Ramzan : 'ईदगाह' नेमकी असते तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 07:00 AM2018-06-11T07:00:00+5:302018-06-11T07:00:00+5:30
ईदचा नमाज जेथे पढली जाते त्या ईदगाहचे महत्त्व आणि त्याविषयीची माहिती:
नौशाद उस्मान
आपण दैनंदिन जीवनात जे शब्द ऐकतो, बोलतो, वाचतो, ते आपण सहज बोलून जातो किंवा कानावर पडले तरी तेवढे लक्ष देत नाही. पण काही शब्दांमागे एक इतिहास असतो, त्याला एक विशिष्ट अशी पार्श्वभूमी असते. असाच एक शब्द आहे - ईदगाह!
जवळपास प्रत्येक तालुक्यात किंवा थोड्या मोठ्या खेड्यात तुम्हाला सर्वसाधारणपणे गावाबाहेर एक पांढरी भिंत दिसते, ज्याला आजूबाजूने मशिदीसारखे छोटे मिनार असतात आणि मध्यभागी जवळपास सहा सात फुटांचा भिंतीत खोलगट असा अंतर्वक्र महिराब असतो, त्याच्या बाजूला छोट्या तीन पायऱ्या असतात, त्या जागेला ''ईदगाह म्हणतात. आता शहरे किंवा गावांची वस्ती वाढल्यामुळे त्या शहराच्या आत आल्या आहेत.
या ईदगाहमध्ये नमाज पढली जाते. ईदगाह म्हणजे जिथे ईदची नमाज पढली जाते ती नियोजित जागा. तिथे फक्त अशी भिंतच असणे आवश्यक नाही, तर इथे ईदची नमाज पढली जाते, याची माहिती लोकांना असावी म्हणून ती एक खून आहे. सर्वसाधारणपणे ईदची नमाज पढली जाते ती मोकळी जागा म्हणजे ईदगाह अशी साधी सोपी त्याची व्याख्या करता येईल. आज ईदगाह्चे जे स्वरूप दिसते तो दक्षिण आशियाई संस्कृतीचा आणि त्यातल्या त्यात भारतीय उपमहाद्वीपाचा एक भाग आहे.
रमजानची ईद उल फित्र आणि ईद उल जोहा (बकरी ईद) या मुस्लिमांच्या दोन्ही उत्सवाच्या दिवशी शहरातील जवळपास सर्वच मुस्लिम येऊन इथे नमाज अदा करत असतात. त्यामुळे ईदगाहची ही भिंत पाहून काही मुस्लिमेतर बांधवांचा असा गैरसमज होऊ शकतो कि, मुसलमान ईदच्या दिवशी या भिंतीचीच उपासना करतात कि काय म्हणून. परंतु अशी भिंत बांधण्याची पद्धत अलीकडची असून हा प्रकार दक्षिण आशिया खंडातच जास्त पाहायला मिळतो. प्रेषितांच्या सुरुवातीच्या काळात अशी भिंत बांधण्याचा उल्लेख इतिहासात सापडत नाही. परंतु शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत गेल्याने मशीद कुठे आहे, ईदगाह कुठे आहे ते लोकांना माहीत व्हावे, यासाठी मिनार, ईदगाहची भिंत हे प्रकार एक खून (लँडमार्क) म्हणून नंतर अस्तित्वात आले. मात्र ईदच्या नमाजसाठीची मोकळी जागा ही ईदगाह म्हणून अगदी सुरुवातीपासून प्रचलित आहे. मात्र या भिंतीचे महत्व लोकांनी जमण्यासाठीची एक निशाणी, याव्यतिरिक्त दुसरे काहीही नाही. कुणी याची उपासना करत नाही कि कुणी इथे नवस फेडत नाही की फुले वाहत नाही. कारण इस्लामनुसार एका निर्गुण, निराकार अल्लाहशिवाय कुणाचीही उपासना केली जात नाही, एवढेच नव्हे तर कोणत्याही प्रेषित किंवा संतांनीचीही उपासना केली जात नाही. या भिंतीवर पाय ठेऊन याची साफ सफाई केली जाते, यावरुन ही भिंत पुज्यनीय नसल्याचे स्पष्ट होते.
भिंतीच्या मधोमध जो अंतर्वक्र खोलगट भाग दिसतो त्याला ''महेराब'' म्हणतात. त्याच्या समोर उभे राहून ''खतीब'' म्हणजे ''खुतबा (प्रवचन)'' देणारा उभा राहून खुतबा देतो. प्राचीन काळी माईकची व्यवस्था नसल्याने वक्त्याचा आवाज प्रतिध्वनीत होऊन तो वाढावा आणि जास्तीत जास्त श्रोत्यांपर्यंत सहज जावा, हा या महेराबचा उद्देश आहे. मशिदीतही ही सोय केलेली असते. आजही लाईट गेली तर याचा उपयोग होतोच. महेराबच्या बाजूला भिंतीला लागून तीन छोट्या पायऱ्या बांधलेल्या असतात. याला मिम्बर म्हणतात. तो एकप्रकारचा विचारमंच (स्टेज) आहे. त्यावर उभे राहून ईदच्या दिवशी खुतबा (प्रवचन) दिले जाते. मशिदीतही हा मिम्बर असतो.
