Ramzan : 'ईद उल फित्र'मधील 'फित्र' काय असते?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 07:00 AM2018-06-10T07:00:00+5:302018-06-10T07:00:00+5:30
रमजानमधील अनेक शब्द आपण सहजच वापरतो, जसा 'ईद उल फित्र' मधील 'फित्र'. 'फित्र'चा नेमका अर्थ समजव्याचा हा प्रयत्न:
नौशाद उस्मान
आपण आपल्या कॅलेंडरमध्ये किंवा वृत्तपत्रात नेहमी वाचतो किंवा अनेक ठिकाणी ऐकतो कि, 'ईद उल फित्र'च्या शुभेच्छा, सदिच्छा! त्यामधील हे ''फित्र'' नेमकं काय असते ते आपण पाहू या.
''फित्र''ला आपल्याकडे फितरा देखील म्हणतात. याचा शब्दशः अर्थ ''गाठोडं'' असा होतो. पण रमजानच्या पार्श्वभूमीवर त्याला विशिष्ट असा अर्थ आहे. गोरगरिबांना कडधान्य किंवा इतर खाद्य पदार्थांचे एक गाठोडं प्रेषितांच्या काळात रमजान महिन्यात दिले जायचे, त्याला फितरा म्हटले जात असे. प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी रमजान महिन्यात कधीही पण ईदची नमाज होण्यापूर्वी गोरगरिबांना काही कडधान्य किंवा त्याची किंमत देण्याचा आदेश दिला आहे, जेणेकरून त्यांचीही ईद आणि रमजान आनंदाने व्यतीत व्हावे.
घरातील प्रत्येक लहान मोठयातर्फे प्रत्येक सक्षम इमानवंतांवर एक विशिष्ट प्रमाणात ''फितरा'' गरिबांना देणे ''वाजीब (क्रमप्राप्त)'' आहे. ही काही भीक किंवा दान नसून त्याला गरिबांचा हक्क असल्याचे सांगण्यात आले आहे. फितरा अदा केल्याशिवाय रोजे आणि नमाज अल्लाहकडून स्वीकारली जात नसल्याचे प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी सांगितले आहे.
नेमकं किती फितरा द्यावा यासंबंधी प्रेषितांचे सहकारी अबू सईद खुदरी अशी माहिती देतात कि-
''आमच्या घरातील प्रत्येक लहान, मोठ्या, नोकर किंवा नोकरी/व्यवसाय नसलेल्या व्यक्तीतर्फे आम्ही एक ''सा'' (त्याकाळी ४ ओंजळ भरून दिलेल्या कडधान्याला किंवा कोणत्याही पदार्थाच्या मापाला ''सा'' म्हटले जात होते.) भरून कडधान्य, लोणी किंवा मनुका देत असू.''
- संदर्भ: हदीस बुखारी शरीफ (खंड २, भाग - २५, वचन क्र. ५८२)
प्रत्येक व्यक्तीमागे किती फितरा द्यावा यासंबंधी वेगवेगळी प्रेषित-वचने मिळतात. त्या वचनांचा अर्थ लावून आणि त्यावेळच्या ''सा'' या मापाचे आजच्या आधुनिक मापन पद्धतीच्या वजनात रूपांतर करून विविध इस्लामी विचारवंतांनी फिताऱ्याचे वेगवेगळे प्रमाण ठरवले आहे. हे प्रमाण सर्वसाधारणपणे जवळपास २ किलो ६०० ग्रॅम ते ३ किलोपर्यंत असल्याचे अनेक विचारवंत त्यांचे मत मांडतात.
परंतु या महागाईच्या युगात यापेक्षाही जास्त फितरा देण्याची गरज भासत आहे. तसेच हा फितरा वैयक्तिकरित्या देण्यापेक्षा सामूहिकरित्या दिल्यासजास्तीत जास्त गरजवंतांना त्याचा लाभ मिळू शकतो. म्हणूनच आजकाल अनेक स्वयं सेवी संघटना शहरात कोण कोण किती गरीब आहे, याचा सर्वे करतात आणि शहरातल्या अनेक सक्षम लोकांकडून पैसे जमा करून कडधान्य आणि इतर खाण्याच्या पदार्थांचे किट्स (थैल्या) बनवतात. हे किट्स म्हणजे प्रेषितकालीन फितराचे आधुनिक रूप होय.
अनेक शहरात या कीट्सचे वजन आणि त्यातील जिन्नसांचा दर्जा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. उदाहरणार्थ औरंगाबाद येथील जमाअ त ए इस्लामी हिंद या स्वयं सेवी संघटनेने बनविलेल्या किटमध्ये खालील पदार्थ आहेत - गहू, चहापत्ती, शेंगदाणे, तांदूळ, चना दाळ, मीठ, साखर, मसूर डाळ, हळद, तेल, तूप, मिरची, खजूर, बंगा पावडर, धनीया, खोबरं, मसाला पावडर वगैरे. जवळपास तीस किलोच्या या १३०० रुपयांच्या २ हजार एकशे पंच्याहत्तर किट्स गरिबांना भेट दिले आहेत, ज्यात फक्त मध्य औरंगाबादच्या एका छोट्याशा वस्तीतच सुमारे ६६० किट्स गरजूंना भेट दिल्या आहेत. या व्यतिरिक्त हे रेडिमेट किट्स विकत घेऊन वैयक्तिकरित्या भेट देणाऱ्याची संख्याही हजारोत आहे. फक्त रक्कम जमा केली कि, सामाजिक कार्यकर्ते देणगीदारातर्फे किट गरजूंपर्यंत बरोबर पोहोचवितात. काही गावात तर असे लोकं जे स्वतःला गरज असल्याचे लपवितात, त्यांच्या घरी गुपचूप फितऱ्याची पिशवी ठेवली जाते. जेणेकरून त्यांच्या स्वाभिमानाला धक्काही लागू नये आणि त्यांची गरजही पूर्ण व्हावी. अशाप्रकारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अब्जावधी रुपयांचा फितरा गोरगरिबांत वितरित केला जातो. जेणेकरून गरिब रोजाधारकदेखील रमजान व ईदच्या आनंदापासून पारखं होऊ नये. यामागे फक्त गरिबांची मदत करणेच अपेक्षित नसून गरिबांप्रती जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकी, आर्थिक समतेचा दृष्टिकोन उत्पन्न करण्याचाही उद्देश आहे. प्रेषितांनी म्हटलंय, ''रमजान हा समतेचा महिना आहे.'' रमजानमध्ये एवढे फितऱ्याचे महत्व कि त्यानंतर येणाऱ्या ईदचे नावच ''ईद उल फित्र'' म्हणजे फितऱ्याची ईद आहे, सामाजिक जिव्हाळ्याची ईद आहे!
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)