Ramzan : काय असतो रमजानमधील एतेकाफ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2018 07:00 AM2018-06-02T07:00:00+5:302018-06-02T07:00:00+5:30

रमजान महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसात मशिदीत एका कोपऱ्यात काही लोकं एकांतवासात जातात, त्याला ''एतेकाफ'' म्हणतात. त्या परंपरेची माहिती:

Ramzan: What is the itikaf in Ramadan? | Ramzan : काय असतो रमजानमधील एतेकाफ?

Ramzan : काय असतो रमजानमधील एतेकाफ?

नौशाद उस्मान

कल्पना करा कि,  समजा एकेरात्री आपण झोपेत असतांना कुणीतरी आपल्याला पलंगासहित उचलून एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेऊन दिले तर सकाळी उठून आपण काय करणार? लागलीच त्या हॉटेलमधील सुखसोयींचा सर्रास वापर करायला सुरुवात करणार का? नाही. आधी याची माहिती काढणार, आपल्याला इथे कोण आणि कशासाठी आणलं? इथे आपण ज्या सुविधा घेणार आहोत त्याचा शेवटी हिशोबही द्यावा लागेल की असेच सुटणार आहोत? 

तसंच आपण या जगरूपी पंचतारांकित हॉटेलमध्ये आईच्या कुशीत डोळे उघडलेत आणि या हॉटेलमधील सोयीसुविधांचा लाभ घेऊ लागलो. पण याचा विचार आपण करतो का की, आपल्याला इथे आणणारा कोण आहे? की या सर्व सोयी सुविधा, या नैसर्गिक देणग्यांचा कुठेतरी हिशोबही द्यावाच लागणार आहे का?

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात एवढा विचार करायची कुणाला उसंतच मिळत नाही. म्हणून नेहमीच्या दैनंदिनीतुन काही दिवस काढून एकांतात चिंतन मनन करणे आवश्यक आहे. थोडे एकांतात थांबून स्वतःचा, स्वतःच्या भोवतालच्या जगाविषयी आत्मचिंतनदेखील करणे आवश्यक आहे. आपलं लक्ष्य काय आणि त्यासाठी आपण आतापर्यंत केलेले प्रयत्न किती? कशासाठी करायचे वगैरे या सर्व गोष्टींकडे माणसाचं कधी कधी दुर्लक्ष होते. सर्वात महत्वाचं म्हणजे आपला निर्मिक कोण? त्याला आपल्या कर्माचा जाब द्यावा लागणार आहे कि नाही? त्याने आपल्यासाठी ग्रंथरूपी जे मार्गदर्शन प्रेषितामार्फत दिले आहे, त्यात एक माणूस म्हणून माझे काय कर्तव्य आहे? 
या सर्वांसाठी त्या ग्रंथाचे वाचन, पठन, चिंतन मनन, अल्लाहचे नामःस्मरण करण्याकरिता रमजान महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसात मशिदीत एका कोपऱ्यात काही लोकं एकांतवासात जातात, त्याला ''एतेकाफ'' म्हणतात. 

प्रेषित मुहम्मद सल्लम रमजानच्या शेवटच्या दहा दिवसांत एतेकाफ करत असत. त्यांच्या पत्नी आदरणीय आयेशा सिद्दिका निवेदन करतात कि, ''अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (सल्लम) रमजानच्या अखेरच्या दहा दिवसांत एतेकाफ करायचे आणि जगाचा निरोप घेईपर्यंत त्यांनी हे (ही परंपरा) सुरूच ठेवले होते.'' (संदर्भ: हदिस अल-बुखारी शरीफ)
एतेकाफ सर्वसाधारणपणे मशिदीतच केला जातो. काही उलेमा मशिदीबाहेर एखाद्या खोलीतही एतेकाफ करण्याचे मान्य करतात. इराणची राजधानी तेहरानमधील विद्यार्थी तर चक्क विद्यापीठातच एतेकाफ करत असल्याची छायाचित्रे इंटरनेटवर उपलब्ध आहेत. महिला घरीच एका खोलीत एकांतात एतेकाफ करतात. 
एतेकाफमध्ये एकदा का मशिदीत प्रवेश केला तर फारच महत्वाचं काम (एखाद्या अंत्ययात्रेत जाण्यासारखे काम) असल्याखेरीज पूर्ण दहा दिवस बाहेर पडता येत नाही. जेवणे, झोपणे आणि इतर सर्व कामे मशिदीतच केले जातात. मशिदीत यासाठी सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. सांयकाळी सूर्यास्तानंतर मशिदीत प्रवेश केला जातो ते दहाव्या दिवशी सूर्यास्तापर्यंत मशिदीतच मुक्काम केला जातो, बाहेर पडता येत नाही. यादरम्यान कुणाशीही अनावश्यक गप्पा मारता येत नाही. मौन राहण्याचा प्रयत्न केला जातो. फक्त कुणाला काही महत्वाचे असेल तर बोलू शकता. सहेरी आणि इफ्तार तसेच रात्रीच्या जेवणासाठी घरची मंडळी मशिदीतच डबा पाठवत असतात. 

एतेकाफमध्ये सर्वसाधारणपणे रोजच्या नमाजसह अल्लाहचे नामःस्मरण करणे, कुरआनचे चिकित्सक पद्धतीने अध्ययन करणे, हदीस (प्रेषित वचन) चे अध्ययन करणे, दुसऱ्या मुतकिफ (एतेकाफकरी लोकांचे) प्रबोधन करणे किंवा त्यांच्याकडून प्रबोधन करवून घेणे  आणि आराम करणे तसेच इतर विधी उरकणे यांचा समावेश असतो. यादरम्यान माणूस आपल्या घर संसाराशी दूर असल्याने पूर्ण एकाग्रचित्त होऊन अल्लाहची आराधना करू शकतो, चिंतन मनन करू शकतो. अनेक लोकांना दहा दिवसांचा एतेकाफ शक्य नसतो, तेंव्हा शेवटच्या एक किंवा तीनच दिवसांचा एतेकाफ करतात. आदल्या दिवसाच्या सूर्यास्तापासून दुसऱ्या दिवसाच्या सूर्यास्तापर्यंत एक दिवस गृहीत धरला जातो. एतेकाफ संपल्यानंतर प्रपंचासाठी घरी परत येतांना नव्याने जीवन सुरु करत असल्याचा आभास होतो, कारण एक नवी ऊर्जा याद्वारे मिळालेली असते.
 

(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

Web Title: Ramzan: What is the itikaf in Ramadan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.