मनामनातला विठूराया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 04:47 AM2018-07-22T04:47:31+5:302018-07-22T04:49:38+5:30
‘मी’पण गळून जाण्याचा सोहळा म्हणजेच पंढरीची वारी.
- प्राजक्त देशमुख
उद्या आषाढी एकादशी. ही एकादशी आणि तिची वारी हे वारकऱ्याचं व्रत आहे. ‘टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची’, असं म्हणत वारकºयांची पावलं पंढरीची वाट चालू लागतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव आहे. ‘मी’पण गळून जाण्याचा सोहळा म्हणजेच पंढरीची वारी.
मला वारी कशी दिसते? असा प्रश्न विचारल्यानंतर वारी-विठोबाचा माझ्यापुरता केलेला अनुवाद सांगणं आधी मला महत्त्वाचं वाटतं. कारण ‘वारी का?’ या गावची वाट ‘विठ्ठल कोण?’ या डोंगरावरून जाते. याचं ‘का’ आणि ‘कोण’मध्ये पांडुरंगाचा माझ्यापुरता अनुवाद आणि वारीचं माझ्यापुरतं भाषांतर दडलेलं आहे.
आपल्या देशात देवी-देवतांची कमी नाही. त्यांच्या दर्शनासाठी यात्रा, जत्रा, उरूसही अनेक आहेत, पण मग वारीमहात्म्य काय आहे ? खरं तर असं आहे की, वारीचं महात्म्य असं शोधत असाल, तर ती पहिली चूक आहे. कळत-नकळत, कमी-अधिक फरकाने सगळेच आपल्या अस्तित्वाचं कारण शोधत असतो. आपण आपले भटकत असतो, काहीतरी शोधत. आपण ‘इथं’ का अवतरलोय, याचं उत्तर शोधत. याला कुणी आत्मशोध म्हणेल, कुणी परमेश्वरशोध, कुणी काहीच न म्हणता म्हणेल ‘छे ! मी असलं काही शोधतंच नाहीए’. ही सगळीच उत्तरं खरीय. एकदा मी विठोबा शोधत असतांना आपला भटकत होतो. अनेकांना पत्ते विचारले, पण मला समजेल असा पत्ता सांगितला तो तुकोबांनी. तोही आधी त्यांच्या काखोटीची पुरचुंडी पुढ्यात ठेवत की, ‘ पत्ता मस सापडेल रे, आधी बस दोन घास खाऊन घेऊ.’
आता विठ्ठल नावाचा डोंगर आधी चढू. खरं संतामहंतांच्या आणि भक्तांच्या गाथागोष्टीतून हा देव अक्षरश: तयार झालाय. अभंग-निरु पणात जे येतं, त्याकडे इतिहास म्हणून पाहायला कुणी लावत नाही, तर जगणं सोडविण्याचं नीतितत्त्वांचं प्रमेय म्हणून ते बघावं, असा त्या मागचा उद्देश असतो.
राधाकारणे रुसलेली रूक्मिणी द्वारकेच्या दक्षिणेला दिंडीरवनात येऊन लखुबाई (रखुमाई) झाली. तिची समजूत घालायला कृष्ण पंढरपुरास विठ्ठलरूपात आला, तसेच भक्त पुंडलिकाच्या आळवणीमुळेही कृष्ण पंढरपुरात आला. भक्त पुंडलिक माता-पित्याच्या सेवेत मग्न होता. त्याने विट फेकली आणि त्याला थांबायला सांगितलं. तो थांबला. तो हा विठ्ठल. ही दोन स्वतंत्र कारणं विठ्ठलाची आणि पंढरपुराचं नातं सांगणारी आपल्याला वेगवेगळ्या कथा-पुराणा-आख्यायिकांमध्ये सापडतात.
