Ramzan : काय असतो इफ्तार पार्टीचा खरा उद्देश?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 07:00 AM2018-05-30T07:00:00+5:302018-05-30T07:00:00+5:30
अनेक ठिकाणी इफ्तार पार्टी आयोजित केली जाते. काहींचा उद्देश राजकीय असला तरीही इतर सामाजिक संघटना व व्यक्तींद्वारे आयोजित इफ्तार पार्टीचे सामाजिकदृष्ट्या फार महत्व असते. आज या इफ्तार पार्टीविषयी जाणून घेऊ या:
नौशाद उस्मान
रमजानच्या रोजाची सांगता इफ्तारने होते. सूर्योदयापूर्वी तांबडं फाटण्यापूर्वीपासून तर सूर्यास्तानंतरची लालसर कांती फिटेपर्यंत दिवसभर रोजा ठेऊन सुर्यास्तानंतर थोडंसं काही खाऊन पाणी प्याले जाते आणि त्यानंतर खाण्यापिण्यास परवानगी असते, या सोपस्काराला ‘इफ्तार’ म्हणतात. इफ्तारच्या वेळी तहानेने ओठ सुकून त्यावर चढलेली पपडी पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या ग्रामीण भागातल्या लोकांची जाणीव करून देते, तर पोटात भुकेने उठलेला आगडोंब हा दिवस दिवसभर जीवनाचा घासदेखील मोठ्या कष्टाने ज्यांच्या नशिबी असतो, त्यांच्याप्रति एक सामाजिक बांधिलकी निर्माण करतो. अशाप्रकारे हा रोजा आणि हा इफ्तार गरिबांना मदत करण्याची प्रेरणा देतो.
इफ्तारच नव्हे तर कोणत्याही तहानलेल्या-भुकेलेल्यांच्या तोंडात घास भरवणे फार पुण्याचे आहे. ईश्वर कुरआनात सांगतो-
‘‘... आणि ईश्वरप्रेमाखातर रंजल्या-गांजल्यांना व अनाथ व कैद्यांना ते जेऊ घालतात (आणि म्हणतात की,) ‘आम्ही फक्त अल्लाहखातर जेऊ घालीत आहोत, आम्हाला तुमच्याकडून कोणत्याही मोबदल्याची किंवा आभार प्रदर्शनाची अपेक्षा नाही. आम्हाला तर आमच्या पालनकर्त्याकडून त्या (महाप्रलयाच्या) दिवसाच्या प्रकोपाची भीती (काळजी) लागलेली आहे जो भयंकर संकटाचा अत्यंत प्रदिर्घ दिवस असेल.’ म्हणून महान अल्लाह (ईश्वर) त्यांना त्या दिवसाच्या संकटापासून वाचवील आणि त्यांना टवटवीतपणा व उल्हास प्रदान करील आणि त्यांच्या संयमाबद्दल त्यांना स्वर्ग व रेशमी पोशाख प्रदान करील.’’ (कुरआन -७६:८/१२)
कुणाच्या पोटातली भूकेची आग शमविणे तर पुण्य आहेच, पण रमजानमध्ये एखाद्या उपवासधारकाला जेऊ घालणे तर महापुण्य! प्रेषित मुहम्मद सल्लम् म्हणाले की, ‘‘जो कुणी उपवासधारकाला जेऊ घालील त्याला उपवासधारकाएवढेच पुण्य मिळेल, उपवासधारकाचे पुण्य मात्र अबाधित राहील.’’ (संदर्भ: प्रेषित वचनं- अहमद व निसाई शरीफ) दुसऱ्या एका हदीस (प्रेषित वचनां)मध्ये प्रेषित मुहम्मद सल्लम सांगतात की, ‘‘जो कुणी उपवासधारकाला जेऊ घालील त्याचे पाप माफ केले जातील आणि त्याला नरकापासून मुक्ती मिळेल. त्याला उपवासधारकाएवढेच पुण्य मिळेल, पण उपवासधारकाचे पुण्य मात्र कमी होणार नाही. (त्यांच्या एका सहकार्यांनी ) विचारले की, ‘‘ईश्वराचे प्रेषित, कुणाला जेऊ घालण्याइतपत आमच्यापैकी एखाद्याची ऐपत नाहीये (तर?)’’ प्रेषित सल्लम यांनी उत्तर दिले की, ‘‘कुणी घोटभर दूध किंवा खारकाचा एक तुकडा अथवा घोटभर पाणी जरी पाजले तरीही ईश्वर त्याला त्याचे पुण्य तेवढेच देणार.’’ रमजानमध्ये तर एका पुण्याचे सत्तरपट जास्त पुण्य मिळते. पुण्याईची प्राप्ती व पापक्षालनासाठी लाखो लोकं रमजान महिन्यात इफ्तार पार्टी आयोजित करत असतात.
परंतु बऱ्याच राजकीय पक्षांकडून आयोजित इफ्तार पार्ट्यांच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. रोजा, रमजान, या रमजानमध्ये अवतरीत ग्रंथ कुरआन व त्याच्या शिकवणीचा परिचय मुस्लिमेतरांना करून देण्यासाठी या इफ्तार पार्टीचा उपयोग झाला तर मिळनाऱ्या पुण्यात आणखी वाढ होईल. इफ्तार पार्टीनंतर आयोजित करण्यात येणाऱ्या शिरखुर्मा पार्टी किंवा ईदमिलनांचा देखील असा सदुपयोग करण्यात यावा. एकमेकांच्या धर्माच्या ग्रंथांची घेवाण देवाण व्हावी, एकमेकांच्या धर्माविषयीच्या शंका कुशंका विचाराव्यात, एकमेकांना अत्तर तर लावावेच शिवाय मनातला सगळा गाळदेखील या प्रेमाच्या अत्तराने धुवून काढावा. कधी स्वतःच हजेरी लावून अनुभवा इफ्तारच्या मांगल्याचा तो क्षण!
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)