Ramzan : काय असते रमजानची सहेरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2018 07:00 AM2018-05-27T07:00:00+5:302018-05-27T07:00:00+5:30

रमजानमध्ये रोजा ठेवणारे लोकं रात्र भर खात असतील असा गैरसमज काही जणांमध्ये पसरलेला आहे. वास्तविकपणे फक्त सहेरी केली जाते. आता ही सहेरी काय असते, ते पाहू या.

Ramzan: What is Saheri? | Ramzan : काय असते रमजानची सहेरी 

Ramzan : काय असते रमजानची सहेरी 

googlenewsNext

नौशाद उस्मान

 झुंजूमुंजू होण्यापूर्वी म्हणजे सोप्या भाषेत पूर्व दिशेला पांढरं फाटण्यापूर्वी थोडीसी न्याहारी केली जाते, त्याला अरबीत सुहूर म्हटले जाते, तर पर्शियनमध्ये ''सहेरी'' किंवा ''सहेर''देखील म्हटले जाते.
ज्यू आणि ख्रिश्चन लोकं उपवास करत असतांना फक्त रात्री एकदाच जेवायचे. बाकी पूर्ण रात्र आणि दिवस उपाशी राहत होते. प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी लोकांना सहेरी करण्याच्या परंपरेचा पायंडा टाकून दिवसभर भुकेले आणि तहानलेले असणाऱ्या रोजाधारकांना फार मोठा आधार दिलाय. अल-बुखारी या हदीस ( प्रेषित वचन) मध्ये याचा संदर्भ सापडतो, ज्यात ईश्वराचे अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लम म्हणतात -
''सहेरी करत जा, त्यात बरकत आहे.''
(हे वचन निवेदन करणारे निवेदक: आदरणीय अनस इब्न मलिक)
म्हणूनच सहेरी खाने ही प्रेषित मुहम्मद सल्लम यांची परंपरा (सुन्नत) आहे.
सहेरीशिवाय देखील रोजा ठेवला जाऊ शकतो, पण सहेर करणे हे लौकिक व पारलौकिक दृष्टीने जास्त हितकारक असते.
यामुळे शारीरिक क्षमता तर वाढतेच, शिवाय प्रेषितांचे अनुकरण व अनुसरण करण्याची जी शिकवण अल्लाहने दिली आहे, त्याचे पालन देखील होते. अनेकांना सकाळी सकाळी उठून जेवण करणे सहसा जड जाते. पण केवळ आपल्या प्रेषितांची एक परंपरा म्हणून थोडेसे काही खाऊन घेणे, हेदेखील प्रेषित-प्रेमाचे एक द्योतक आहे. रमजानमध्ये रोजाधारक रात्रभर खात असतात, हा गैरसमज काही लोक पसरवत आहे. इफ्तार केल्यानंतर रोजाधारक नमाज पढतात. नमाजनंतर काही लोकं एकदा रात्रीचे जेवण उरकतात. त्यानंतर रात्रीच्या नमाजनंतर झोपी जातात. पुन्हा पांढरं फाटण्यापूर्वी एक अर्धा पाऊण तास आधी उठून सहेरी करतात.
इतक्या सकाळी सहसा जेवण जात नाही, म्हणून फारच थोडी न्याहारी केली जाते. काही लोकं तर फक्त खजूर आणि दुधच घेतात. सर्वसाधारण्पणे मध्यरात्रीपासून तर पांढरं फाटेपर्यंतचा काळ हा सहेरी करण्याचा असतो. पण शेवटच्या भागात सहेरी करण्यावर प्रेषितांनी प्राथमिकता दिली आहे. ईश्वराचे अंतिम प्रेषित आणि दयासागर मुहम्मद सल्लम यांनी म्हटले आहे -
''इफ्तार लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा आणि सहेरी ही उशिरात उशीरा करण्याचा प्रयत्न करा.'' 
(संदर्भ: हदीस सहीह उल जामे)
यावरून प्रेषितांनी मानवी स्वभाव आणि त्याच्या गरजांचे किती भान राखले आहे, ते लक्षात येते. उपासना ही सोप्यात सोपी आणि जास्तीत जास्त सरल कशी करता येईल, जेणेकरून सर्वसामान्य लोकांनाही त्यात भाग घेता यावा, याकडे त्यांचा कल होता. म्हणूनच सर्वसाधारण्पणे इस्लाममध्ये एका मौलवीकरिता देखील तेच नियम आहेत जे सर्वसामान्य इमानवंतांसाठी आहेत. उपासनेतली अशी सवलत, अशी सरलतादेखील इस्लामच्या जगभर प्रसार होण्याचे एक कारण आहे. अशाप्रकारे प्रपंचातून परमार्थ साधण्याचा संतुलित मार्ग कसा असतो, याचे उदाहरण म्हणजे सहेरी होय. तर एक अनुभव म्हणून करून पहा कधी सहेरी!

(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)
 

Web Title: Ramzan: What is Saheri?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.