Ramzan : एक ईद अशीही वेगळी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 07:00 AM2018-06-16T07:00:00+5:302018-06-16T07:00:00+5:30
इस्लामच्या दृष्टिकोनातून ईद नेमकी कशी असावी त्याचे विवेचन :
नौशाद उस्मान
आज तुम्हाला एका आगळ्या वेगळ्या ईदविषयी सांगणार आहे. आज आपण लोकांना ज्याप्रकारे ईद साजरी करतांना पाहतो, त्यावरून आमच्या मुस्लीमेतर बांधवांचा असा गैरसमज होतो कि, ईद अशीच साजरी करावयाची असते बहुतेक.
महागडे फॅन्सी कपडे, तोंडात पान
अन मॅटनी शोमध्ये सलमान खान!
पण आपण इतिहासाचे सिंहावलोकन केल्यास कळते कि, थोरा मोठ्यांनी कशी आदर्शपणे ईद साजरी केली ते. राम पुनियांनी यांच्या भाषणाचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर फार प्रसिद्ध आहे. त्यात ते सांगतात कि, गांधीजींकडे ईदच्या दिवशी एक मुस्लिम पाहुणा आला होता. तेंव्हा ते स्वतः शाकाहारी असताना त्यांनी त्या पाहुण्यांचा पाहुणचार बाहेरून मटन बिर्याणी आणून केला होता.कारण त्यांना त्या पाहुण्यावर त्यांचा शाकाहार लादायचा नव्हता आणि त्या माणसाला जी डिश सर्वात जास्त आवडत होती ती डिश त्याला त्याच्या उत्सवाच्या दिवशी गांधीजींना खाऊ घालायची होती. यावरून त्यांची सहिष्णुता स्पष्ट होते.
प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी एकदा कशी ईद साजरी केली होती, तो प्रसंगदेखील फार बोधप्रद आहे.
प्रेषित मुहम्मद सलम यांच्या काळातली गोष्ट. ईदचा दिवस होता. मदिन्यातील रस्त्यांवर ईदची लगबग सुरू होती. सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. सर्व आबाल वृद्धांनी चांगल्यात चांगले कपडे नेसले होते. ईदच्या नमाजची वेळ होत होती. सगळे जन शहराबाहेरच्या ईदगाह (ईदची नमाज पढण्याची मोकळी जागा) कडे जात होते.
प्रेषितांनी ईदच्या नमाजचे नेतृत्त्व केले. नमाज पढल्यावर सर्वांनी एकमेकांना सदिच्छा दिल्या आणि आपापल्या घराकडे सगळे परतू लागले. लहान लेकरं जगाची पर्वा न करता धावत होते, खेळत होते, हसत होते, बागडत होते. मुलांना रंगबिरंगी कपड्यांत पाहून प्रेषितही खुष झाले. प्रेषित घरी परतत असताना त्यांचं लक्ष रस्त्याच्या कडेला रडत बसलेल्या एका लहान मुलाकडं गेलं. तो मुलगा फारच दु:खी वाटत होता. त्याने फाटके-तुटके कपडे नेसले होते. त्याचे केसंही व्यवस्थित विंचरलेले नव्हते, तर विखुरलेले होते. किती तरी दिवसांपासून त्याने अंघोळ केली नसल्याचं त्याला पाहून वाटत होतं. प्रेषितांनी त्यांच्या खांद्यावर प्रेमाने हलक्या हाताने चापटी मारत विचारले की,
‘‘का रडतोस?’’
‘‘जाऊ द्या, मला एकटं सोडा!’’ हुंदके देत रडता-रडता त्या चिमुकल्याने सांगितले. आपल्याशी कोण बोलतोय हेदेखील त्या मुलाने बघितले नाही. प्रेषितांनी आपल्या हाताची बोटं त्याच्या केसांत फिरविली आणि पुन्हा शांतपणे अन् मोठ्या जिव्हाळ्याने विचारले,
‘‘रडतोस का तू?’’
