Ramzan : बच्चे कंपनीचा रमजान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 07:00 AM2018-06-12T07:00:00+5:302018-06-12T07:00:00+5:30
छोट्या मुलांसाठी रमजानचं नेमकं काय महत्त्व आहे ते मांडण्याचा प्रयत्न:
नौशाद उस्मान
तुम्ही कोणत्याही जातीचे किंवा धर्माचे असा, पण तुमच्याही बालपणात जर तुमचा एक जरी मुस्लिम मित्र असेल तर तुम्हाला तुमच्या बालपणातला अनुभवलेला रमजान, ईद आणि शिरखुर्मा आजही आठवत असेलच. पाटलाच्या वाड्यावर चढून आकाशात चंद्रकोर शोधत असलेले ते जुम्मनमियां ... चंद्रकोर दिसली रे दिसली की, ‘चांद दिख गया ... चांद दिख गया’ करत सगळी येटाळ डोक्यावर घेणारी ती चिल्लर पार्टी अन् विजेच्या खांबावरील जुन्या दिव्याच्या त्या अंधूक प्रकाशात त्या चिमुकल्या पाखरांच्या पदन्यासाने उडालेल्या धुराळ्यातही एक अजबच चैतन्य निर्माण होत असे. येटाळीतल्या एकमेव पाटलाच्या वाड्यातून बाहेर आलेल्या काकूंच्याही चेहऱ्यावर तोच आनंद वाहत असलेला दिसायचा जो त्या बाल-गोपालांच्या चेहऱ्यावर असायचा.
आजची ‘हॅप्पी रमदान’ म्हणून सदिच्छा देणारी धीर गंभीर चेहऱ्याची कॉन्वेंटची मुलं त्या निरागस गोड आनंदाला कुठंतरी पारखी झालेली दिसत आहेत. तो आनंद पुन्हा परत आणायची गरज आहे. तो भारत आपल्याला पुन्हा परत हवा आहे. लहाणपणीच वैचारिकतेची घडी बसत असते. म्हणून भविष्यात जातीयवादाच्या दुर्धर रोगाची लागण होऊ नये म्हणून धर्मसहिष्णुतेची लस लहाणपणीच देणे आवश्यक आहे. त्यासाठी काय करता येईल यावर चिंतन होणे गरजेचे आहे. विशेष करून जे लोक रोजे ठेऊन रमजान पाळतात, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. लहान मुलांवर रमजानचे सहिष्णुतेचे, एकात्मतेचे, समतेचे संस्कार घडवण्यासाठी इथे काही ‘टिप्स’ दिल्या जात आहेत -
आपल्या लेकरांच्या मुास्लिमेतर मुलांसाठी आपल्या घरी छोटीसी इफ्तार पार्टी घ्या. त्यात त्यांना सोप्या भाषेत इफ्तार, रोजा, रमजानविषयी माहिती द्या. त्याविषयावर छोटी छोटी मराठी पुस्तके असतील तर ती त्यांना भेट म्हणून अवश्य द्या.
ईदच्या दिवशीही त्यांना शिरखुम्र्यासाठी विशेष करून निमंत्रित करण्यास सांगा. ईदच्या दिवशी अनेक ठिकाणी झोके, आकाश पाळणे व इतर लहान मुलांच्या करमणुकीची साधणं येत असतात. तेंव्हा आपल्या लेकरांना तिथे नेतांना मुस्लिमेतर आणि विशेष करून तळागाळातील वंचित गोरगरीबांच्या मुलांना आपल्या लेकरांसोबत तिथे न्या. ईदगाहवर नमाज पढण्यासाठी शक्य असेल तर लेकरांनाही न्या.
ईदच्या दिवशी भिक्षा मागणारे ईदगाहबाहेर उभे असतात. त्यांना भिक्षा देतांना आपल्या लेकरांच्या हाताने द्या. जकातची रक्कमही गोरगरीबांना देतांना आपल्या लेकरांच्या हाताने द्या. जेणेकरून त्यांच्यात दातृत्वाचे संस्कार होऊ शकावे. मुस्लिम समाजात ईदसाठी नवीन कपडे वगैरे घेतांना मुलगा - मुलगी असा भेद केला जात नाही, उलट मुलींना झुकते माप दिले जाते, हा एक चांगला गुण आजही मुास्लिम समाजात आढळतो, ही उदात्त प्रेषित परंपरा अशीच पुढही सुरू राहिली पाहिजे. अशाप्रकारे आम्ही आधी बालपणी जसा भेदभावरहित सर्वधर्मसहिष्णु वातावरणात रमजान साजरा करायचो, ईद साजरी करायचो तसाच रमजान आणि तशीच ईद आताही प्रत्येक गावा-गावात शहरा-शहरात साजरी होवो आणि समाजात शांती निर्माण होऊन देश प्रगती करो, हीच अल्लाहशी प्रार्थना, आमीन! तेंव्हाच कुठे आजही पुन्हा पाटलांच्या टॉवरच्या टेरसवर (वाडे आता राहिले नाही), उभे राहून पुन्हा बच्चे कंपनी चांद दिख गया ऐवजी किमान ‘मून साइटेड, मून साइटेड’ तरी ओरडून आनंद साजरा करतील, इन्शा अल्लाह, इन्शा अल्लाह!
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)