मॅनेजमेंटसाठी जरूर करा ई-वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 04:51 AM2018-07-22T04:51:16+5:302018-07-22T04:52:45+5:30
आपणही वारीला जाऊ या. इतकी माणसे कसे एवढे पायी चालतात? ही माणसे थकत नाहीत का? यांना ही ऊर्जा कुठून मिळते? असे अनेक प्रश्न मनात होते.
- स्नेहल एकबोटे
वारी म्हणजे काय? खूप वर्षांपासून मनात प्रचंड उत्सुकता होती. आपणही वारीला जाऊ या. इतकी माणसे कसे एवढे पायी चालतात? ही माणसे थकत नाहीत का? यांना ही ऊर्जा कुठून मिळते? असे अनेक प्रश्न मनात होते. अखेर उत्तर शोधायला वारीत जाण्याचे ठरले. एक दिवस ८ किलोमीटर का होईना चालण्याची संधी मिळाली. माणुसकीचे खरे दर्शन मला येथे घडले.
ही परंपरा गेले ७00-८00 वर्षे सुरू आहे. चातुर्वर्ण्य यातून निर्माण होणारा भेदाभेद हा नष्ट करण्यासाठी ही वारी त्याचे प्रतीक असावे. अनेक जाती-धर्मांतील संत मंडळींनी विठ्ठलाचा धावा करीत चंद्रभागेच्या वाळवंटात भेदाभेद अमंगळ ठरवला. हाच वारसा बहुजन समाजातील मंडळींनी चालू ठेवला.
मी या वारीत लोणंद ते तरडगाव या मार्गात सामील झाले. एकाच वेळेस खूप वेगवेगळे विचार तेव्हा मनात आले. खूप फोटो काढायला मिळणार हा आनंद वेगळाच होता. ८६ नंबरच्या दिंडीतून चालायला सुरुवात केली. प्रत्येकातला उत्साह, ऊर्जा वेगळीच. त्यांची गावे वेगळी. ‘माऊली’ या एकाच विचार भावनेने चालत होते. विठ्ठलाच्या जयघोषापाठोपाठ ‘ज्ञानदेव माऊली तुकाराम’ करत ते पळतच होते. मला वाटले एका दिंडीत एकाच गावाची माणसे असतील. पण तसे नव्हते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून जमा झालेली ही मंडळी. तर काही कर्नाटक, पंजाब अशा अनेक राज्यांतूनही लोक आले होते. कोणत्याही ट्रॅव्हल कंपनीशिवाय, फोनशिवाय, निमंत्रणाशिवाय हे लोक दरवर्षी एकत्र येतात. ते फक्त विठ्ठलमय होण्यासाठी.
या वारीत अनेक गोष्टी बघायला मिळाल्या. त्यातले महत्त्वाचे म्हणजे त्यांचे व्यवस्थापन. रस्त्याच्या एका बाजूला पायी चालणारे लोक आणि दुसºया बाजूला चालणारे ट्रक. या ट्रकमध्ये ५०० लीटरच्या पाण्याच्या टाकीपासून तर सगळ्या माऊलींच्या बॅग, जेवणाचे जिन्नस असे सगळेच. ज्या गावी मुक्काम त्या गावात ते ट्रक ६ वाजेच्या आत पोहोचणार आणि सगळ्या माऊलींचे जेवण बनविणार. खरेच प्रश्न पडतो कोण हे ठरवते? कोण यांचा प्रमुख असतो? प्रत्येक जण आपली जबाबदारी समजून सगळी कामे बिनबोभाट करीत असतात.
हे सगळे ‘फेसबुक लाइव्ह’ झाले पाहिजे असा मनात विचार आला आणि सुरू केले. ३०-४० वर्षे लोक या वारीत येत आहेत. वारीतल्या एका आजोबांची मुलाखत घेतली. तेव्हा कळाले हे लोक नुसते चालत नाहीत. व्यसनमुक्ती, स्त्रीमुक्ती, पर्यावरण संवर्धन, भ्रुणहत्या अशा विविध विचारांचा प्रसार करतात. संतांचे वचन हे सत्य आहे इतर सगळे मित्य आहे. समाज कोणत्या दिशेने चाललाय, आपण कोणत्या दिशेने गेले पाहिजे संतांनी जो मार्ग सांगितलाय तो अवलंबिला पाहिजे. ठङ्म ंल्ल८३ँ्रल्लॅ ्र२ ुी३३ी१ ३ँील्ल ूङ्मल्ल३ील्ल३ेील्ल३. हे सगळे विचार ऐकून खरेच माझी बोलतीच बंद झाली. मला वाटते वारी हा खरा सोशल मीडिया आहे. जातपात, धर्म, पंथ न विचारता ही माणसे एकत्र येण्याची परंपरा एवढी वर्षे अविरत चालू असणे हे कमाल आहे.
या सगळ्यात इंटरेस्टिंग होता तो वारीतला तरुण वर्ग. शाळकरी मुलांपासून ते कॉलेजच्या तरुण-तरुणींपर्यंत सगळेच यात दिसत होते. अखंड टाळ वाजवत विठ्ठलाचा जयघोष करीत होते. वारीत येणारे लोक साधारण पांढरा कुर्ता, धोतर किंवा लेंगा, डोक्यावर टोपी, फेटा अशा वेषात येतात. यांच्याबरोबरचा तरुण वर्ग मात्र जीन्स, टी-शर्टमध्ये दिसतो. हल्ली तरुणांच्या कपड्यांवरून जो ग्रह केला जातो तो करू नये. विचार आणि वेषभूषा यांचा तसा ताळमेळ हा वारीत वेगळा जाणवतो. कपड्यांमुळे टपोरी वाटणारी मुले विचारांनी मात्र तेवढीच प्रगल्भ आणि विठ्ठलाच्या गजरात अखंड बुडालेली दिसली.
डॉक्युमेंटरी, फोटोग्राफी यांसाठी तरुण वर्ग मोठ्या संख्येने वारीकडे वळालेला दिसतो. मला वाटते आताच्या जगात मॅनेजमेंट शिकायचे असेल तर त्या प्रत्येकाने वारीला जायला हवे. स्वत:च्या पलीकडे जग बघायला हवे, समजून घ्यायला हवे.