Ramzan : रमजान व कुरआन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 07:00 AM2018-05-29T07:00:00+5:302018-05-29T07:00:00+5:30
पवित्र कुरआनचे इस्लाम धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे, मात्र रमजानमध्ये ते आणखी जास्त आहे.
नौशाद उस्मान
रमजानमध्ये कुरआन इतर दिवसांच्या तुलनेत सर्वात जास्त पठण केले जाते, श्रवण केले जाते. कारण रमजान व कुरआन यांचा फार घनिष्ट संबंध आहे. ज्याप्रकारे एखाद्या वृत्तपत्राचा पहिला अंक ज्या दिवशी प्रकाशित होतो, त्याच तारखेला दरवर्षी त्याचा वर्धापन दिवस साजरा करण्याची पद्धत काही ठिकाणी असते. अशाप्रकारे रमजान हा जणू कुरआनचा एकप्रकारे वर्धापन मास आहे. कारण याच महिन्यात कुरआनचा पहिला श्लोक अल्लाहकडून प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्यावर अवतरित झाला होता.
या महिन्यात जे रोजे अनिवार्य करण्यात आले त्याचा उद्देशही रोजाधारकाला अल्लाहच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊन लोकांना ईशपरायण बनविणे आहे. ईशपरायण म्हणजे ईश्वराने, अल्लाहने जे करायला सांगितले ते सत्कर्म करणे आणि जे करायला मनाई केली ते करू नये. मग अल्लाहने काय करायला सांगितले आणि कशाला मनाई केली हे कसे माहीत होईल? तर त्यासाठीचे मार्गदर्शन म्हणून कुरआन अवतरित केले. अशाप्रकारे रमजान, कुरआन व रोजे यांचा आपसात घनिष्ट संबंध आहे.
या कुरआनचा विषय 'माणूस' आहे. जीवन कसे जगावे, प्रेषितांनी आणि इतर महापुरुषांनी जीवन कसे जगले, त्यांना त्याचा योग्य मोबदला कसा मिळाला आणि पारलौकिक मोबदला कसा मिळणार आहे, तसेच ज्या वाईट लोकांनी अल्लाहचा कल्याणकारी संदेश नाकारला त्यांचे लौकिक व पारलौकिक नुकसान कसे झाले त्याचे सोदाहरण विवेचन यात आलेले आहेत. वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनात निर्णय घेतांना कोणते निकष वापरावे याचे सुंदर मार्गदर्शन यात आहे.
हा एक अध्यात्मिक ग्रंथ तर आहेच, शिवाय यात संपूर्ण जीवन व्यवस्थेचे कायदे देखील आहेत. हे कायद्याचे पुस्तकदेखील आहे. अल्लाह, प्रेषितांचे प्रेषित आणि मरणोत्तर जीवनाचे अस्तित्व हे काही ठिकाणी वैज्ञानिक दाखले देऊन भोवतालच्या सृष्टीची तसेच कुरआनचीही चिकित्सा करण्याचे आवाहन यात करण्यात आले आहे. सारांश असा कि, अल्लाहने कुरआनात सर्वोच्च स्थान मानवी जीवाला दिलेले आहे. अल्लाहसाठी मानवापेक्षा कोणतीच निर्मिती श्रेष्ठ नाहीये. हा सन्मान माणसाला अल्लाहने कुरआनात दिला आहे. म्हणूनच अल्लाहने एका जीवाची हत्या म्हणजे पूर्ण मानवतेची हत्या संबोधले आहे. (संदर्भ: अध्याय- ५, श्लोक क्र. ३२)
परंतु कुराणविषयी अनेक गैरसमज पसरले आहेत. त्याच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे कुरआनचा एखादा श्लोक समजून घेण्यासाठी तो कोणत्या परिस्थतीत अवतरला, त्या पार्श्वभूमीनुसार त्याचा अर्थ घ्यावा लागतो. उदाहरणार्थ गांधीजींनी ''अंग्रेजो भारत छोडो'' म्हटले तर याचा अर्थ प्रत्येक युरोपियन मूळच्या माणसाने भारत सोडून दिला पाहिजे आणि पुन्हा कधी त्या देशातल्या कोणत्याच माणसाने भारतात पायच ठेवला नाही पाहिजे, असा होत नाही. कारण गांधीजींनी ते फक्त जुलमी सत्ताधारी इंग्रजांना उद्देशून बोलले होते, ही पार्श्वभूमी आपण लक्षात घेतो. तसेच कुरआनचा एखादा श्लोक युद्धप्रसंगी अवतरीत झाला आणि त्यात मुस्लिमेतरांवर कारवाई म्हणून त्यांना मारण्याचा आदेश आला तर याचा अर्थ प्रत्येक युगातल्या प्रत्येक मुस्लिमेतराला ठार करण्याचा तो आदेश नसून, जुलमी सत्ताधारीशी जर युद्ध झाले तर त्यावेळी वैध मार्गाने करावयाची कार्रवाईसंबंधी तो नियम असतो. याचा अर्थ कुरआन कालबाह्य आहे, असे नाही. तर ती परिस्थिती भविष्यातही उदभवू शकत असल्यामुळे तो आदेश त्रिकालाबाधित ठरतो. परंतु तो आदेश सरसकट एखाद्या समाज किंवा धर्मसमूहाविरुद्ध नसतो. म्हणून कुरआनचा अभ्यास शक्यतोवर त्यावरील भाष्य ( तफसीर)मधून केलेला बरा . कारण त्याच्या तळटिपांत त्या त्या श्लोकाची अवतरण काळ आणि पार्श्वभूमी दिलेली असते. अशा पद्धतीने कुरआनचा अभ्यास केल्यास त्याविषयीचे गैरसमज दूर होऊ शकतात. अशाप्रकारे कुरआन समजून घेतल्यास रमजान समजून घेणे सोपे जाते आणि ते आवश्यक आहे. आज मराठीसहित सर्व भारतीय भाषेत कुरआन उपलब्ध आहे. अगदी नेत्रहीन बांधवांकरिता ब्रेल लिपीतही त्याचे भाषांतर उपलब्ध आहे. मग या रमजानमध्ये वाचणार ना कुरआन?
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)