विठ्ठल हे एक अत्यंत मानवी रूप आहे. अगम्य आणि जगाला चाट करणारे चमत्कार याला येतात, असा कुठेही त्याचा दावा नाही. (कथा-सिनेमे-मालिकेवाल्यांना त्यांची पोटं चालवाची असतात. ते बघा आणि विसरा. ते पाहूच नये किंवा ते संदर्भ म्हणून पाहू नये.) ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्’ असं काही प्रतिपादन नाही त्याचं. कुणाला वाचवायला म्हणून खांब फोडून आलेला हा अक्राळविक्राळ देव नाही, हा कुणी धर्मरक्षणासाठी अवतरलेला राजपुत्र नाही, हलाहल प्राशून घ्यायला आलेला हा संकटमोचक देव नाही, नीती-अनीतीच्या महाभारतात दिशादर्शक सारथ्य करण्यासाठी हा देव आलेला नाही, असुरांचा नि:पात करण्यासाठी आलेल्या देविकांसारखा हा दुर्गात येऊन वसलेला नाही, कोहम या जडजटिल प्रश्नाची बुद्धी तुम्हाला प्राप्त व्हावी, म्हणून काही मांडायला आलेला अवतार नाही. केवळ एका भक्ताने भेटीची इच्छा व्यक्त केली, म्हणून आलेलं हे काळंसावळं रूप आहे. बरं त्यातही ‘भक्त पुंडलिकाच्या घरी साक्षात मी आलोय, तरी हा आईबापाची सेवा करत बसला? आणि माझ्याकडे विट फेकून मला प्रतीक्षा करायला लावली? मला?’ हा असा अहंभाव पण त्याच्याकडे नाही. त्याने तसं केलं म्हणून लगेच ‘ढिश्श!!’ करून शाप नाही दिला विठ्ठलाने. तो कंबरेवर हात ठेवून बापडा उभा राहिला. आपापली कर्तव्ये यथायोग्य पार पाडावी, हेच त्याला हवंय. आधी कर्मयोग!
अगम्य सुरस चमत्कारिक अशी जादू वगैरे काही नाही. नाही म्हणायला मनुष्याकडेही असेल असं सामर्थ्य त्याच्याकडे आहे, पण तेही मानवी आहेत हो. जनीला दळणकांडणातच मदत केली, एकनाथाचं रूप घेऊन राण्याकडेच गेला, बादशाहाची हजामतच केली, गोरोबाला चिखलच तुडवून दिला, दामाजीला रसदच पोचवून दिली. त्याच्याबद्दलच्या चमत्काराच्या कथा या विठ्ठल पुराणातल्या मूळ कथा नव्हे. विठ्ठलाप्रतीच्या उत्कट भक्तीच्या दाखल्याखाली त्या रचल्या गेल्या असाव्या.
याच्याकडे त्रिशूळ नाही, याच्याकडे चार हात, पाच डोकी नाहीत, गदा-सुदर्शन अशी कोणतीच अस्त्रंशस्त्रं नाहीत. कंबरेवर हात ठेऊन तो फक्त वाट पाहतोय.
उंदराच्या किंवा नंदीच्या किंवा आणखी कुणा देवाच्या वाहनाच्या कानात आपली कामना सांगून देवाकडून काही मागाचंय का? मग तीही सोय इथं नाही. काय असेल तर थेट बोला की राव. बरं... अमुक-तमुक आयास सायास नाही. ते केले म्हणून तो चिडेल वगैरे असंही नाही. इतरां ठायीच्या आदर, अप्रूप, धाक, शरण वगैरे भावना त्यासाठी नाहीच. इतर कोणत्याही धर्मात असा कोणता देव आहे, ज्याच्याकडे गेल्यावर भक्त आधी त्याला मिठी मारतात आणि मग पाया पडतात? ‘प्रथम भेटी अलिंगन । मग वंदावे चरण’-तुकाराम. विठ्ठल हे रूपच मुळी ‘सांगाती’ म्हणून. न बोलावता कुणाच्या तरी मनात इच्छा झाली म्हणून आलेला. सखा सांगाती.