मुलानं उत्तर दिलं, ‘‘माझे वडिल युद्धात शहिद झाले आहेत आणि माझ्या आईने दुसरं लग्न करून टाकलंय. माझ्या सावत्र बापाने मला भाकरीचा एक तुकडाही न देता घराबाहेर काढलंय. त्याला आता मी घरात नकोय. आज ईद-उल-फित्र (रमजान ईद) आहे आणि प्रत्येक जन खुष आहे. सगळ्या मुलांकडे नवीन कपडे आहेत, खाण्यासाठी चांगले चांगले पदार्थ आहेत. पण माझ्याकडे मी नेसलेल्या या कपड्यांव्यतिरीक्त नेसायला दुसरं काहीही नाही. मला खायला काहीही नाही अन् राहायला कुठंच जागा नाही.’’ त्याने वर तोंड करून पाहिलेलं नसल्यामुळे तो कुणाशी बोलतोय हे त्याला माहित नव्हतं. प्रेषित मुहम्मद सलम् हे तर दयासागर होते. त्या अनाथ मुलाची अवस्था पाहून आणि त्याच्या समस्या ऐकून प्रेषितांचं मन दु:खी झालं.
प्रेषित मुहम्मद सलम् म्हणाले की, ‘‘तुला कसं वाटतंय, हे मी समजतोय (तुझ्या भावना मी समजू शकतोय. कारण) मी (देखील) लहानपणी माझ्या आईला अन् वडिलाला पारखा झालो होतो.’’ त्या मुलाला आश्चर्य वाटलं की, त्याचं सांत्वन करणारी व्यक्तीदेखील अनाथ आहे. जेंव्हा त्याने मान वर करून बघितलं तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला की, ते दस्तुरखुद्द प्रेषित मुहम्मद सलम् होते. त्यांना पाहताच त्याने आनंदाने उडी मारली.
प्रेषित मुहम्मद सलम् म्हणाले, ‘‘तुला मी वडिल म्हणून हवा आहे का? आणि माझी पत्नी आयेशा तुझी आई अन् माझी मुलगी तुझी बहिण बनली, तर तुला बरं वाटेल का?’’
त्याला सुखद धक्का लागून थोड्या वेळासाठी तर त्याला काय बोलावं तेच कळेना. मग नंतर तो म्हणला, ‘‘हो नक्कीच! का नाही? हे अल्लाहचे प्रेषित, जगातली सगळ्यात चांगली गोष्ट ठरेल ती!’’
प्रेषितांनी त्याला घरी नेलं. त्याला पाहून आदरणीय आयेशांनाही आनंद झाला. त्यांनी त्याला थंड पाण्याने अंघोळ घातली, त्याला रमजान ईदच्या या पावन दिवशी नवीन कपडे नेसवले आणि मनापासून चांगलं जेवण दिलं. त्या मुलाच्या आनंदाला तर पारावारच उरला नव्हता. त्याला नवीन आई-वडिल लाभले होते. त्या मुलाचा तो सर्वांगसुंदर असा ईदचा दिवस होता!
तो मुलगा घराच्या बाहेर धावत गेला आणि लहान मुलांसोबत खेळू लागला. पोरांनी त्याला विचारलं, ‘‘अरे गड्या, थोड्या वेळापूर्वी तर तू फारच घाणेरडे कपडे नेसलेले होते. तू इतके चांगले कपडे नेसून कसा काय खुष दिसतोस?’’
त्या मुलानं उत्तर दिलं, ‘‘मी भूकेला, तहानलेला होतो. अल्लाहच्या (ईश्वराच्या) प्रेषितांनी मला खाऊ घातलं. मी अनाथ होतो, पण आता प्रेषित मुहम्मद सलम् हे माझे वडिल आहेत आणि आदरणीय आयेशा माझ्या माता आहेत. आता मी पोरका राहिलेलो नाही.’’ त्या मुलांनी जेंव्हा हे ऐकलं, तेंव्हा त्यांचा तर श्वासोश्वास वाढून धाप लागली. ते उत्साहाने ओरडले, ‘‘हे प्रभू (अल्लाह)! आमचेही पालक जेहाद करताना (शत्रूशी
संघर्ष करताना) शहिद झाले तर आम्हालाही असे दयाळू आई-वडिल हवेत!’’ तो अनाथ मुलगा म्हणजेच प्रेषितांचे सहकारी आदरणीय जुहैर बिन सगीर होते.
