Ramzan : रमजानची क्रांतिकारक 'बडी रात'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2018 07:00 AM2018-06-09T07:00:01+5:302018-06-09T07:00:01+5:30

पवित्र रमजानमधील 'बडी रात'बद्दलचे माहितीपूर्ण विवेचन:

Ramzan: Revolutionary 'Badi Raat' | Ramzan : रमजानची क्रांतिकारक 'बडी रात'

Ramzan : रमजानची क्रांतिकारक 'बडी रात'

नौशाद उस्मान

 मशिदीवरील रोषणाई, नमाजींची वर्दळ वगैरे आपण स्वतः एखाद्यावेळी मुस्लिम मोहल्ल्यातून जातांना अनुभवली असेल. त्यावेळी आज विशेष काय आहे असे तिथे कुणाला विचारले असता, 'आज बडी रात है' असे वाक्य आपण एखाद्या वेळी ऐकले असाल. तेव्हा ही बडी रात नेमकी असते काय याबद्दल आपण पाहू या.
  रमजानच्या ज्या रात्री निसर्गकर्त्याकडून प्रेषित मुहम्मद सल्लम यांना कुराणाचा पहिला संदेश ''इकरा (वाचा/शिका)'' मिळाला, ती रात्र ''लैलतुल कद्र (महानतेचि रात्र/महान रात्र/महारात्र)'' म्हणून घोषित करण्यात आली आहे. याला शब-ए-कद्र देखील म्हणतात, ज्याचा अर्थ तोच होतो. परंतु आपल्या देशात सर्वसाधारणपणे याला ''बडी रात'' म्हणतात. या रात्रीत केलेल्या भक्तीचे पुण्य हजारो महिने केलेल्या भक्तीएवढे मिळते.
''आम्ही याला (कुरआनला) कद्रच्या रात्री अवतरले आहे. 
आणि तुम्हाला काय माहीत, ’कद्र’ची रात्र काय आहे? 
कद्रची रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक उत्तम आहे.
फरिश्ते आणि रूह (जिब्रिल) त्यात आपल्या पालनकर्त्याच्या आज्ञेने प्रत्येक आदेश घेऊन उतरतात. ती रात्र पूर्णतः ’शांती’ आहे. उषःकाळापर्यंत.''  - कुरआन (९७:१०५)
खरंच या रात्रीत ती ऐतिहासिक घटना घडली आहे, ज्या घटनेने जगामध्ये परिवर्तन दिलं, ते म्हणजे या रात्रीत ईश्वराकडून प्रेषितांवर कुरआन अवतरित होण्यास सुरुवात झाली. याच कुरआनची शिकवण देऊन प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी अरबस्थान आणि पूर्ण जगात क्रान्ती घडविली. हेच कुरआन वाचून मुलींना जिवंत पुरणारे अरब स्त्रीचा सम्मान करू लागले, आपल्या मुलींनाही शिक्षण देऊ लागले, विवस्त्र राहून काबा गृहाला प्रदक्षिणा घालणारे पुरेपूर कपडे नेसू लागले, आफ्रिकन हबशींना शूद्र समजणारे त्यांना समानतेची वागणूक देऊ लागले. त्याचे पडसाद पाश्चात्य आणि पौर्वात्य देशांतही पडून अनेक परिवर्तनवादी चळवळी सुरु झाल्या. या जागतिक क्रान्तीची सुरुवात मात्र याच महारात्रीपासून झाली होती. म्हणून हजार महिन्यात जे काम झालं नाही, ते या एका रात्रीत झालंय. कारण प्रारंभ हेच अर्ध यश असते. कदाचित म्हणूनच या रात्रीत केलेली उपासना हजारो महिने केलेल्या उपासनेसमान आहे.