सोळा सोमवार, खणानारळाची ओटी, बोकड-बकरू, कार्यप्रारंभ म्हणून गणेशपूजा, कार्यपूर्ती म्हणून सत्यनारायण, संकटमोचन म्हणून महा-लघुरु द्र, तेल-नारळ-धान्य-शेंदूर असलं सगळं किंवा व्रतवैकल्य काहीही नाही. आपण आपल्या माथ्यावरची संकटं जावी, म्हणून करावयाच्या या गोष्टी असतील, पण मग या जातात कुठं? सृष्टीचा नियम आहे की, त्या एका ठिकाणाहून दुसरीकडे जातील फारफार तर, पण नाहिशा नाही होत. ढीग असेल, तर खड्डा होतोच कुठे तरी हा निसर्गनियम आहे तसा. मग ही संकटं आपली जावी आणि त्याने ईसासारखी त्याच्या माथ्यावर घ्यावी का? पण मग हे भक्तीला, भक्तीमार्गाला आणि भक्ताला शोभतं का? यात स्वार्थ आला. ‘त्याच्याकडे धाव म्हणजे आता लगेच पाव’ असं नाही का? विठ्ठलाचं जेव्हा जेव्हा स्मरण केलंय, तेव्हा तेव्हा ते संकट पेलण्यासाठी सामर्थ्य हवं, या आंतरिक ऊर्जेसाठीच केलं गेलंय. म्हणूनच त्याच्या नावाने वर सांगितलं तसलं काही कर्मकांड आजवर ऐकिवात नाही (असतील तर सब झूठ-कोपलिकल्पत).
पापं धुऊन काढायचीय? चारधामासारखं पुण्य पदरी पाडायचंय?
मोक्षप्राप्ती हवीय? इच्छित फलप्राप्ती हवीय? मग नाही, वारी त्यासाठी नाही. आपल्या परंपरेत वेगवेगळ्या कारणाने माहेरी जाण्याची निमित्त असतात आणि ती निमित्त संपली, तरी नंतर ती वर्षातून का होईना माहेरा जातेच. मग ती माहेरी कोणत्या हेतूने जाते? काही मिळवायला? नाही. ती तिथे जाते, ते केवळ तिची इच्छा असते म्हणून. तिथं गेल्यावर तिचे आईबाप, भाऊबहीण, जुन्या सवंगड्यांना नितांत आनंद होईल म्हणून. संसारातला शीणभाग जाईल म्हणून. वर्षभराचा सासुरवास उतरावा म्हणून. बरं सासुरवास म्हणजे त्रास अशा अर्थी नव्हे. कर्मयोगवादात संसारालाच सासर म्हटलंय आणि ती माहेरी गेल्यावर ती आईपुढे गाºहाणे करीत नाही.
कारण तिला ठाऊक आहे की, त्याने आईला त्रास होईल आणि परतल्यावर आईच्या जिवाला घोर लागून राहील. तसाच वारकरी काही मागायला वारी करत नाही. तो तिथं जातो. विठ्ठलाला आलिंगन देतो आणि मग पाया पडतो. एकूणच जगणं काय आणि संसार काय तो म्हणजे एक लांबच्या पल्ल्याचा प्रवास. मग अशा प्रवासाला निघाल्यावर आपण मध्ये कुठे जर थांबलो, तर त्या थांब्याकडून आपल्याला ईप्सित स्थळी पोहोचण्याचं समाधान नको असतं. आपल्या हवं असतं, तर ईप्सित स्थळी पोहोचण्यासाठीची शक्ती. प्रवासाचा शीणभाग घालविण्यासाठी आपण तिथं थांबतो. तीच प्रसन्नता वारीत असते.
कलत्या वयात चारधाम करावं, अशी आपल्याकडे पद्धत आहे. अशा तीर्थक्षेत्री मृत्यू आला, तर आल्या जन्माचं सार्थक होईल, पण हे असलं सार्थकी लागण्यासाठी आयुष्यात एकदा म्हणून वारी करावी, असं नाहीच. ती दरवर्षी करायची गोष्ट आहे. दरवर्षीच्या पेरणीसारखं. फलप्राप्ती वगैरे भानगड इथे नाही आणि म्हणूनच वारीमहात्म्य नावाचं थोतांडही इथं नाही.