Ramzan : व्यक्तिमत्व उजळून टाकणारा रमजान महिना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 07:00 AM2018-06-04T07:00:00+5:302018-06-04T07:00:00+5:30
रमजानचा अनेक अंगाने अभ्यास केला जाऊ शकतो. त्यापैकी एक म्हणजे व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीनेदेखील रमजानचे काय महत्व असू शकते ते आज आपण पाहू या.
मूळात रमजानचा महिनाच माणसाला एखाद्या घोड्यासारखा चपळ बनवण्यासाठीच असतो. रोजा हा फारसी शब्द असून त्याचा अर्थ "दिवस" किंवा "वार" होतो. हिंदूमध्ये जसं उपवासासाठी "वार धरणं" म्हणतात तो वार, पण रोजा आठवड्यातील विशिष्ट वारालाच ठेवला जातो असे नाही. रोजा फक्त दिवसाच ठेवला जातो, रात्री नाही, म्हणून कदाचित त्यासाठी ''दिवस (रोजा)'' शब्दप्रयोग केला गेला असेल. कुरआनात रोजा हा शब्द नसून मूळ अरबी शब्द "सौम" आहे. अरबस्थानात एखाद्या घोड्याला अधिक चपळ बनविण्यासाठी त्याला काही दिवस उपाशी ठेवलं जायचं, अशा उपाशी घोड्याला "फरजूस- सौम (उपासधारक घोडा) " म्हटलं जायचं. तो लांबच्या प्रवासासाठी किंवा युद्ध मोहिमेवर कामी येत असे. रमजानचा रोजा देखील कुणाच्या अंगात आळस असेल तर तो काढून त्याला चपळ बनवितो आणि कुणी चपळ असेल तर त्याला आणखी चपळ, चाणाक्ष बनवितो. कारण जास्त जेवण केल्याने सहसा स्थूलता वाढत असते, आळस येतो. म्हणूनच परीक्षेला जातांना जास्त खाऊन जाऊ नये असं तज्ज्ञ सांगत असतात.
चपळता हा एका चांगल्या व्यक्तिमत्वाचा नेहमीच एक अविभाज्य भाग असतो. आळसी व्यक्तिमत्व काहीही कामाचं नसते आणि ते दुसऱ्याला आवडतही नसते.
चपळतेमध्ये जो सर्वात महत्वाचा गुन असायला पाहिजे तो म्हणजे वक्तशीरपणा. रमजानच्या सर्व उपासनांचे वेळापत्रक ठरलेले असते. वृत्तपत्रात तुम्ही वाचतच असाल कि, आजका इफ्तार, कल की सहेरी. त्यात इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी सहेरी आणि इफ्तार करायची वेळ दिलेली असते. रमजानच्या आधीच्या शुक्रवारी मशिदीबाहेर रमजानचे छापील वेळापत्रक वितरित केले जाते. अनेक मुस्लिमेतरांच्या कंपन्यादेखील आता जाहिरातीसाठी असे वेळापत्रक वितरित करत आहेत.
फक्त रमजानच नव्हे तर इतर महिन्यातही नमाज ही वेळेवरच अदा करायची असते. परंतु रमजानमध्ये तराविह ही विशेष नमाज इमामच्या नेतृत्वातच पढली जाते, कारण त्यात संपूर्ण कुरआन महिनाभर थोडे थोडे मुखोदगत पढले जाते आणि संपूर्ण कुरआन प्रत्येकाला मुखोदगत असत नाही. म्हणून एकाच मशिदीत अगदी वेळेवर नमाजला हजर राहण्याचा अनेक जन प्रयत्न करत असतात.
हा रमजानचा सगळा ताळेबंद हा महिना सुरु होण्यापूर्वीच ठरवावा लागतो, सगळं नियोजन करावं लागतं. यासाठी ''इस्तेकबाल ए रमजान (रामजानचे स्वागत)'' म्हणून अनेक संघटना कार्यक्रम घेतले जातात.
अशाप्रकारे वक्तशीरपणा पाळणे, नियोजन करणे, सतत क्रियाशील राहणे, समय सूचकता पाळणे, कामात दिरंगाई, आळस न पाळणे, सकाळी लवकर उठणे हे संस्कार महिनाभर रोजाधारकांवर होत राहिल्याने त्याचं व्यक्तिमत्व उजळून निघते. ज्यांनी इमाने इतबारे पूर्ण रोजे ठेऊन तराविह अदा केली, त्यांचं व्यक्तिमत्व ईदच्या दिवशी तेजाळलेले असते, इमानचे एक भारदस्त तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. अशाप्रकारे रमजान व्यक्तिमत्व विकासातही योगदान देतो. फक्त गरज आहे त्या बहुउद्देशीय महिन्याचा प्रत्येक अंगाने अभ्यास करून त्याप्रमाणे आचरण करण्याची.
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)