प्रेषितांनी अनेक चांगल्या परंपरांचा पायंडा घातला आहे. त्या प्रेषित परंपरा (सुन्नत) अनेक इमानवंत आजही निभावतात. अनेक सुन्नत (प्रेषित परंपरा) पाळण्यात नक्कीच पुण्य लाभते. अमामा (डोक्यावर नेसले जाणारे पागोटे), डोळ्यात सुरमा लावणे, अत्तर लावणे, गोड पदार्थ खाणे यादेखील प्रेषित परंपरा म्हणून अनेक इमानवंत त्यांचा अंगिकार करतात. या परंपरांचे पालन करतनाच, अनाथांच्या डोक्यावर वात्सल्याचा हात ठेऊन त्यांना मायेची ऊब देणेदेखील प्रेषित परंपरा (सुन्नत) आहे. असं ईदच्या दिवशी रस्त्यावरील एखाद्या अनाथ लेकराला घरी आणून त्याला आई-वडिलांचं प्रेम देणेदेखील सुन्नत (प्रेषित परंपरा) आहे.
आजदेखील मुंबईसारख्या शहरांत रस्त्यावर अनेक अनाथ लेकरं उपाशी-तापाशी भटकत असतात. नाकातून शेंबडाचा ओघळ वाहत असेलेली उघडी-नागडी चिमुकली पोरं ईदच्या दिवशी धन-दांडग्या लोकांना खिन्न नजरेने बघत असतात. अनेक धनवान लोकं त्यांच्या हातात थोडीशी चिल्लर ठेऊन पुढे निघून जातात. त्याने कदाचित त्यांच्या पोटातली भूक शमतही असेल, पण माय-बापाच्या वात्सल्याची भूक कोण शमवणार? या ईदच्या दिवशी आपणही एखाद्या अशाच पोरक्या लेकराला आपलंसं करून प्रेषित परंपरेचं पालन केले जाऊ शकते. अनेक धनवान लोकं पूत्रहीन असतात. ते अशा अनाथ लेकरांना जवळ करू शकतात. पण त्यांना रक्ताचेच वंशज हवेत, अशी त्यांची वंशप्रेमातून आलेली इच्छा असते. परंतु निसर्गकर्ता जर ही इच्छा पूर्ण करत नसेल तर रस्त्यावरील एखाद्या अशा लेकराला विशेष करून ईदच्या दिवशी ओटीत घेतलं तर निपूत्रिक लोकांची संततीप्रेमाची भूकही भागेल आणि अनाथ मुलाला आई-वडिलही मिळतील. सगळ्याच धनवान लोकांनी असा उदात्त विचार केल्यास रस्त्यावर एकही अनाथ लेकरू दिसणार नाही आणि देशाच्या, जगाच्या गरीबी निर्मुलनात मदत होईल. तर मग प्रेषितांनी साजरी केली तशी यंदा साजरी कराल ना ईद?
आजही काही अभिनव पद्धतीने ईद साजरी करत असतात. वांगणीदाखल एक इथे उदाहरण देतो. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात आमचे मित्र फिरोज अन्सारी नावाचे एक गृहस्थ नगर पालिकेत पम्प ऑपरेटर आहेत. जमाअत ए इस्लामी हिंदीचे खंदे कार्यकर्ते आहेत. ते दरवर्षी ईदच्या दिवशी त्यांच्या मुस्लिमेतर मित्रांना आपल्या घरी बोलावतात, शिरखुर्मा पाजतात, जेऊ घालतात आणि जाता जाता त्यांच्याकडे असलेल्या काही मराठी भाषेत कुरआनच्या भाषान्तरच्या प्रती, प्रेषित चरित्र किंवा आणखी काही इस्लामी मराठी साहित्य त्यांना भेट म्हणून देतात. अशा साहित्यिक मेजवान्या आणि शिरखुर्म्याच्या मेजवान्या आणखी काही जण करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. हा एक चांगला पायंडा आहे. मुस्लिमांनी मुस्लिमेतरांना ईदला घरी बोलवावं आणि मुस्लिमेतरांनी दिवाळीला किंवा बौद्ध पौर्णिमेला बोलवावं. संगीताला आलो तर पंगतीलाही बोलवावं. यामुळे समाजात परस्पर सुसंवादाची कवाडे उघडून एका सशक्त समाजाची आपण उभारणी करू शकू. मागील महिन्याभरात या स्तंभाद्वारे एकाचे आयुष्य जरी बदलण्यात यशस्वी होऊ शकलो तर या स्तंभाचे सार्थक होऊ शकते.
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)