Ramzan : ‘रोजा’ म्हणजे उपासमार नव्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 07:15 AM2018-05-21T07:15:15+5:302018-05-21T07:15:15+5:30
रमजान महिन्यात ठेवले जाणारे रोजे म्हणजे उपासमार असल्याची भीती काहींना वाटते. मात्र तसे नसून तो स्वत:च्या मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रभावी मार्ग आहे.
नौशाद उस्मान
रमजानच्या रोजाचा अर्थ काही लोक उपास असा बोलण्यात चालण्यात सर्रास केला जातो. उपासचा शब्दश: अर्थ उपाशी राहणे आहे, तर ‘उपवास’चे अनेक भावार्थ निघतात. त्यापैकी एक म्हणजे कुणाच्या तरी जवळ आवास करणे, राहणे, सान्निध्य प्राप्त करणे असा होतो. रमजानचा रोजा हा उपास नसून उपवास आहे. कारण त्याद्वारे अल्लाहचं सान्निध्य प्राप्त करून ईसपरायणता अंगिकारली जाते. तसं पाहिलं उपास हा प्रकार अनेक संस्कृतीत सापडतो.
हिंदू संस्कृतीत काही सांप्रदाय व जातींमध्ये उपवासाचे वेगवेगळे स्वरूप आहे. ज्याच्यासाठी उपवास ठेवला जातो, तो उपास्यदेखील प्रत्येक दिवसाचा वेगळा असतो. सर्वसाधारपणे या उपवासांत कडधान्य व मांसाहार न करता फळफळाल व स्टार्च खाल्ले जाऊ शकते. चहादेखील पिता येतो. खिश्चन समाजात सर्वसाधारणपणे कार्निव्हल उत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासून चाळीस उपवास धरले जातात. यात चोवीस तास काहीही न खाता, काहीही न पिता फक्त रात्री एकदाच जेवण केले जाते.
जगभरात बौद्ध धर्मातील विविध पंथांमधील उपवासाच्या विविध पद्धती आहेत. त्यापैकी ‘अन्न वर्ज्य करणे’, ‘दिवसातून एकदाच जेवणे’, ‘एकाच बैठकीत जेवणे’, ‘जेवणाची मात्रा कमी करणे’, ‘फक्त भिक्षा मागत फिरतांनाच जेवणे’, ‘एका चांद्रमासापर्यंत शाकाहारच घेणे’, या काही प्रमुख उपवासाच्या पद्धती बौद्ध समुदायात सापडतात. जैन धर्मातही पर्युषण पर्वात कडक उपवास केले जातात. पर्युषण पर्वाच्या शेवटच्या आठ दिवसांत श्वेतांबर लोकं, तर शेवटच्या दहा दिवसांत दिगंबर लोकं उपवास ठेवत असतात. पावसाळ्यात हे उपवास ठेवले जातात. आत्मनियंत्रणासाठी हे उपवास ठेवले जात असल्याचे सांगितले जाते. पारसी धर्मात मात्र उपवास नाहीयेत, उलट त्या धर्मानुसार उपवास ठेवणे पाप आहे. शिख धर्मात उपवासाला प्रोत्साहन देण्यात आलेले नसले तरीही उपवासाला विरोधदेखील केलेला नाही. आरोग्यासाठी उपवास ठेवण्याची शिख धर्म परवानगी देतो.
इस्लाममध्ये उपवासाचा उद्देश ईशपरयाणता वृद्धींगत करून रोजाधारकाला नितीमान बनवणे आहे. या उपवासात सुर्योदयापूर्वीपासून तर सुर्यास्तापर्यंत काहीही खाणे-पिणे, समागम करणे, बोलणे वर्ज्य असते.
एखाद्या रोजाधारकाला खूप तहान लागलेली असली तरीही तो एकांतातही पाणी पीत नाही. कारण ‘मला अल्लाह (ईश्वर) पाहत आहे, मी विनाकारण रोजा मोडला तर तो नाराज होईल, मला शिक्षा करेल’ असे संस्कार त्याच्यावर बारा ते चौदा तास रोज महिनाभर त्याच्या मनावर सतत होत असतात. हे संस्कार त्याला इतरही वाईट कृत्यांपासून दूर ठेवतात.
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)