भारतातली सर्वात प्राचीन ईदगाह दिल्लीत तुघलक वंशावळीच्या काळात म्हणजे चौदाव्या शतकात बांधलेली आढळते. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरची ईदगाह ही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आरमारातील बहुसंख्य मुस्लिम सैनिकांसाठी आणि जवळच्या मुस्लिम गावकऱ्यांसाठी बांधल्याचे काही नागरिक सांगतात. परंतु याबद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत. काहीजण म्हणतात कि, ती आदिलशहाने बांधलेली आहे,असो. पण ती पुढे मराठा राज्यकर्त्यांनी जपली ते महत्वाचे आहे. ती ईदगाह आणि आणि दुर्गा देवीचे एक मंदिर किल्यावर अगदी समोरासमोरच आहे.
इदगाहवर नमाज पढणे प्रेषितांची परंपरा आहे. काही अडचण असेल तर शहराच्या एखाद्या मशिदतही ईदची नमाज पढली जाते, पण इदगाहवर नमाज पढणे जास्त पुण्याईचे मानले जाते. समाजातील सर्व स्तरातील लोकांनी इथे येऊन खांद्याला खांदा लाऊन नमाज पढावी, जेणेकरून सामाजिक समतेचे एक जिवंत असे प्रात्यक्षिक व्हावे, असा यामागचा उद्देश आहे. खरच इदगाहवर जेव्हा एक गरीब एका श्रीमंतांच्या, एक काळा गोऱ्याच्या, एक लहाना मोठ्याचा, एक सामान्य असामान्याच्या खांद्याला खांदा लाऊन इथे ईदच्या दिवशी जेव्हा नमाज पढतो, तेव्हा प्रेषितांनी कायम केलेली सामाजिक समता प्रत्यक्षात साकारली जाते. समतेचे एक उदाहरण म्हणजे दिल्लीतल्या जामा मशिदीत तात्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम नेहमी ईदची नमाज पढायचे. एकदा त्यांना उशीर झाला आणि त्यांना मशिदीत सर्वात शेवटी तिथे जागा मिळाली जिथे चपला, बुटे ठेवले गेले होते. लोकांनी त्यांना समोर येण्यासाठी विनंती केली, पण त्यांनी तिथेच एका सर्वसामान्य माणसाच्या खांद्याला खांदा लावून ईदची नमाज पढली. अशाप्रकारे ईदगाहवर किंवा मशिदीत सार्वजनिकपणे ईदची नमाज पढण्यामागे राजा-रंक असे भेद, सगळे जातीय भेद, वर्णभेद नष्ट करून सामाजिक समता प्रस्थापित होते. वृत्तपत्र किंवा टीव्हीवर ईदगाहवर नमाज पढत असतांनाचे आकाशातून घेतलेले ते विहंगम दृष्य एकात्मतेच्या एका भल्यामोठ्या पुस्तकापेक्षाही कितीतरी जास्त बोधप्रद संदेश देऊन जातो. नमाजनंतर खतीब हा लोकांचे प्रबोधन करतो. समाजात प्रचलित वाईट गोष्टींच्या निर्मूलनासाठी रोजा आणि रमजानमधील उपासनांचा संदेश त्यांना समजावून सांगतो. सर्व जातीधर्माच्या लोकांनी प्रेमपूर्वक मिळून मिसळून राहावे असा संदेश इथून दिला जातो. अशाप्रकारे हे एक संस्कार केंद्रदेखील आहे.
खुतबानंतर इदगाहवरच अनेक जण गळा भेट घेतात, एकमेकांना ईदच्या सदिच्छा देतात, हस्तान्दोलन करतात, एकमेकांची विचारपूस करतात. फक्त मुस्लिमच नव्हे तर तिथे बंदोबस्ताला असलेले बरेच पोलीस आणि बाहेर उभे असलेल्या अनेक मुस्लिमेतर सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनाही सदिच्छा दिल्या जातात. अशाप्रकारे ही ईदगाह सामाजिक समतेचं जणू एक केंद्रच असते. या ईदगाहवर काही मुस्लिमेतर लोकंही सदिच्छा देण्यासाठी येतात तेव्हा एक राष्ट्रीय एकात्मतेचे वातावरण तयार होत असते.
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)