कोठून? जाणार कोठे? कधी जाणार? कसा जाणार? हे कोडे अजुनही कोणाला उलगडले नाही. सुर्योदयाबरोबर सुर्यास्त होणार त्याप्रमाणे जन्मानंतर मृत्यू होणारच हे त्रिकालाबाधीत सत्य आहे.
उपजे ते नाशे, नासले पुनरपि दिसे। हे घटीकायंत्र तैसे, परिभ्रमेगा।। (ज्ञानेश्वरी २/१५९)
धावाधाव हे जीवनाचे अपरीहार्य अंग झाले आहे. ह्या सगळ्या वेगात आजचा मानव आपले अस्तित्वच विसरत चालला आहे. समुद्रात सर्वत्र पाणीच पाणी. परंतु पिण्यासारखे पाणी थेंब सुध्दा नाही. तसे मानवी जीवनाचे झाले आहे. वाढती लोकसंख्या, धावती वाहने प्रदुषणाने व्याप्त असा परिसर त्यामुळे सर्व समाज जीवनच काळवंडले आहे. आजच्या जीवन कलहाला तोंड देण्यासाठी धावणे भागच आहे. पण थोडे आत्मचिंतन केल्यास असे लक्ष्यात येईल की हे सर्व कशासाठी? जीवनातील वाढते हव्यास आणि उंचावलेले जीवनमान हेच याचे कारण आहे. आज माणसाला साधे जीवन नको आहे आपल्या घरात महागड्या सर्व वस्तु याव्यात म्हणून सातत्याने धडपडतो. टिव्ही, फ्रिज, मिक्सर, वॉशिंग मशीन, एसी व्यवस्था. ह्या सर्व वस्तु घरात येतात पण माणुस घराबाहेर असे आजचे २१ व्या शतकाचे चित्र समोर येत आहे. सुखविलासाची सर्व साधने उपलब्ध परंतु आंतरिकदृष्ट्या विचार केला तर माणुस असंतुष्ट आहे. जीवनात आनंदाची वाट सापडणे कठीण झाले आहे. राहण्यास जागा नाही, नोकरी नाही. हुंड्याअभावी मुलामुलीचे लग्न करता येत नाही. कर्जबाजारीपणा, वैफल्यग्रस्त आणि निराशा वादातून आत्मघात प्रवृत्तीत वाढ होत आहे. विविध समस्यांमुळे मानवाला आत्मीक आनंद मिळणे कठीण झाले आहे.
अशावेळी संत म्हणतात - ज्या जगण्याला धर्म विचाराचा स्पर्श नाही, त्या जगण्याला अर्थ नाही. जाईल जाईल काळ यासी बा खाईल। ‘अजुनी तरी होई जागा, तुका म्हणे पुढे दगा।।’
सर्व सुखाचे अधिष्ठान म्हणजे संपत्ती, सुख पैशातच आहे ह्या जाणीवेने माणुस पैसा मिळविण्यासाठीच धडपड करतो. संपत्तीच्या बळावर माणसाला हवी ती सुखे विकत घेता येतात हे खरे आहे पण सुखापोटी मिळणारी मन:शांती मिळवून देण्याचे सामर्थ्य संपत्तीत नाही. संपत्तीतून सुखाची साधने मिळतात पण सुख मिळत नाही. म्हणून सुखाची संपत्ती वाढविण्यापेक्षा माणुस संपत्तीचे सुख वाढविण्याचे मागे लागतो. ह्यावर खऱ्या अर्थाने प्रत्येकाने चिंतन करणे आवश्यक आहे. अखंड स्पर्धा, ताणतणाव, नवनवीन आजार हेच या युगाचे योगदान असे म्हणण्याची पाळी आली आहे. समाधानी जीवनाला तडे जातील असे हव्यास वर्धिष्णु होत आहेत. आणि माणसाची अंत:र्मुखता कमी झाली आहे. धर्माला ग्लानी आल्यावर देवपण प्रगट होते हा गीतेतील गोपालकृष्णाचा विचार माननीय आहे. त्या विचारानुसार पहिले तर देवाने अवतार घ्यावा ऐवढी पूर्व तयारी आजच्या मानवाने केली आहे.
‘परिपरित्राणाय साधुनाम, विनाशाय दुष्कृते। धर्मसंस्थापनार्थाय, संभवानी युगे युगे।।
पैसा, आप्त, भोग, पुस्तकी पांडित्य ह्यापैकी काहीही माणसाला शाश्वत सुख देवू शकत नाही. परंतु अहं कर्तृत्वाचा गर्व चढलेला माणुस हे ध्यानात घेत नाही. संत आम्हाला वारंवार जाणीव करून देतात.
‘जो सुख पायो रामभजनमें तो सुख नाही अमिरीमें। भला, बुरा सबको सुन लिंजे कर गुजरान गरीबोमें।
आखिर यह तनु खाक मिलेगा, कहा फिरू मगरूरी में। कहे कबीर सुनो भाई साधो, साहब मिले सबुरी में।।
- हभप डॉ.ज्ञानेश्वर मिरगे,
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, शेगाव (जि.बुलडाणा)