Ramzan : काय असते रमजानची तराविह?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2018 07:00 AM2018-06-01T07:00:00+5:302018-06-01T07:00:00+5:30
पवित्र रमजान महिन्यातील तराविहबद्दल जाणून घेणे खूपच महत्वाचे:
नौशाद उस्मान
एरवी फक्त पाच वेळची नमाजच पढली जाते. परंतु रमजानमध्ये उशिरा रात्री जगभरातील सर्वच मशिदीत सामूहिकरीत्या अधिकची एक विशिष्ट दीर्घ नमाज पढली जाते, त्याला तराविह म्हटले जाते. रात्रीची ('इशा'ची) नमाज झाल्यानंतर लगेच ही नमाज पढली जाते. आदरणीय प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या काळात ही नमाज वैयक्तिकरीत्या पढली जायची. परंतु प्रेषितांनंतरचे दुसरे आदर्श खलिफा आदरणीय उमर फारूक यांनी ती सार्वजनिकरित्या पढण्याची परंपरा सुरु केली. ही नमाज अनिवार्य (फर्ज) नसून सुन्नत (प्रेषित-परंपरा म्हणून) आहे.
यात सर्वसाधारणपणे कुरआनच्या ३० खंडांपैकी दररोज एक किंवा दुध खंड पठन केला जातो आणि अशाप्रकारे या नमाजमध्ये पूर्ण महिनाभरात एक कुरआन श्रवण केले जाते. या नमाजचे नेतृत्व करणाऱ्यांना पूर्ण कुरआन मुखोद्गत असते, अशा लोकांना ''हाफिज'' म्हणतात. मदरशात अनेक अभ्यासक्रमापैकी एक 'हाफिज' बनण्याचादेखील अभ्यासक्रम असतो. अनेक ठिकाणी गावोगावी असे हाफिज इतर शहरांतून महिन्याभरासाठी खास आमंत्रित केले जातात. महिन्याअखेरीस त्यांना मशिदीत मोहोल्ल्यातील लोकांतर्फे किंवा मशीद व्यवस्थापन समितीतर्फे भेट वस्तू देऊन कपडे व इतर खर्च देऊन सम्मान सत्कार केला जातो.
या तराविहमध्ये वीस रकाअत नमाज पढली जाते. रकाअत हे नमाज पढण्याचे एकप्रकारचे एकक आहे. 'अल्लाह हू अकबर (याचा अर्थ अल्लाहच सर्वश्रेष्ठ आहे, इथे अकबर बादशहाचा काहीएक संबंध नाहीये. अकबर म्हणजे सर्वश्रेष्ठ) असे हाफिजने म्हणताच सर्व जण दोन्ही हाथ कानांपर्यंत उंचावून नंतर पोटावर किंवा छातीवर दोन्ही हाथ एकमेकांवर बांधतात. नंतर हाफिज साहेब कुराणातील आयती (श्लोक) पठन करतात. सर्व जन खांद्याला खांदा लावून रांगांमध्ये शांतपणे ते कुरआन पठन ऐकतात. कुणीही इकडे तिकडे पाहत नाही. जणु सर्वांना समाधी लागली आहे. नंतर पुन्हा हाफिज अल्लाह हू अकबर म्हणतो. तेव्हा सगळे अर्धे वाकून घुडग्यावर हाथ ठेवतात. याला ''रूकुअ'' म्हणतात. हाफिज नंतर म्हणतात 'समिल्लाहू निअमल हमिदा (अल्लाहनं त्याचं ऐकून घेतलं ज्याने कुणी त्याचे स्तवन म्हटले). सर्वजण सरळ उभे राहतात. नंतर पुन्हा अल्लाहू अकबर असे हाफिजने म्हटल्यावर सगळे एका दमात नतमस्तक होतात, याला सजदा म्हणतात. असे एका नंतर एक दोन सजदे केले जातात. सजदा अशाप्रकारे सरळ उभे राहून कुराणाचे श्लोक ऐकणे, रूकुअ करणे, नंतर सरळ उभे राहूने, नंतर दोन सजदे करणे या नमाजच्या पूर्ण प्रक्रियेला एक रकाअत म्हणतात. तराविहमध्ये असे वीस रकाअत पढले जातात.
प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी या तराविह मध्ये कधी आठ रकाअत तर कधी बारा तर कधी वीस रकाअत पढल्याचा इतिहासात उल्लेख सापडतो. त्यामुळे काही मशिदीत आठ रकाअत तर काही मशिदीत वीस रकाअत तराविह पढली जाते. यामुळे अध्यात्मिक आणि पारलौकिक लाभ तर मिळतोच शिवाय शारीरिक व्यायामदेखील भरपूर होतो. अशाप्रकारे रमजानचे रोजे आणि तराविह हे भक्ताला ईशपरायण तर बनवतातच, शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि चपळ देखील बनवते जेणेकरून त्याचा उपयोग त्याला सामाजिक परिवर्तनाच्या कामात व्हावा. काही मशिदीत तर महिलांसाठीदेखील ही नमाज पढण्याची विशेष व्यवस्था केली जाते.
या तराविहच्या नमाजमध्ये रात्रीच्या निरव शांततेत तल्लीन होऊन भक्ताचा भगवंताशी संबंध आणखीनच दृढ होत जातो.
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)