Ramzan : रोजाद्वारे प्रवाहाविरुद्ध संघर्षाची प्रेरणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 07:04 AM2018-06-07T07:04:23+5:302018-06-07T07:04:23+5:30
रमजानमधील रोजे सोपे नसतात. आत्मसंयमाची परीक्षाच. त्याविषयी विवेचन:
नौशाद उस्मान
रोजा हा फारसी शब्द आहे. अरबीत त्याला सौम म्हणतात. सौम हा अरबस्थानात एक खेळ देखील होता. वाळवंटात ज्या दिशेने जोराचा सुसाट वारा सुटला असेल, त्याच्या अगदी विरुद्ध दिशेने उंटावर बसून धावण्याचा तो खेळ होता. अशाप्रकारे रोजा माणसाला फक्त भूक आणि तहानेशीच संघर्ष करण्याचे प्रशिक्षण देत नाही, तर सभोवताली चुकीची व्यवस्था असतांना त्या व्यवस्थेच्या आहारी न जाता, नैतिक तत्वांवर कायम राहण्याचे प्रशिक्षणही देत असतो. कारण रोजा फक्त पोटाचाच नसतो, तर जीभ, कान, डोळे आणि पूर्ण शरीराचा असतो. डोळ्याने वाईट पाहू नये, जिभेने वाईट बोलू नये, कानाने वाईट ऐकू नये, हातांनी वाईट काही करू नये, पायांनी वाईट जागी जाऊ नये अशाप्रकारे शरीराच्या कोणत्याच अवयवाने वाईट काही करूच नये, असा रोजाचा कडक नियम असतो. हे संस्कार व्यवस्थेच्या जोरदार प्रवाहाविरुद्ध धावण्यात मदत करतात.
कुरआनात जेंव्हा ''सौम (रोजे)'' अनिवार्य करण्यात आले तेंव्हा इमानवंत समजून गेले कि, आता त्यांना प्रस्थापितांविरुद्धची चळवळ युद्ध पातळीवर चालवायची आहे आणि त्यासाठी आपल्याला रमजानमध्ये रोजांद्वारे तयार केले जात आहे.
रमजान हा शब्द रमजपासुन तयार झालेला आहे, त्याचा अर्थ उष्णता होतो. भूक व तहानेच्या भट्टीत तावून सुलाखून रोजाधारक बाहेर येतो. तसेच स्वतःच्या काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर या षडविकारांपासून दूर जाण्यासाठी त्या रोजाधारकाचा स्वतःच्याच नफ्स (जीवाशी) संघर्ष सुरु असतो. ते युद्ध जिंकून ईदचा उत्सव साजरा करत असतो तो.
प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी रोजा असतांना संयमाने वागण्याचे निर्देश दिले आहेत. प्रेषित मुहम्मद सल्लम म्हणाले, ‘‘रोजाधारकांनी आपल्या तोंडून निर्लज्जतेची वाह्यात गोष्टी बोलू नये. कोणी शब्दांनी छळ केला, शिव्या दिल्या तर त्यांनी विचार करावा की, मी रोजाधारक आहे. मी असे वागू शकत नाही (सदंर्भ: हदीस अल- बुखारी)’’.
उपासनेमुळे संयम व धैर्य येते. अल्लाहच्या कार्यात भूक-तहान सोसणे, संकटांना तोंड देणे, समस्यांना सहन करणे अशा सवयी निर्माण होतात. उन्हाचा पारा चढला तरी तो सहन करतो तद्वतच बिकट परिस्थितीत तो डगमगत नाही. प्रेषित म्हणाले, ‘‘रमजानचा महिना धैर्य व संयमाचा आहे. आणि याचा मोबदला ‘जन्नत’ (स्वर्ग) च्या रुपाने मिळेल. (संदर्भ: हदीस बैह़की शरीफ ’’. या महिन्यात जो धीर धरून असतो, कटू परिस्थितीला हसतमुखाने स्वीकार करतो, वाईट वागणुकीस सत्प्रवृत्तीने उत्तर देतो, सूड घेणाऱ्याविरूद्ध शांततेची प्रार्थना करतो, अत्याचार करणाऱ्याविरूद्ध क्षमा दान देतो, दूर गेलेल्यांना जवळ करतो, हक्काची पायमल्ली करणाऱ्यास भरभरून देतो, सर्वांगाने संयम बाळगतो त्यामुळे त्याचे पूर्ण जीवन स्थितप्रज्ञ होते.
रोजामध्ये दिवसभराच्या उपाशी राहण्याने नित्य भोजनास नियंत्रण येते. पचनक्रियेस विश्रांती मिळते. वस्तुत: नेहमी पोटभर खाणे इस्लामला अमान्य आहे. पोटात भोजनाच्या तीन भागात एक भाग अन्न, एक भाग पाणी व एक भाग रिकामं असावं असे हदीस सांगते. भोगवृत्ती नियंत्रित होते. खूप खाण्याची सवय प्रत्येकाने सोडली तर अन्नाची बचत होऊन देशाचे उत्पादन एका झटक्यात दुप्पट होऊ शकते.
अरबीत एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. रोजाचेही अनेक अर्थ होतात. रोजाचा एक अर्थ थांबणे, रोखणे देखील होतो. अल्लाहने ज्या गोष्टींची मनाई केली, त्यापासून स्वतःला रोखणे दुसऱ्या भाषेत ब्रेक लावणे म्हणजे रोजा. त्यामुळे मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक, असे संस्कार झाल्याने रमजाननंतरही आत्मनियंत्रणाचे पडसाद मनावर कायम राहतात. अशाप्रकारे संयम, सहिष्णुता, संघर्षशक्ती, आत्मनियंत्रण यासारखे अनेक उत्तम संस्कार रमजान देऊन जातो.
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)