Ramzan : शिरकुर्मा...एक शुद्ध भारतीय पाककृती आणि बनवायला सोपी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 07:00 AM2018-06-08T07:00:00+5:302018-06-08T07:00:00+5:30
खरंतर शिरखुर्मा मात्र शिरकुर्मा म्हणून प्रचलित असणारा पवित्र माहिन्याची सांगता होत असताना ईदला दिला जाणारा लोकप्रिय खाद्यपदार्थ. हा शुद्ध भारतीय आणि बनवण्यासही अगदी सोपा.
बुशरा नाहिद
ईदच्या दिवशी किमान एक तरी खजूर खाऊन अल्लाहची कृतज्ञता व्यक्त करावी, आनंद साजरा करावा, असे एक प्रेषित वचन आहे. आता हे खजूर विविध देशांत विविध प्रकारे खातात. दक्षिण आशियायी देशात दुधात खजूर शिजवून खातात. दुधाला फारसीत शीर आणि खजुराला खुर्मा म्हटले जाते. अशाप्रकारे दूध आणि खजुराच्या मिश्रणाला शीरकुर्मा म्हटले जाते. पण यात आणखीही काही सुका मेव्याचे पदार्थ असतात. उत्तर भारतात यालाच संवैय्या देखील म्हणतात. विशेष म्हणजे हा शीरकुर्मा अरब देशात नसतो. ही एक शुद्ध भारतीय पाककृती आहे. आमच्या मुस्लिमेतर बांधवांनाही या शिरकुर्म्याचे विशेष आकर्षण असते. तो कसा तयार करतात ते आता पाहू या -
साहित्त्य-
१) दुध १ लिटर, २) शेवया - १ वाटी (बारीक तोडलेल्या), ३) साखर - दोन वाट्या, ४) वेलदोडे (इलायची) - ५ नग,
५) खारीक - ८ नग, ६) पिस्ता - १०-१५ नग, ७) बदाम - १०-१५ नग, ८) काजू- १०-१५ नग, ९) तूप - २ चमचे (मोठे),, १०) चारोळी - अर्धा विंâवा पाव कप
कृती -
(मुस्लिमेतर भगिनींना सोपं जावं म्हणून सोपी पद्धत सांगितली आहे. याव्यतिरिक्तही शिरकुर्मा बनवण्याच्या विविध पद्धती आहेत.)
दुध उकळून घ्या. खारीकाचे गर (बीया) काढून त्याचे बारीक तुकडे करा. काजू, बदाम, पीस्ता यांचेही बारीक तुकडे करा. वेलदोड्यांना चांगलं बारीक ठेचून घ्या. एका भांड्यात तुप गरम करा आणि त्यात शेवया टाका. शेवयांना चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. त्यात काजू, बदाम, पिस्ता, खारीक व चारोळी टाका. चमच्याने या सर्वांना कालवून घ्या. उकळलेले दुध त्यात टाका आणि साखर व ठेचलेली विलायचीही टाकून द्या. उकळी फुटेपर्यंत हे सर्व चुलीवर तापू द्या आणि झाला तयार शिरकुर्मा.
(लेखिका अरबी भाषेत पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्या इस्लामच्या अभ्यासिका आहेत.)