पण ही महारात्र रमजानच्या नेमक्या कोणत्या तारखेला येते, ते स्पष्ट नाहीये. याची तारीख प्रेषित मुहम्मद सल्लम यांना माहीत होती. एकदा या रात्रीची तारीख लोकांना सांगण्यासाठी प्रेषित घराबाहेर निघाले असता, बाहेर दोन माणसांत भांडणं सुरु झाले होते. त्यावेळी अल्लाहने त्यांना त्या तारखेचा विसर पाडला आणि प्रेषित या महारात्रीची तारीख विसरून गेले. याविषयी प्रेषितपत्नी आदरणीय आयेशा सिद्दिका सांगतात कि, प्रेषितांनी म्हटलंय - ''रमजानच्या शेवटच्या दहा दिवसांच्या विषम तारखांना या महान रात्रीचा शोध घ्या.''
- संदर्भ: हदीस (प्रेषित वचन) बुखारी शरीफ (खंड-३, भाग-३२, हदीस क्र. २३४)
म्हणजे रमजानच्या २१, २३, २५, २७ आणि २९ या पाच विषम तारखांच्या  रात्रींपैकी कोणती तरी एक रात्र ''शब ए कद्र'' असू शकते. या पाच रात्रींना उर्दूत ''ताक (विषम) रात्र'' देखील म्हणतात. या पाचही रात्री मशिदीत रोजच्या नमाजव्यतिरिक्त रात्री उशिरापर्यंत वैक्तिगतरित्या अतिरिक्त (नफील) नमाज पढली जाते, काही लोकं रात्रभर जागरण करून अल्लाहचं नामःस्मरण करतात. बऱ्याच जागी रात्रभर ''मुताअला-ए-कुरआन'' (कुरआनची चिकित्सा करण्याकरिता केलेले अध्ययन) केले जाते. तर काही ठिकाणी मशिदीत समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले जातात. यात प्रवचने, बोधपर भाषणं, ईशस्तवन (हम्द) किंवा प्रेषित महती (नात) गायिली जाते. हे सर्व पाचही विषम रात्रींना यासाठी केले जाते कि, यापैकी जी कोणती रात्र ''शब ए कद्र'' असेल त्या रात्रीच्या भक्तीचे पुण्य हजार रात्रीएवढे मिळेल म्हणून. तसेच त्या महारात्रीशिवाय इतर चार रात्री केलेली भक्तीदेखील वाया जाणार नाहीये. परंतु काही विचारवंत ही महारात्र २७ रमजानचीच असल्याचा अनुमान व्यक्त करतात. म्हणून भारत देशात बहुसंख्य लोकं फक्त रमजानच्या २७ व्या रात्री म्हणजे २६ वा रोजा असतो त्या दिवसाच्या रात्रीच जागरण करून मशिदीत अतिरिक्त नमाज पढतात.  मात्र आता जनजागरणाने लोकं पाचही रात्री उपासना करू लागले आहे. खरं म्हणजे त्या रात्रीची वास्तविक तारीख फक्त अल्लाहलाच ठाऊक आहे. लोकांनी त्याचा शोध घेण्यासाठी पाचही रात्री जास्तीत जास्त उपासना करावी, याचसाठी कदाचित अल्लाहने प्रेषितांना त्या रात्रीच्या तारखेचा विसर पाडला असावा. याविषयी मौलाना अबुल कलाम आजाद म्हणतात -
''हे इमानवंता, तू ज्या महारात्रीचा रमजानच्या विषम रात्रीत शोध घेतोस, त्या रात्री जो ग्रंथ (कुरआन) अवतरण्यास सुरुवात झाली होती, त्या ग्रंथावर जर तू आचरण करणे सुरु केले तर तुझ्या आयुष्याची प्रत्येक रात्र ही महारात्र ठरू शकते.'' अशी ही क्रान्तिकारी रात्र आपल्यापैकी प्रत्येकाचे आयुष्य पालटून ते प्रत्येक दृष्टीने समृद्ध करू दे, हीच अल्लाहशी प्रार्थना, आमीन (तथास्तु)!

(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

Web Title: Ramzan: Revolutionary 'Badi Raat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.